फूट की एकजूट? | पुढारी

फूट की एकजूट?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये गांधी कुटुंबीयांचे समर्थन करणारा गट विरुद्ध असंतुष्ट जी-23 गट अशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. अपयशावर विचारविमर्श करण्यासाठी बोलावलेल्या कार्य समितीच्या बैठकीत सोनिया गांधी यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. नेहमीप्रमाणे गांधी कुटुंबाच्या समर्थक नेत्यांनी राजीनामा फेटाळून लावला. एकीकडे पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि त्रुटी दूर करण्यासाठी काम करणे गरजेचे असल्याचे गांधी समर्थक नेते सांगत असतानाच दुसरीकडे असंतुष्ट गटाचे नेते मात्र जुनेच मुद्दे उकरून काढत होते. ही आदळआपट संपत नाही तोच; गुलाम नबी आझाद यांच्या निवासस्थानी असंतुष्ट नेत्यांनी बैठक घेऊन भडास काढली. विशेष म्हणजे, शशी थरूर, भूपिंदरसिंग हुडा, मणिशंकर अय्यर यांच्यासारखे नेते पहिल्यांदाच जी-23 च्या बैठकीला हजर राहिल्याने गांधी समर्थक नेत्यांच्या पोटात गोळा उठला. त्यातूनच आधी भूपिंदरसिंग हुडा यांची राहुल गांधी यांच्याशी, तर गुलाब नबी आझाद यांची सोनिया गांधी यांच्याशी भेट घडवून आणण्यात आली.

नेतृत्वावरून आणि कामकाजाच्या पद्धतीवरून काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. अधीर रंजन चौधरी, मल्लिकार्जुन खर्गे, वीरप्पा मोईली, रणदीपसिंग सुरजेवाला आदी नेते गांधी कुटुंबीयांचे समर्थन करीत आहेत. मोदी युगाचा अस्त झाल्यावर भाजप अस्ताव्यस्त होईल आणि त्यानंतर देशाच्या राजकारणात केवळ काँग्रेसच राहील, असे धाडसी वक्तव्य वीरप्पा मोईली यांनी केले. काँग्रेस नेते, कार्यकर्त्यांना धीर देण्याचा प्रयत्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. असंतुष्ट गटाकडून पराभवाचे बरेचसे खापर राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यावर फोडले जात आहे. राहुल अध्यक्ष नसतानादेखील त्यांच्या मनमर्जीनेच पक्ष चालत असल्याचा, तर प्रियांका यांच्याकडे सारी सूत्रे असूनही उत्तर प्रदेशात काँग्रेसची वाताहत झाल्याचा जी-23 नेत्यांचा दावा आहे. युपीत पक्षाची मतांची टक्केवारी सहावरून अडीच टक्क्यांवर घसरली, जागाही सातवरून दोनवर आल्या.

या पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे घेतले. मात्र, 2014 सालापासून सतत पराभव होत असूनही राष्ट्रीय नेतृत्वाला अभय का? असा सवाल असंतुष्ट गटातील नेते विचारत आहेत. कपिल सिब्बल हे काँग्रेस नेतृत्वाविरोधात जास्त आक्रमक आहेत. त्यामुळेच सिब्बल यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला जात आहे. आरोप-प्रत्यारोपांची परिणती पक्षाच्या फुटीत होणार की, दोन्ही गटांची दिलजमाई होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जी-23 गटाचे नेते काँग्रेस नेतृत्वावरचा दबाव वाढवत आहेत. जुलै महिन्यात होणारी राष्ट्रपतिपदाची निवडणूक तसेच वर्षअखेरीस होणार्‍या हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची जणू सत्त्वपरीक्षाच होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे होम स्टेट असलेल्या गुजरातमध्ये गतवेळी काँग्रेसने भाजपच्या नाकात दम आणला होता.

केवळ भाजपमुळे काँग्रेससमोरची आव्हाने वाढली आहेत असे नाही, तर अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’मुळे देखील काँग्रेसला घरघर लागली आहे. दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्ये ‘आप’ हा काँग्रेसचा पर्याय बनला. ‘आप’मुळे इतर कोणा पक्षापेक्षा काँग्रेसचेच जास्त नुकसान झाले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत ‘आप’शीही काँग्रेसला सामना करावा लागणार आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसकडे करण्यासारखे जास्त काही नाही. मात्र, गुजरात आणि हिमाचलमध्ये भाजपविरोधात उट्टे काढण्याची संधी पक्षाकडे आहे; पण त्यासाठी स्वतःला गटबाजीतून सावरत पक्षाने ‘फिनिक्स’ भरारी घेणे नितांत गरजेचे आहे.

– कमलेश गिरी 

Back to top button