नव्या वर्षातले शुभ वर्तमान | पुढारी

नव्या वर्षातले शुभ वर्तमान

जगभरातील मानवी जीवन धोक्यात आणून लाखो लोकांना मृत्यूच्या खाईत लोटणार्‍या कोरोना महामारीच्या तिसर्‍या लाटेतून महाराष्ट्रासह देश बाहेर पडतोय, देशभरातील कोरोना रुग्णांची संख्या लाखाखाली आली आणि ती झपाट्याने घटत आहे, हे नव्या वर्षातले शुभ वर्तमान म्हणावे लागेल. तिसर्‍या लाटेसोबत आलेल्या ओमायक्रॉनच्या संकटाची जी भीषणता पाश्चिमात्य देशांनी अनुभवली, त्या तुलनेत आपल्याकडे तीव्रता जाणवली नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबई अनेक कारणांनी अशा बाबींसाठी पोषक ठरते. त्यामुळे ओमायक्रॉनचा धोका जाणवू लागला तेव्हा मुंबईसह महाराष्ट्र भीतीच्या छायेत होता.

एक महिन्यापूर्वी म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातील मुंबईतील परिस्थितीकडे मागे वळून पाहिले, तरी ही भीती अनाठायी नव्हती याची कल्पना येऊ शकते. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी, तापाने आजारी माणूस नाही, असे घर मुंबई परिसरात शिल्लक नव्हते. सुदैव एवढेच की, ओमायक्रॉनचा प्रसार वेगाने होत असला, तरी त्याची तीव्रता डेल्टा व्हेरियंटसारखी नव्हती.

त्यामुळे ओमायक्रॉनचा कहर झाला, तरी नेहमीच्या सर्दी-तापाच्या साथीपेक्षा त्याची तीव्रता अधिक जाणवली नाही. राज्याच्या सर्वच भागांत आलेली सर्दी-तापाची साथही आता ओसरली आहे आणि रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. पुणे आणि नागपूर या दोन मोठ्या शहरांचा अपवाद वगळता मुंबईसह राज्य कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडत आहे. याच गतीने पुणे, नागपूरमधील रुग्णांची संख्याही कमी होईल. जगभरातील आजवरच्या महामारीच्या संकटांचा अभ्यास करून संबंधित विषयातील तज्ज्ञ काही निष्कर्ष मांडत असतात.

पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट अधिक तीव्र असू शकते, असे तज्ज्ञांनी सांगितले होते. परंतु, पहिली लाट ओसरल्यानंतर कोरोना गेला असे समजून एकूण लोकांच्या वर्तनव्यवहार आणि जीवनशैलीमध्ये ढिलेपणा आला. कोरोना काळात जी बंधने पाळली जात होती, त्याकडे दुर्लक्ष झाले. परिणामी, दुसर्‍या लाटेचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला. आपल्या जवळपासचे, नात्यातले किंवा कुटुंबातले लोक गमावल्याचे दुःख अनेकांनी अनुभवले.

देशभरातील आजवरची आकडेवारी पाहिली, तर सव्वाचार कोटी लोकांना कोरोनाची बाधा झाली आणि पाच लाखांहून अधिक लोकांना जीव गमावावा लागला. महाराष्ट्रात 78 लाख लोक कोरोनाच्या तडाख्यात सापडले आणि एक लाख 43 हजार लोकांचा मृत्यू झाला. या आकडेवारीवरून कोरोनाची भीषणता लक्षात येऊ शकते. त्याचमुळे जेव्हा ओमायक्रॉन आणि तिसर्‍या लाटेची चर्चा सुरू झाली तेव्हा लोक पुन्हा हादरले.

2021 च्या अखेरच्या काही दिवसांत अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन, ऑस्ट्रेलियासह अन्य देशांतून येणारी माहितीही भीतीमध्ये भर घालणारी होती. अमेरिकेत तर ओमायक्रॉनमुळे रुग्णांच्या संख्येत 76 टक्के वाढ झाली होती. आठवडाभरात रोजच्या रुग्णांची संख्या दीड लाखांवरून अडीच लाखांपर्यंत पोहोचली होती. त्याहून भीतीदायक म्हणजे मुलांनाही त्याची बाधा होऊ लागली होती आणि रुग्णालयात दाखल कराव्या लागणार्‍या मुलांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली होती.

