तैलबुद्धीची कर्तृत्वशलाका | पुढारी

तैलबुद्धीची कर्तृत्वशलाका

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापासून ते ओएनजीसीतल्या संचालिका अलका मित्तल यांच्यासारख्या ( कर्तृत्वशलाका ) अत्यंत मोठ्या कंपनीतील कितीही गुंतागुंतीच्या जबाबदार्‍या महिलांनी अत्यंत समर्थपणे पेलून इतरांसाठी नवा आदर्श रस्ता तयार करून दाखविला आहे…

सर्वच क्षेत्रांप्रमाणे भारतात अर्थव्यवहारावरही महिलांनी आपली छाप सोडली आहे. केंद्रीय अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांनी ( कर्तृत्वशलाका ) कोरोनासारख्या प्रतिकूल परिस्थितीतही अर्थसंकल्प सादर केले. यापूर्वी त्यांनी व्यापार व संरक्षणमंत्री म्हणूनही जबाबादारी सांभाळली. बायोकॉन लिमिटेडच्या किरण मजुमदार शॉ यांच्या कंपनीने अमेरिकेतही मुद्रा कोरली आहे. पीजे सुरेंद्र पार्क हॉटेलच्या प्रिया पॉल यांना तर त्यांच्या कामगिरीबद्दल पद्मश्री मिळाला. फॅशन डिझायनर रितू कुमारने वस्त्रप्रावरणांचा ब्रँड लोकप्रिय केला. इंद्रा नूयी पेप्सीच्या माजी मुख्याधिकारी असून, आज अमेझॉनच्या संचालक मंडळावर आहेत. तर कोटक महिंद्रमध्ये वीस वर्षे काम केल्यानंतर फाल्गुनी नायर यांनी ‘नायका’ ही कंपनी स्थापन करून सौंदर्य प्रसाधने व वेलनेस उत्पादन क्षेत्रात नाव कमावले. वाणी कोला यांनी कल्लारी कॅपिटल ही कंपनी स्थापन करून 15 कोटी डॉलर्सचा फंड उभारला आणि व्हेंचर कॅपिटॅलिस्ट म्हणून कीर्ती मिळवली. आता ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशनच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी अलका मित्तल यांची नियुक्ती झाली आहे. त्या कंपनीत मनुष्यबळ विभागाच्या संचालक होत्या. ओएनजीसीमध्ये या पदावर बसलेल्या त्या पहिल्या महिला होत. अलका मित्तल या अर्थशास्त्रामधील पदव्युत्तर पदवीधारक असून, त्या एमबीएदेखील आहेत. शिवाय त्यांनी वाणिज्य आणि बिझिनेस स्टडीजमधील पीएच.डी.ही केली आहे. 1985 साली प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांनी ओएनजीसीत प्रवेश केला आणि नंतर कौशल्यविकास विभागप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. ओएनजीसीच्या विविध कौशल्यविकास केंद्रांमध्ये अलका यांनी एकसूत्रता आणली. तसेच ओएनजीसीमध्ये राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना राबवून, पाच हजार उमेदवारांना प्रशिक्षणाचा लाभ दिला.

भारतातील 70 टक्के कच्चे तेल आणि 84 टक्के नैसर्गिक वायूचे उत्पादन करणारी ओएनजीसी ही महारत्न कंपनी आहे. 2019-20 मध्ये ती सर्वाधिक फायदा कमावणारी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ठरली होती. 1956 साली स्थापन झालेली ओएनजीसी कंपनी 26 जागी तेल व वायूची खोदाई व उत्पादन करते. कंपनीने देशात 11 हजार किलोमीटरची पाईपलाईन घालण्याचे काम केले आहे. गेल्या वर्षात ओएनजीसीने 96 हजार कोटी रुपयांची उलाढाल करून 1 हजार कोटी रुपयांवर निव्वळ नफा कमावला. अशा एका महाकाय कंपनीचे नेतृत्व करण्याची संधी अलका यांना मिळाली आहे. चार वर्षांपूर्वीच संचालकपदी आल्यानंतर, इतक्या अल्पावधीत उच्चपदावर पोहोचण्याची करामत अलका यांनी करून दाखवली. सरकारी कंपन्यांचे नेतृत्व करणार्‍या महिला खूप कमी आहेत. सोमा मंडल ( कर्तृत्वशलाका ) या स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रमुख आहेत. दहा महारत्न कंपन्यांच्या 47 कार्यकारी संचालकांत केवळ चार महिला आहेत. ओएनजीसीत अलका मित्तल या एकमेव महिला संचालक आहेत. विशेष म्हणजे, ओएनजीसीतील कर्मचार्‍यांमध्ये फक्त आठ टक्के महिला आहेत.

मनुष्यबळ विभागप्रमुख म्हणून काम करताना, अलका यांनी ‘पीपल्स कनेक्ट’ हा उपक्रम आयोजित करून निवृत्त कर्मचारी आणि तरुण कर्मचारी यांच्यात संवादसेतू प्रस्थापित केला होता. तरुणांना ज्येष्ठांकडून मैत्रीपूर्ण मार्गदर्शन मिळावे, हा त्यामागील हेतू होता. कर्मचारी समस्या मोकळेपणाने मांडत नसल्याचे लक्षात आल्यावर अलका यांनी कर्मचार्‍यांशी व्यक्तिगत संवाद साधला. त्यानंतर हळूहळू ते मोकळेपणाने त्यांच्याशी बोलू लागले. समस्या शेअर करू लागले. ओएनजीसीत अलका ( कर्तृत्वशलाका ) यांनी अनेक लीडरशिप प्रोग्रॅम सुरू केले. त्यामुळे गुणी व्यक्तींना संघटनेत योग्य ती पदे प्राप्त होऊ शकली. कंपनीतील महिला कर्मचार्‍यांनी ऑफशोअर रिग्जवरील आव्हानात्मक जबाबदार्‍या स्वीकाराव्यात, असाही त्यांचा प्रयत्न राहिला. अत्यंत मोठ्या कंपनीतील कितीही गुंतागुंतीच्या जबाबदार्‍या महिला समर्थपणे पेलू शकतात आणि इतरांसाठी त्या नवा रस्ता तयार करू शकतात, हे अलका मित्तल यांच्या उदाहरणावरून अधोरेखित होते.-

  • अर्थशास्त्री

Back to top button