आनंदाचे मोजमाप | पुढारी

आनंदाचे मोजमाप

‘आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे’ ही बालकवींची कविता केवळ जुनीच नव्हे, तर कालबाह्य वाटावी अशी परिस्थिती जगभरात निर्माण झाली आहे. काही छोट्या देशांनी आपला आनंद टिकवून ठेवला आहे आणि मोठे देश मात्र दिवसेंदिवस आनंदाला पारखे होत आहेत, त्याचेच प्रतिबिंब ‘वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स’मध्ये पडले आहे.

आनंदी देशांची यादी वगैरेंना काही अर्थ नाही, असेही कुणी म्हणू शकेल; परंतु ही यादी संयुक्त राष्ट्रांनी तयार केली आहे, हे लक्षात घ्यावे लागते. अशा प्रकारच्या अहवालाचे यंदाचे दहावे वर्ष. नागरिकाला मिळणारे आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक स्वातंत्र्य, स्वास्थ्य, देशातील भ्रष्टाचाराची पातळी आणि एकूण देशांतर्गत उत्पादन यानुसार लोकांच्या आनंदाचे विश्लेषण करून आनंदी देशांची यादी तयार केली जाते. यादी तयार करताना आधीच्या तीन वर्षांतील परिस्थितीचे मूल्यमापन केले जाते. कोव्हिडपूर्व आणि कोव्हिडनंतरच्या अशा दोन्ही काळांतील लोकांच्या भावनांचे विश्लेषण यावेळच्या अहवालामध्ये आहे. त्यानुसार अठरा देशांमधील लोकांमध्ये तणाव, दुःखात वाढ झाल्याचे आढळून आले. मात्र, लोकांना राग येण्याचे प्रमाणही कमी झाले. लोकांच्या स्वास्थ्यासाठी सामाजिक पाठिंबा, एकमेकांप्रती औदार्य आणि सहिष्णुतेची भावना तसेच सरकारी पातळीवरील स्वच्छ कारभार महत्त्वाचा असल्याचे या अहवालात आढळून आलेे. माणसाच्या जगण्याशी संबंधित खूप छोटे-छोटे मुद्दे असतात; परंतु त्याकडेही अनेकदा सरकारी पातळीवरून दुर्लक्ष केले जाते, लोकांच्या भावनांचा अनादर केला जातो त्याचे प्रतिबिंब अशा प्रकारच्या अहवालांमध्ये उमटत असते. जसे निवडणूक चाचण्यांमध्ये काहीवेळा गफलत होते आणि अंदाज चुकू शकतात.

तशा प्रकारे अशा अहवालात अंदाज पूर्णपणे चुकण्याची शक्यता नसते. काही कमी-जास्त होण्याची शक्यता असली तरी एकूण परिस्थितीच्या आकलनात फरक पडत नाही. सततच्या निवडणुका, निवडणुकांच्या तोंडावर उपस्थित होणारे विविध मुद्दे, मतांसाठी केले जाणारे ध्रुवीकरणाचे राजकारण या सगळ्याचा परिणाम लोकांच्या जगण्यावर होत असतो. गेल्या सात-आठ वर्षांत हॅपिनेस इंडेक्समध्ये भारत बराच खाली गेल्यामुळे त्याचे खापर विद्यमान सरकारवर फोडले जाणे स्वाभाविक आहे. त्यानुसार अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘लवकरच द्वेष आणि संतापाच्या निर्देशांकात आपण टॉपला असू शकतो,’ असे ट्विट करून त्यांनी या परिस्थितीचे खापर सरकारवर फोडले आहे.

त्यामुळे या प्रश्नाचे राजकारण होणे अटळ म्हणावे लागेल. वैशिष्ट्य म्हणजे ज्या पाकिस्तानमध्ये सर्वच पातळ्यांवर अनागोंदी आहे, राजकीय अस्थिरता आहे, आरोग्याची दैना आणि महागाईपासून सुरक्षिततेपर्यंत सगळ्या पातळ्यांवर लोक त्रस्त आहे, तो पाकिस्तान आनंदी देशांच्या यादीत भारताच्या खूप वर म्हणजे 121 व्या क्रमांकावर असल्याचे दिसून आले आहे! तो कसा काय? याचा स्वतंत्रपणे शोध घ्यावा लागेल! अफगाणिस्तानमध्ये आधीही फारशी स्थिती समाधानकारक नव्हती; परंतु तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर तिथे समस्यांनी उग्र रूप धारण केले आहे. त्यामुळे या देशाचे तळातील स्थान टिकून राहिले आहे.

