सर्वस्पर्शी पद्मगौरव! | पुढारी

सर्वस्पर्शी पद्मगौरव!

कोणत्याही क्षेत्रात आयुष्य समर्पित केलेल्या आणि भविष्यात देशासाठी आणखी योगदान देऊ शकतील अशा दोन्ही गटांतील प्रतिभावंतांना पद्म पुरस्कार दिले जातात. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांनी गेल्या वर्षभरातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांची नोंद घेतानाच एका व्यापक, तसेच सर्वस्पर्शी द़ृष्टिकोनाचे दर्शन घडवले. ज्या पक्षाचे सरकार सत्तेवर असते त्या पक्षाची भूमिका पुरस्कारांमधून दिसत असली, तरी त्या पलीकडे जाऊन घेतलेला दुर्लक्षित प्रतिभांचाही शोध असतो. यंदाच्या पुरस्कारांसाठी निवडी करताना या नागरी सन्मानांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये, याची विशेष काळजी घेतलेली दिसते. उल्लेखनीय बाब म्हणजे यंदा उत्तर प्रदेशात सर्वाधिक तेरा, तर त्या खालोखाल दहा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले. तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख (सीडीएस) बिपीन रावत यांचा अलीकडेच हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या लष्करी सेवेतील कर्तृत्वाला मानवंदना देण्यासाठी त्यांना पद्मविभूषण या दुसर्‍या क्रमांकाच्या नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. गेली तीन वर्षे संपूर्ण जगाला कोरोनाच्या विषाणूने हैराण केले असून माणसाचे जगणे मुश्कील केले आहे. लस उत्पादन हाच त्यावरचा एकमेव मार्ग होता. त्यासाठी योगदान देणार्‍या सायरस पूनावाला, कृष्णा इला आणि सुचारिता इला यांची नावे पद्मभूषणच्या यादीत आहेत. राजकीय नेत्यांनी सार्वजनिक क्षेत्रात केलेल्या कार्याची दखलही या पुरस्कारांच्या निमित्ताने घेतली जाते. यावेळी भाजपचे दिवंगत नेते कल्याण सिंग यांच्यासह काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बुद्धदेव भट्टाचार्य यांची नावे पुरस्कार्थींच्या यादीत आहेत. त्याअर्थाने सरकारने राजकीय समतोल साधण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या विरोधी विचारांच्या लोकांचाही सन्मान केला. दुर्दैवाने बुद्धदेव भट्टाचार्य यांनी पुरस्कार नाकारला, तर गुलाम नबी आझाद यांच्या पुरस्कारासंदर्भात काँग्रेस पक्षातील त्यांच्या काही सहकार्‍यांनीच नकाराचा सूर लावला आहे. मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमधील तेवीस नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये गुलाम नबी आझाद यांचा समावेश होता. काँग्रेस नेतृत्वाविरोधात भूमिका घेतल्यामुळे त्यांना सन्मान दिल्याची टीका होत असली, तरी आझाद यांचे सार्वजनिक जीवनातील कार्य दुर्लक्षित करण्याजोगे नाही. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री, केंद्रातील विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी दीर्घकाळ सेवा केली आहे. यंदा क्रीडा क्षेत्राचा वाटाही उल्लेखनीय असून नऊ पद्मश्रींसह एक पद्मविभूषण त्यांच्या वाट्याला आले. पॅरालिम्पिकमध्ये तीन पदके मिळवणार्‍या आणि अपंग असूनही अतुलनीय जिद्दीचे प्रदर्शन घडवून तमाम देशवासीयांसाठी प्रेरणास्थान बनलेल्या भालाफेकपटू देवेंद्र झांझरियाला पद्मविभूषण जाहीर झालेे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणार्‍या नीरज चोप्रासह इतर नऊ जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. शिक्षण व साहित्य क्षेत्रात एक पद्मविभूषण, तीन पद्मभूषण आणि 28 पद्मश्री सन्मान जाहीर झाले. या क्षेत्रामध्ये मात्र महाराष्ट्राला एकही पुरस्कार मिळालेला नाही.

