विकासाचा गांधी मार्गच हवा! | पुढारी

विकासाचा गांधी मार्गच हवा!

जागतिकीकरण, बाजारीकरण याला पर्यायी विकास मार्ग हा गांधी मार्ग ठरू शकतो. गरजा मर्यादित करणे, चंगळवादास बळी न पडणे हे घडू शकते. मक्तेदारी ऐवजी विश्वस्तवृत्ती, रोजगार वाढवणारी ‘नयी तालीम’ हीच हिंद स्वराज्य व सुराज्य निर्माण करू शकते. वाढती विषमता, पर्यावरण प्रश्न, रोजगारवाढीची समस्या यातून गांधी मार्ग हाच कल्याणप्रद ठरतो.

थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी महात्मा गांधींच्या बाबतीत केलेले विधान, ‘असा हाडामांसाचा जिवंत माणूस होऊन गेला, यावर पुढच्या पिढीला विश्वास ठेवणे कठीण होईल,’ याची सत्यता आता तीव्रतेने जाणवू लागली आहे. याचे कारण महात्मा गांधींचे विचार आता स्वीकारण्याची अपरिहार्यता निर्माण झाली आहे. ‘सत्याचे प्रयोग’ करीत संपूर्ण आयुष्य निरलसपणे अहिंसा, सहिष्णुता, सत्य या तत्त्वत्रयींना दीपस्तंभाप्रमाणे ठेवून संपूर्ण मानवजातीच्या कल्याणास समर्पित करणारा ‘महात्मा’ आपणास भेटला, हे आपले अहोभाग्यच! परंतु, आजही त्यांच्या हत्येचा ‘सोहळा’ साजरा करणारी, त्यांच्या मरणास आतुर झालेली एक पारंपरिक टोळी आपले डोके वर काढत आहे. त्यांचा प्रश्न हा महात्मा मरत का नाही? तो अमर का आहे? या प्रश्नांची उत्तरे गेली सात दशकांहून अधिक काळ ते शोधत आहेत. महात्मा गांधींच्या अमरत्वाचा शोध त्यांच्या तत्त्वप्रणालीत असून हीच तत्त्वप्रणाली जागतिकीकरणाच्या भकास पर्वातून मार्ग दाखवू शकेल. यासाठी त्यांच्या विचाराची सद्यःस्थितीत आवश्यकता स्पष्ट होते.

हव्यासाच्या विकृतीचे बाजारीकरण

जागतिकीकरण ज्या तंत्र प्रगतीतून मोठ्या प्रमाणात विस्तारले त्यातून फायद्याचे केंद्रीकरण, विषमतेत प्रचंड वाढ, पर्यावरणाचा नाश आणि अब्जावधींच्या बेरोजगारीचे कारक ठरले. हेच तंत्र सुबत्ता, कल्याण वाढीचे सूत्र ठरू शकले असते. परंतु, तसे होणे बाजारव्यवस्थेला नको असल्याने हव्यास (ॠीशशव) हा गरज (छशशव) बाजूला सारणारा ठरला. कोरोनासारखी आपत्तीसुद्धा संपत्ती वाढवणारा महामार्ग ठरली.अब्जाधीशांची संख्या भारतातच 101 वरून 143 अशी वाढली आणि सर्वाधिक अब्जाधीश असणार्‍या देशांच्या यादीत भारत तिसर्‍या क्रमांकावर आला आहे. याच काळात जागतिक भूक निर्देशांकात मात्र आपण 113 देशांच्या क्रमवारीत 103 क्रमांकावर आहोत. म्हणजे ‘भुकेकंगाल’ सुवर्णपदक विजेते ठरलो. ऑक्सफॅम, पिकेटी या संस्थांचे अभ्यास, अहवाल वाढत्या विषमतेचे भयावह चित्र दर्शवत आहेत. विषमता व दारिद्य्र यातून दर चार सेकांदास एकाचा मृत्यू होणे हे हव्यासाच्या विकृतीचे बळीच आहेत. एका वर्षात उच्च पदस्थास मिळणारे उत्पन्न सर्वसाधारण कामगारास जर मिळवायचे असेल, तर त्यास 941 वर्षे काम करावे लागेल, इतकी उत्पन्न विषमतेची प्रचंड तफावत सध्या आहे.

