काँग्रेससाठी धोक्याची घंटा | पुढारी

काँग्रेससाठी धोक्याची घंटा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात सुरू केलेले तिसर्‍या आघाडीचे प्रयत्न ही भाजपसाठी नव्हे, तर काँग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. गेले काही दिवस राष्ट्रीय पातळीवर भाजपविरोधात एकच मजबूत आघाडी उभी करण्याच्या विरोधकांच्या प्रयत्नांना त्यामुळे मोठा धक्का पोहोचला आहे. भाजपच्या विरोधात रान उठवले, तरी अशी आघाडी आपल्या फायद्याचीच ठरणार असल्याची खात्री असल्यामुळे भाजपच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटणेही स्वाभाविक आहे. प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि त्यांचे अहंकार भाजपच्या पथ्यावर पडणार असून काँग्रेससाठी मात्र ते नुकसानकारक ठरणार आहेत. अर्थात, काँग्रेस पक्षाच्या पातळीवर त्याची कितपत दखल घेतली जाते आणि सर्वांना सोबत घेण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात, याबाबत आजच्या घडीला तरी साशंकता आहे. त्यामुळे तिसर्‍या आघाडीची खिचडी शिजते का आणि शिजली, तरी ती नेमकी कुणाच्या ताटात पडणार आणि कुणाच्या तोंडचा घास हिरावून घेणार, हे समजायला काही काळ जावा लागेल. केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला असल्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागणे स्वाभाविक आहे. निवडणुकीचे वेध लागले की, अनेकांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागतात. अर्थात, दिवसाढवळ्या पाहिलेली स्वप्ने कधी खरी होत नसतात. त्यामुळे ही स्वप्नेच संबंधित नेत्यांना आणि त्यांच्या पक्षांना घेऊन बुडत असतात. शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी हे आजघडीचे पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहणारे प्रमुख दावेदार असले, तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही नाव त्यांचे चाणक्य संजय राऊत यांच्याकडून अधुनमधून स्पर्धेत ढकलले जाते. सध्या ममता बॅनर्जी यांच्या संदर्भाने ज्या घडामोडी घडत आहेत, त्यामध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनीही या शर्यतीत आपले घोडे दामटल्याचे दिसून येते. ही आजघडीची काही प्रमुख नावे असली, तरी आणखी काही छुपे दावेदारही असू शकतात आणि ते योग्यवेळी रंगमंचावर येऊ शकतात. आजवरचे तिसर्‍या आघाडीचे चित्र पाहिले, तर नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा नेहमीच सत्तास्थापनेच्या आड आल्या आहेत. केंद्रीय राजकारणात काँग्रेस पक्ष मजबूत होता, तेव्हा विरोधकांचे जसे वर्तन होते, तसेच वर्तन आज भाजप सत्तेवर असतानाही दिसून येते. फरक एवढाच दिसून येतो की, त्यावेळी भारतीय जनता पक्ष लवचिक राहायचा आणि आज प्रचंड वाताहत होऊनही काँग्रेसला तशी लवचिकता अंगिकारता आलेली नाही. किंबहुना सत्तेवर असताना काँग्रेसकडे जो अहंकार होता, त्यात तसूभरही फरक पडलेला नाही. भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे असायला पाहिजे, हा त्या पक्षाचा आग्रह रास्त असला, तरी वर्तमान वास्तवात तसा आग्रह कितपत योग्य ठरतो, याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे; परंतु तसा तो केला जात नाही.

भाजपविरोधी आघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे असायला पाहिजे, या काँग्रेसच्या आग्रहाला तार्किक आधार जरूर आहे. काँग्रेस हा देशपातळीवर अनेक राज्यांमध्ये आस्तित्व असलेला एकमेव पक्ष आहे. बाकी प्रादेशिक पक्ष एकेका राज्यांपुरते मर्यादित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काँग्रेसची भूमिका आघाडीमध्ये महत्त्वाची असल्याचे म्हटले होते; परंतु नेतृत्व करायचे, तर त्यासाठीची इच्छाशक्ती काँग्रेसने दाखवायला हवी आणि नियोजनबद्ध प्रयत्न करायला हवेत. काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाबाबतचा संभ्रम अद्याप दूर झालेला नाही. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत; परंतु पक्षातील 23 सदस्यांनी लिहिलेल्या पत्रानंतर आपणच पक्षाच्या पूर्णवेळ अध्यक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. प्रकृतीच्या कारणांमुळे त्या पक्षसंघटनेसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थितीही नाकारता येत नाही. लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन राहुल गांधी मधेच लोंबकळत राहिले आहेत. धड अध्यक्ष नाहीत आणि अध्यक्षपदावर फेरनियुक्तीची प्रक्रिया लवकर होत नाही. सध्या संसदेत आणि संसदेबाहेरही पक्षाचे नेतृत्व तेच करीत असले, तरी आजघडीला ते पक्षाचे अधिकृत नेते नाहीत. ते उद्याचे अध्यक्ष असू शकतील; परंतु अशा भावी नेत्याशी कुणी अधिकृत राजकीय चर्चा करीत नाही. राहुल गांधी यांनी संसदेत आक्रमक भाषण करून आपल्या नेतृत्वाची झलक दाखवली आहे. अशा भाषणामुळे विरोधकांनी आपले नेतृत्व मान्य करावे, असे त्यांना वाटत असेल, तर ते शहाणपणाचे नाही. कारण, विविध पक्षांची मोट बांधायची, तर त्यासाठी संवादाचा पूल बांधावा लागतो. विविध विषयांवर सर्वांना सोबत घेण्याची भूमिका घ्यावी लागते. त्यासाठी काही वेळा नमते घेऊन दुसर्‍याच्या दारात जावे लागते. पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतर ममता बॅनर्जी यांच्याशी पुन्हा संवाद प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेसच्या पातळीवरून काहीही प्रयत्न झालेले नाहीत. मधल्या काळात तिसर्‍या आघाडीच्या संदर्भाने काही हालचाली झाल्यानंतरही काँग्रेसकडून त्यांना कोणताच प्रतिसाद मिळालेला नाही. अशा स्थितीत काँग्रेसला वगळून तिसरी आघाडी उभारण्याचे प्रयत्न होणे स्वाभाविक म्हणता येईल. परंतु, ममता बॅनर्जी, चंद्रशेखर राव यांच्याव्यतिरिक्त किती प्रादेशिक नेते प्रतिसाद देतात, हे पाहावे लागेल. कारण, महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बिहारमधील राष्ट्रीय जनता दल, तामिळनाडूमधील द्रमुक, झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्ष काँग्रेसची साथ सोडून काही वेगळा विचार करतील, अशी शक्यता दिसत नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष आपल्या वाटेने जाईल, आम्ही आमच्या वाटेने जाऊ, असे ममता बॅनर्जी कितीही म्हणत असल्या, तरी ही आघाडी आकाराला येण्यासाठी आणखी काही कालावधी जावा लागेल आणि काहीही घडले, तरी ते भारतीय जनता पक्षाच्या पथ्यावर पडणारे असेल.

Back to top button