अवघी 55 लाख लोकसंख्या असलेल्या फिनलंडमध्ये आरोग्य सेवा उत्तम दर्जाच्या आहेत. सरकार लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरवते, हे तेथील लोकांच्या समाधानाचे महत्त्वाचे कारण मानले जाते. लोकांना देशात किती सुरक्षित वाटते, हेही आनंदाचे मोजमाप करण्याचे एक परिमाण. फिनलंडमध्ये गुन्हेगारी जवळपास नसल्यासारखी स्थिती असल्यामुळे तेथील लोकांना सुरक्षित वाटते. फिनलंडमधील शिक्षणव्यवस्था युरोपमधील सर्वोत्तम मानली जाते. तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. इथल्या श्रीमंतांना आपल्या ऐश्वर्याचे प्रदर्शन करायला संकोच वाटतो. समानतेच्या मूल्याचा आग्रह आणि अवलंब यामुळेही इथले लोक आनंदी असतात. अर्थात, आनंदाची ही पातळी टिकून राहण्यासाठी त्या देशाचे आकाराने छोटे असणे, विपुल साधनसंपत्ती असणे हेही महत्त्वाचे ठरले आहे.

आनंदी देशांच्या यादीत डेन्मार्क दुसर्‍या, आइसलँड तिसर्‍या, स्वित्झर्लंड चौथ्या, तर नेदरलँड पाचव्या स्थानावर आहे. आनंदी असण्याचा देशांच्या श्रीमंतीशी संबंध नसल्याचेही या अहवालातून अधोरेखित झाले आहे. त्याचमुळे तर तीन क्रमांकांनी सुधारणा केलेली अमेरिका 16 व्या क्रमांकावर, ब्रिटन 17, फ्रान्स 20 व्या स्थानावर आहे. भारताची परिस्थिती तीन क्रमांकांनी सुधारली असली तरीसुद्धा 146 देशांच्या यादीत भारत 136 व्या क्रमांकावर आहे. जगाला योगापासून आयुर्वेदापर्यंत अनेक पातळ्यांवर मार्गदर्शन करणारा आणि विश्वगुरू म्हणवून घेणारा भारत आनंदी देशांच्या यादीत वरचे स्थान मिळवण्यासाठी धडपडतो आहे. कोरोनासारख्या महामारीचा देशातील नागरिकांनी मोठ्या हिमतीने मुकाबला केला. शेती आणि पूरक व्यवसाय-धंद्यांनी माणसाला तारले. या संघर्षाची नोंदही ठळकपणे व्हायला हवी. हॅपिनेस इंडेक्सबरोबरच अन्य याद्यांमध्येही भारताची परिस्थिती सुधारण्याची आवश्यकता आहे.

आरोग्य, शिक्षण, सामाजिक स्वास्थ्य, बेरोजगारी या क्षेत्रात अजूनही मोठा टप्पा गाठायचा आहे. दुसरीकडे अनेक प्रश्नांनी देशाला जखडले आहे. भय आणि भूकमुक्तीसाठी मोठा संघर्ष करावा लागतो आहे. जगण्यासाठी आवश्यक बाबी सहज उपलब्ध व्हाव्यात, त्यासाठी अनावश्यक संघर्ष करावा लागू नये, एवढीच लोकांची अपेक्षा असते. भौतिक सुविधांनी सुख मिळत असले तरी आनंद त्याहून निराळा असतो. आनंदाचे स्वप्न साकारण्यासाठी अजूनही अनेक पातळीवरची लढाई करतानाच निर्भेळ आनंदाचे पारदर्शी लक्ष्य ठेवावे लागणार आहे. प्रश्नांचेच डोंगर उपसावे तर लागतीलच, त्यासाठीचे जे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत, त्यांचे समाधानकारक उत्तरही शोधावे लागेल. देशातील काही माणसे श्रीमंत होत असताना सर्वसामान्य माणूस आनंदाच्या शोधात धडपडतो आहे. हे चित्र बदलेल, ही आशा.

Back to top button