जगण्याचे साधन संपुष्टात

रोजगार हा जगण्याचा अधिकार नव्या व्यवस्थेत संपुष्टात आणला गेल्याने त्याची किंमत अत्यंतिक दारिद्य्र वाढण्यात झाल्याचे दिसते. उत्पादन खर्च कमी करण्याचा मार्ग म्हणून कामगारांचे वेतन घटवण्यापेक्षा त्यांची संख्या घटवण्यावरच भर दिला. यातून बेरोजगारीच्या दराने उच्चांक गाठला. यातही पुन्हा आपल्याकडे श्रम सहभाग दर केवळ 42 टक्केच असल्याचे वाढत्या बेरोजगारीचे खरे, नेमके चित्र स्पष्ट होत नाही. एकूण श्रमशक्तीपैकी रोजगारावर असणारे व रोजगाराच्या शोधात असणारे यांचे श्रमशक्तीशी असणारे प्रमाण म्हणजे श्रम सहभाग दर होय. विदेशात तो 60 ते 72 टक्के आहे, तर आपणाकडे 42 टक्के. म्हणजे 58 टक्के श्रमशक्ती रोजगारच शोधत नाही. कारण, तो मिळण्याची शक्यताच नाही. यातही ग्रामीण क्षेत्र व महिला यांचे रोजगार चित्र अधिक भयावह आहे. अशी ‘रिकामी’ तरुण पिढी विविध राजकीय, धार्मिक विषयांवर एकत्रितपणे ‘कामी’ आणली जाऊन ‘सवंग’ प्रदर्शनाचे साधन ठरते. क्षुल्लक विषयांवर मोठे विवाद हे याचेच फलित आहे. दुर्दैवाने या भीषण प्रश्नावर सोयिस्कर मौन धोरणात व कृतीत असल्याने आपण एका महासंकटाकडे डोळेझाक करीत आहोत, हे स्पष्ट आहे.

शिक्षण, आरोग्य सर्व रामभरोसे!

उत्तम दर्जाची व्यापकपणे उपलब्धता असणारी शिक्षण व आरोग्य व्यवस्था निकोप समाजाचा आधार असतो. प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण हे बाजार व्यवस्थेच्या ताब्यात गेल्याने ती मर्यादितांची मिरासदारी झाली. कोरोना आपत्तीने हे आणखी बिकट केले. आरोग्याची सर्वांत मोठी बाजारपेठ हा भारताचा चेहरा कोरोना महारोगराईने अधोरेखित केला. आरोग्यावर जगभरातील खर्चाचे प्रमाण पाहिले, तर 18 ते 20 टक्के स्वतःच्या खिशातून व 80 टक्के सरकार करते. आपणाकडे हे नेमके उलट आहे. स्वस्त आरोग्य सुविधा केवळ शासकीय प्रचारात असून जे पैसे देऊ शकतात त्यांनाच फक्त आरोग्य सोयी उपलब्ध होत आहेत. कोरोना उपचाराच्या खर्चाने कर्जबाजारी होऊन गरिबी रेषेखाली 4 कोटी कुटुंबे गेल्याचे आकडेवारीतून दिसते. जगण्याची घटती साधने व वाढते खर्च यातून मरण स्वस्त होत असल्याचा अनुभव अनेक कुटुंबे घेत आहेत.

गांधी मार्ग

जागतिकीकरण, बाजारीकरण याला पर्यायी विकास मार्ग हा गांधी मार्ग ठरू शकतो. ज्या स्पर्धात्मक व्यवस्थेने प्रश्न सोडवण्यापेक्षा अधिक गुंतागुंतीचे व गंभीर केले त्यातून बाहेर पडण्यासाठी रोजगार केंद्रित चंगळवादास मर्यादा घालणारी ‘विश्वस्त’ रचना कालबाह्य नसून आज तीच कालसुसंगत ठरते. चंगळवादास पर्यायी ठरणारा ‘किमानवाद’ (चळपळारश्रळीा) आता नवी जीवनशैली बनत असून त्यातून आपल्या गरजा मर्यादित करणे, चंगळवादास बळी न पडणे घडू शकते. मक्तेदारीऐवजी विश्वस्तवृत्ती, रोजगार वाढवणारी ‘नयी तालीम’ हीच हिंद स्वराज्य व सुराज्य निर्माण करू शकते. वाढती असहिष्णुता काहींचे मतैक्य वाढवत असली, तरी त्यातून डोळ्यासाठी डोळ्याचा बदला घेणारी वृत्ती संपूर्ण मानवजातच आंधळी करेल, हा धोक्याचा इशारा महात्मा गांधींनी दिला होता. तो आज अधिक महत्त्वाचा वाटतो. वाढती विषमता, पर्यावरण प्रश्न, रोजगारवाढीची समस्या यातून गांधी मार्ग हाच कल्याणप्रद ठरतो. यासाठी ‘सबको सन्मती दे भगवान’ एवढेच म्हणू शकतो!

– प्रा. डॉ. विजय ककडे

Back to top button