प्रख्यात गायिका प्रभा अत्रे यांना पद्मविभूषण जाहीर झाला. हा पुरस्कार मिळालेल्या यंदाच्या त्या एकमेव हयात व्यक्ती. इतर तीन पद्मविभूषण पुरस्कार मरणोत्तर असून त्यामध्ये शिक्षण व साहित्य क्षेत्रातील राधेश्याम खेमका, तसेच जनरल बिपीन रावत आणि कल्याण सिंह यांचा समावेश आहे. प्रभा अत्रे यांनी भारतीय शास्त्रीय संगीताचा जगभर प्रसार करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. प्रतिभावंत गायिका म्हणून त्यांची ख्याती आहेच, शिवाय संगीतकार, लेखिका, संगीत क्षेत्रातल्या विद्वान म्हणूनही त्यांची ओळख. त्यांच्या जोडीने कोल्हापूरच्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांनाही पद्मश्री जाहीर झाला, हा महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रासाठी दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. प्रभाताईंची गायकी मर्मज्ञ संगीत रसिकांसाठी, तर सुलोचना चव्हाण यांची गायकी खेड्यापाड्यातल्या सामान्य कष्टकरी माणसाला ठेका धरायला लावणारी. लावणीच्या ठसक्याने महाराष्ट्राला वेड लावणार्‍या या गायिकेला मिळालेल्या पुरस्कारामुळे महाराष्ट्राच्या मातीतल्या लोककलेचाही सन्मान झाला आहे. जन्माने महाराष्ट्रीयन किंवा मराठी नसले, तरी जे महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झाले आणि महाराष्ट्रानेही ज्यांना आपले मानले अशा काही व्यक्तींचा सन्मान झाला आहे. त्यामध्ये टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर, अनिल राजवंशी आणि गायक सोनू निगम यांचा समावेश आहे. वैद्यकीय क्षेत्रातील सन्मानात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश झाला असून त्यामध्ये कुष्ठरुग्णांच्या सेवेला वाहून घेतलेले डॉ. विजयकुमार डोंगरे, प्रख्यात न्यूरॉलॉजिस्ट डॉ. भीमसेन सिंघल, विंचू आणि सर्पदंशावर संशोधन करणारे डॉ. हिंमतराव बावस्कर आणि दिवंगत डॉ. बालाजी तांबे यांचा समावेश आहे. वैद्यकीय शिक्षणानंतर कोकणातील एका छोट्याशा गावी सेवा बजावताना विंचू दंशामुळे अनेकांना जीव गमावावा लागत असल्याचे डॉ. हिंमतराव बावस्कर यांच्या लक्षात आले. कोकणातल्या कष्टकरी लोकांनी अक्षरशः विंचवासमोर नांगी टाकली होती. डॉ. बावस्कर यांनी विंचूदंशाचे औषध शोधले आणि एका दीर्घकाळच्या समस्येवर कायमस्वरूपी इलाज सापडला. अशाच पद्धतीने त्यांनी सर्पदंशावरील औषधही शोधले असून भविष्यात बी-12 जीवनसत्त्वाची कमतरता आणि कोरोना अशा विषयांवरील संशोधन त्यांना करायचे आहे. भविष्यातील संशोधनासाठी पद्मश्री पुरस्कार त्यांना निश्चितच प्रेरणादायी ठरेल. पद्म पुरस्कारांची एक प्रक्रिया असते आणि अनेक कसोट्यांमधून तावून सुलाखून निघालेल्या व्यक्तींचाच त्यासाठी विचार होतो. संबंधितांच्या संमतीनंतर पुरस्कारांची घोषणा केली जाते. असे असताना बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासह पश्चिम बंगालमधील तिघांनी पुरस्कार नाकारण्याचा प्रकार कसा काय घडला, याचे आश्चर्य वाटते. भविष्यात अशा घटना घडू नयेत आणि या नागरी सन्मानांच्या प्रतिष्ठेला धक्का लागू नये, याची काळजी संबंधित यंत्रणेने घ्यायला हवी. सर्व पुरस्कार विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

Back to top button