टोईंगची इंगळी डसली | पुढारी

टोईंगची इंगळी डसली

‘काहो अण्णा, असा चेहरा पाडून का फिरताय?
नाय हो तात्या.. बरा आहे की!
कुठे काही दुखतंय, खुपतंय? मारबीर बसलाय अंगाला?
माझ्या नाही, पण माझ्या गाडीच्या अंगाला बरंच कायकाय झालंय.
अरेच्चा. तुम्ही हल्लीच नवी गाडी घेतलीत ना?

हो ना! गाडी नवी आहे म्हणून जास्तच हळहळ वाटतेय हो. चक्क टो करून नेली. ठिकठिकाणी चरे ओढल्येत. कडेचा आरसा वाकडा झालाय, पुढची चाकं पुरती चिखलाने बरबटलीयेत. बघवत नाही गाडीकडे.
काय सांगता? तुमची गाडी टो करून नेली? म्हणजे पुरती फरफट, हालत झाली असणार तिची. रस्त्यातून जातायेताना कधीकधी दिसतात की हे उद्योग. हुकाला अडकवून चारचाकी वर काय उचलतात, धाडकन् एखाद्या ट्रकाबिकात काय आदळतात, नाहीतर दुसर्‍या गाडीला जोडून दोन चाकांवर ओढत काय नेतात, सूड, सूड घेतात जसा काही वाहनाचा!
त्यातलंच काहीतरी केलंय बहुतेक माझ्याही गाडीचं.
पण तुम्ही काय गुन्हा केलात?

राँग पार्किंग म्हणे.
पण तुम्हाला तरी राँग पार्किंग करायची अवदसा का आठवली?
आता काय सांगायचं? माझा नेहमीचा रस्ता. एवढे दिवस रस्त्याच्या ज्या बाजूला पार्किंग होतं, तिथेच खूप सारं खणून ठेवलेलं! त्या दगडगोट्यांच्या डोंगरदर्‍यांमध्ये गाडी कुठे लावणार? सांगा. मग नाइलाजाने विरुद्ध बाजूला लावावी लागली. शेवटी पतंगासारखी झाडाला टांगता तर येत नाही ना चारचाकी?

संबंधित बातम्या

होय हो. आणि घडी करून रस्त्याच्या कडेला सरकवूनही ठेवता येत नाही. भिंतीला टेकून लोखंडी कॉटची घडी ठेवल्यासारखी! मी म्हणतो, तुमच्या मते आमच्या हातून गुन्हा झालाय ना? मग मजबूत दंड करा ना वाटल्यास; पण धिंड का काढता?
आणि गुन्हा, गुन्हा तरी नक्की कोणाचा म्हणायचा? बारा महिने वेडेवाकडे रस्ते खणून ठेवणार्‍यांचा? अचानक एखादा रस्ता ‘नो एंट्री’ करून टाकणार्‍यांचा? पी 1; पी 2 ह्या पाट्या कशातरी, कुठेतरी लावणार्‍यांचा?
नाही नाही. ही नोकरदारांची कामं! त्या कोणाचा गुन्हा नाही. ती सगळी गुणी बाळं. आपण मात्र घाम गाळून ईएमआय भरत गाड्या बाळगतो म्हणजे आपणच गुन्हेगार.

आधीच पेट्रोलच्या महागाईने गाड्या बाळगणं कठीण होत चाललंय. हिंमत करून त्या घ्याव्यात तर पुढे हा टोईंगचा इंगा.
भरल्या पिकावर टोळधाड यावी ना, तशी भर रस्त्यात ही ‘टो’ वाल्यांची धाड येते. तिकडे शेतकरी आणि इकडे गाडीवाला, दोघंही आपल्या कष्टावर पाणी पडल्याचं हताशपणे बघत राहतात. पुढे खूप दिवस ही वाताहत निस्तरत राहतात. एक टोईंग काही हजारांना पडतं बघा. अशावेळी काय करावं?

नाही तरी सामान्य नागरिकाला यावर फार काही करता येतच नाही. तर सरळ त्याने गाणं गुणगुणून मनावरचा ताण कमी करावा.
बाई मला, टोईंगची इंगळी डसली.
अंगाअंगाची काहिली झाली, सांगा ही कळ कसली? गं बाई मला टोईंगची इंगळी डसली! आई गं, अयाई गं!

– झटका

Back to top button