रुग्णांची संख्या वाढणे आणि मृत्यू होणे हे चिंतेचे एक कारण होतेच; परंतु आपल्याकडील सामाजिक परिस्थितीचा विचार करता तेवढेच एक भीतीचे कारण नव्हते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर स्थलांतरित मजुरांचे जे वास्तव समोर आले ते काळजी वाढवणारे होते. लाखो मजुरांना पायपीट करीत आपल्या गावापर्यंत पोहोचावे लागले होते.

ओमायक्रॉनच्या संकटाची तीव्रता वाढली आणि पुन्हा लॉकडाऊनची वेळ आली, तर कष्टकर्‍यांच्या जगण्यापुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची भीती होती. शिवाय उद्योगधंदे, व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम ही आणखी काही कारणे होती. या सार्‍याचा परिणाम एकूण अर्थव्यवस्थेवर आणि त्यावर अवलंबून असणार्‍या सर्वच घटकांवर झाला असता.

सुदैवाने तसे काही घडले नाही. नाताळ, सरत्या वर्षाचा निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत यानिमित्ताने सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी आणि त्यातून होणारा प्रसार हा धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने रात्रीची संचारबंदी जारी केली. कोरोनाचा विषाणू फक्त रात्रीच संचार करतो काय, असा प्रश्न विचाारत त्या निर्णयावर टीका झाली. गर्दी आणि प्रसार टाळण्यापुरतीच ती उपाययोजना होती, हे अनेकांच्या लक्षात आले नाही. महाराष्ट्राला चिंता होती ती मुंबईची.

आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे जगभरातून येणार्‍या प्रवाशांचा ताण मुंबईवर असतो, हे एक कारण आणि कोरोना प्रसारासाठी पोषक असलेली मुंबईतील दाटीवाटीची लोकसंख्या हे दुसरे कारण. पहिल्या टप्प्यात मुंबई विस्फोटाच्या तोंडावर होती; परंतु नंतर मुंबई महापालिकेने त्यावर नियंत्रण मिळवले आणि अखेरपर्यंत आपली पकड ढिली होऊ दिली नाही. ओमायक्रॉनच्या वेळीही मुंबईत चिंतेचे वातावरण होते. त्यात पुन्हा मुंबईला परिचित नसलेल्या कडाक्याच्या थंडीने दीर्घकाळ मुक्काम ठोकला. आता सगळीच परिस्थिती सुधारू लागली आहे.

मुंबईत सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये मोठी घट झाल्याचे चित्र दिसताना फक्त 356 रुग्णांची नोंद आढळली. त्याचवेळी दिवसभरात 949 रुग्ण बरे झाले. कोरोनाच्या विस्फोटाच्या काळात दररोज दहा-अकरा हजार रुग्णांची नोंद पाहिलेल्या मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांपर्यंत खाली आली आहे, यावरून निवळलेल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो. अर्थात, परिस्थिती सुधारली म्हणून कोणत्याही पातळीवरील हलगर्जीपणा योग्य ठरणार नाही.

पहिल्या लाटेनंतरच्या त्याच बेफिकिरी आणि बेजबाबदारपणाचा फटका सगळ्यांनी अनुभवला. त्यापासून बोध घेऊन आतासुद्धा दक्ष राहायला हवे. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याची तितकीच जबाबदारी सरकारचीही आहे. कोणत्याही स्थितीत त्यात ढिलाई परवडणारी नाही. नव्या लाटेला निमंत्रण मिळणार नाही, हे लक्षात घ्यायलाच हवे. मास्क, सॅनिटायझर आणि शारीरिक अंतर ही त्रिसूत्री आपल्या जीवनशैलीचा भाग बनली, तरच धोक्यापासून दूर राहता येईल.

Back to top button