लवंगी मिरची : अधिरांनी केलेलं रंजन! | पुढारी

लवंगी मिरची : अधिरांनी केलेलं रंजन!

लवंगी मिरची :

शहर : नवी दिल्ली.
स्थळ : लोकसभा.
वेळ : प्रश्‍नकाळाची.
वातावरण : नेहमीसारखेच. म्हणजे गोंधळाचे.
तर मंडळी, लोकसभेच्या प्रश्‍नकाळात धड काही प्रश्‍नोत्तरे झाली असतील, अमूक एका वक्त्याने मार्मिक प्रश्‍न विचारून अध्यक्षांना खोपच्यात पकडलेलं बघायला मिळालं, असं मानत असाल तर गंडलाहेत. याखेपेला कामकाजाचे पहिले दोनही दिवस महागाईने गाजवले. एकच मुद्दा, घाईचा! बोजा हटवा महागाईचा! तरी बरं, दुसर्‍या दिवसाची कार्यवाही सुरू करताना अध्यक्ष महोदय ओम बिरला यांनी हा ‘पवित्र शहीद दिवस’ असल्याचं स्मरण करून दिलं होतं.

स्वातंत्र्य संग्रामामधल्या शहीद भगतसिंह, राजगुरू, सुखदेव यांनी तरुण वयात देशासाठी बलिदान दिलं म्हणून आज आपण स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकतोय, यासाठी सदनाकडून त्यांना काही क्षण मौन पाळून श्रद्धांजली वाहावी, असा आदेश दिला होता; पण एकदा (चं) ते मौन उरकल्यावर विरोधी पक्ष जो काही सुटलाय म्हणता? नुसता घोषणांचा हंगामा. विरोधी मजकुरांचे फलक अध्यक्षांच्या तोंडासमोर नाचवणं किंवा पुढ्यातल्या टेबलावर बडवणं. काँग्रेस म्हणू नका, तृणमूल म्हणू नका, सपा-बसपा म्हणू नका, द्रमुक म्हणू नका, सर्वांनी फक्‍त महागाईचा मुद्दा लावून धरला.

ओम बिरला बिचारे मध्येच क्षीण स्वरात आठवण करून द्यायचे की, आपण सर्वांनी मिळून देशहिताचं कार्य करायचंय ना रे? अध्यक्षाचा मान राखणं हे ‘बेसिक’ हित तरी सांभाळाल की नाही? वगैरे… पण, तेवढ्यात कोणीतरी किंचाळायचं, ‘पहले आप बेसिक चीजोंके दाम संभालो.’ अध्यक्ष आणखी क्षीणपणे म्हणायचे, त्या दिशेने प्रयत्न जारी आहेत.

तेवढ्यात कोणीतरी त्यांच्याच दिशेने फलक भिरकावायला निघायचे. शहीदांचं स्मरण निघालं की, कोणीतरी बाकावर उभं राहून आठवण द्यायचं, ‘बाबो, काही क्रांतिकारी एकदाच शहीद झाले, त्यांचं स्मरण करतांना आमचं इथे महागाईने रोज मरण ओढवतंय, हे नजरेआड करू नका.’ पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या किमती भडकण्यावरून सभागृह पेटलं. अनेक विरोधी सदस्यांनी वॉकआऊट केलं.

ओम बिर्लांचं शांती पाळण्याचं अपिल तेल लावत गेलं. प्रश्‍नकाळाची पहिली चाळीस मिनिटं अशी हलकल्लोळात गेल्यावर उरलेली वीस मिनिटं सदन स्थगित केलं गेलं. आपलाच मुद्दा लावून धरण्यासाठी अधीर झालेल्या सभासदांनी एकुणात मजबूत रंजन केलं. तिकडे काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी ‘सदन चलानेका यह तरीका नही’ वगैरे बोलत होतेच.

अशा या जंक्शन रंजन कार्यक्रमानंतर आम्ही मात्र आत्मचिंतनाला लागलो. अन्‍नधान्य, औषधं, प्रवास, निवास, वीज, पाणी सगळंच डोईजड महाग होत चाललंय. इस्पितळांच्या अफाट बिलांमुळे मरणही स्वस्त राहिलेलं नाही; पण या कंठाळी लोकांपैकी किती जणांनी खरोखर आपापलं सदन ऊर्फ घर चालवण्यासाठी हाती पिशवी घेऊन बाजार गाठला असेल बरं? खाद्यतेलाची पिशवी दोनशे रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे ‘महिनेमे सिर्फ एकही बार घरमें पकोडे बनेंगे’ असा आदेश खुद्द अधीर रंजनजींना काढावा लागला असेल का? तसंच सदनात मध्येच चिवचिव करणार्‍या सोनियाजींनी ‘राहुल, टुम पिज्जापर एक्स्ट्रा चीज मत ऑर्डर करो. म्यांगा परता है,’ असं कधी म्हटलं असेल का?

– झटका

Back to top button