महाराष्ट्रातील गुन्हेगारीत वाढ चिंताजनक | पुढारी

महाराष्ट्रातील गुन्हेगारीत वाढ चिंताजनक

कधी काळी महाराष्ट्राची ओळख महापुरुषांचा, संतांचा महाराष्ट्र अशी करून दिली जात होती. आता मात्र हा परिचय पुसला जात आहे. भारतातील गुन्हेगारीवर आपण नजर टाकली तर विविध गुन्हेगारीच्या प्रकारांत महाराष्ट्राचा आलेख सातत्याने उंचावलेला दिसत आहे. आजच आपण याकडे गंभीरपणे न पाहिल्यास उद्याच्या महाराष्ट्राच्या भविष्यात अंधाराचे साम्राज्य तर नसेल ना, याची भीती वाटणे साहजिक आहे. राज्याच्या धोरणकर्त्यांनी आणि दिशा देऊ पाहणार्‍या विचारवंतांनी याबाबत भूमिका घेऊन पावले उचलण्याची गरज आहे.

राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेच्या अहवालातून भारतातील विविध राज्यांच्या गुन्हेगारीचे आकडे समोर आले आहेत. त्यात महाराष्ट्राचे वास्तवही समोर आले. वाढती गुन्हेगारी ही महाराष्ट्रासाठी भविष्यात धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहेत. भारतात एकूण 66 लाख 1 हजार 285 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्या एकूण गुन्ह्यांपैकी महाराष्ट्राच्या नावावर पाच लाख 39 हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. 2019 पेक्षा 29 हजार 570 अधिकचे गुन्हे एका वर्षात नोंदविले आहेत. ही वाढ सुमारे 5.49 टक्के इतकी आहे. राज्याच्या गुन्हेगारीचे प्रमाण सुमारे 8.17 टक्के इतके आहे. शंभर लोकांच्यामागे सुमारे नऊ गुन्हे हे विचार करायला भाग पाडते आहे.

देशात बालगुन्हेगारीचे 1 लाख 28 हजार 531 गुन्हे नोंदविण्यात आले असून त्यापैकी महाराष्ट्रात 14 हजार 371 गुन्ह्यांची नोंद आहे. राष्ट्रीय स्तरावरील बालकांच्या गुन्हेगारीत महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे, तर त्याचवेळी 17 हजार 8 गुन्हे मध्य प्रदेशमध्ये नोंदविले असून ते राज्य प्रथम क्रमांकावर आहे. देशात महिलांवरील अत्याचाराचे 3 लाख 71 हजार 503 गुन्हे नोंद झाले. उत्तर प्रदेशात 49 हजार 385 गुन्ह्यांची नोंद झाली असून ते राज्य प्रथम क्रमांकावर आहे. तर महाराष्ट्रात 31 हजार 954 गुन्हे नोंद झाले असून महाराष्ट्र तिसर्‍या स्थानी आहे. ज्या महाराष्ट्राने महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात आवाज उठविला, जेथे मुलींसाठी शिक्षणाची द्वारे खुली झाली, विधवा विवाहाला प्रोत्साहन देण्यात आले, त्याच महाराष्ट्रातील महिलांच्यावरील वाढत्या अत्याचाराची स्थिती निश्चित चिंताजनक म्हणायला हवी.

भारतातील आर्थिक गुन्हेगारीच्या संदर्भाने आर्थिक भ्रष्टाचार व गैरव्यवहाराचे संदर्भाने नोंदविलेल्या तीन हजार 100 गुन्ह्यांपैकी एकट्या महाराष्ट्रातील 664 गुन्ह्यांची नोंद केलेली आहे. हे प्रमाण शेकडा 22 टक्के इतके आहे. भ्रष्टाचारात महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. देशात सायबर गुन्हेगारीत 50 हजार 35 गुन्ह्यांची नोंद केली असून महाराष्ट्रात पाच हजार 496 गुन्हे नोंदविले आहेत. हे प्रमाण शेकडा 11 टक्के आहे. राज्य विरोधात कारवाईचे भारतात एकूण 5 हजार 613 गुन्हे नोंदविले आहेत.

त्यापैकी महाराष्ट्रातील 252 गुन्हे असून महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. कधी काळी अत्यंत सुसंस्कृत महाराष्ट्र अशी महाराष्ट्राची ओळख होती; मात्र त्यात मोठ्या प्रमाणावर बदल होत असून भारतात नोंदविलेल्या 30 हजार 183 खुनांच्या गुन्ह्यांपैकी महाराष्ट्रात 2 हजार 229 गुन्ह्यांची प्रकरणे नोंदवली आहेत. खुनांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात दुसर्‍या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे आज आपण पहिल्या क्रमांकावर नसलो तरी उद्या पहिल्या क्रमांकावर येणार नाही हे काही सांगता येणार नाही. ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचारात महाराष्ट्रात वाढ झाली असून देशातील 24 हजार 794 गुन्ह्यांपैकी एकट्या महाराष्ट्रात 4 हजार 909 गुन्हे नोंदविले आहेत. महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहेत.

भारतातील अनुसूचित जातीच्या व्यक्तींवर झालेल्या अत्याचारांमध्ये 50 हजार 291 गुन्हे नोंदविले आहेत. त्यापैकी 2 हजार 569 गुन्हे महाराष्ट्रातील आहेत. जमाती संवर्गातील आठ हजार 272 गुन्हे संपूर्ण भारतात नोंदविले आहेत. त्यापैकी 663 महाराष्ट्रातील आहेत. भारतात आर्थिक गुन्हेगारीत 1 लाख 45 हजार 754 गुन्हे नोंदविले आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात 12 हजार 452 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. हे शेकडा प्रमाण 8.54 टक्के इतके आहे. महाराष्ट्राची वाढती गुन्हेगारी महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करणारी आहे. त्यामुळे कधी काळी अत्यंत सुरक्षित असणारे राज्य आता गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखाकडे वाटचाल करीत आहे. हे राज्याच्या प्रतिमेला धक्का देणारे आहे. राज्यातील राजकीय स्थिती, होणारे आरोप-प्रत्यारोप यातून प्रशासनावरील पकड सैल होत आहे का, याचाही विचार करण्याची गरज आहे. वर्तमान स्थितीत गुन्हेगारीवर आळा घालणे महत्त्वाचे आहे. पोलिस दलाची प्रतिमा उंचावल्याशिवाय गुन्हेगारीवर आळा बसणे अशक्य आहे. त्यासाठी राज्यकर्त्यांना अत्यंत कणखरपणे भूमिका घ्यावी लागणार आहे.

महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे साडेबारा कोटी असताना पोलिसांची संख्या मात्र 2 लाख 11 हजार 183 इतकी आहे. राज्यात एक लाख लोकसंख्येसाठी 169 इतके मनुष्यबळ आहे. सरासरी सहाशे लोकसंख्येला एक पोलिस हे प्रमाण तसे कमी आहे, असे अजिबात नाही. कायद्यानुसार कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्ह्यांचा शोध घेणे आणि गुन्हे टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही पोलिसांची मुख्य कामे आहेत. गुन्हे टाळणे, खटले भरणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, वाहतूक सुव्यवस्था, स्फोटक पदार्थांची तपासणी, पूर्वचारित्र्य तपासून देणे आदी कामे पोलिस करत आहेत. पोलिसांच्या नियमित कामापेक्षा त्यांच्यावर येणार्‍या इतर कामाच्या ताणामुळे तपासाला पुरेसा वेळ न मिळणे, गुन्हेगारांवर वचक न राखता येणे, आज गुन्हेगारी वाढते आहे म्हणून राजकीय आरोप-प्रत्यारोप होतीलही. पण त्याचा परिणाम समाजाला सोसावा लागणार आहे. त्यामुळे राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित येऊन गुन्हेगारीवर जरब बसविण्याची गरज आहे.

वाढती गुन्हेगारी ही महाराष्ट्रासाठी भविष्यात धोक्याची घंटा ठरण्याची शक्यता आहे. भारतात एकूण 66 लाख 1 हजार 285 तर त्यातील एकूण 5 लाख 39 हजार गुन्हे महाराष्ट्रात नोंद झाले. राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्रित येऊन गुन्हेगारीवर जरब बसविण्याची गरज आहे.

– संदीप वाकचौरे,
शैक्षणिक-सामाजिक घडामोडींचे अभ्यासक

Back to top button