चीन : ‘ऊर्जानिर्मिती’ चीनची; चिंता जगाची! - पुढारी

चीन : ‘ऊर्जानिर्मिती’ चीनची; चिंता जगाची!

चीनने न्यूक्लिअर फ्यूजन रिअ‍ॅक्टरमधून 1056 सेकंदांत म्हणजेच अवघ्या 17 मिनिटांत 7 कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयोग यशस्वी केला. वाढती ऊर्जेची गरज लक्षात घेता या प्रयोगाकडे खरे म्हणजे सकारात्मकतेनेच पाहिले पाहिजे; परंतु हा प्रयोग चीनने केल्यामुळे संबंध जग त्याकडे संशयाच्या चष्म्यातून पाहत आहे.

चीनने नुकताच त्यांच्या न्यूक्लिअर फ्यूजन रिअ‍ॅक्टरमध्ये एक यशस्वी असा वैज्ञानिक प्रयोग केल्याचा दावा केला. चीनच्या हेफेई इथल्या न्यूक्लिअर फ्यूजन रिअ‍ॅक्टरमधून 1056 सेकंदांत म्हणजेच अवघ्या 17 मिनिटांत 7 कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा निर्माण करण्यात आली. गेल्या वर्षी 30 डिसेंबरला हा विक्रम करण्यात आला होता; मात्र त्याची माहिती आता जाहीर केली आहे. यापूर्वी या कृत्रिम सूर्याने 1.2 कोटी अंश सेल्सिअसची ऊर्जा निर्माण केली होती. त्यानंतर आता 7 कोटी अंश सेल्सिअस ऊर्जानिर्मिती करण्यात यश आले आहे.

चीनने नेमके काय केले ?

चीनने न्यूक्लिअर फ्यूजन रिअ‍ॅक्टरमध्ये एक वैज्ञानिक प्रयोग करून ऊर्जा तयार केली. ज्याचे तापमान 7 कोटी डिग्री सेंटिग्रेड होते. म्हणजेच जवळपास सूर्याच्या तापमानाइतके तापमान चीनने या प्रयोगातून निर्माण केले. अद्याप न्युक्लियर रिअ‍ॅक्टरमध्ये फिशन म्हणजे न्यूक्लिअर मटेरियलला स्प्लिट करून ऊर्जा तयार केली जाते. परंतु, फ्युजन म्हणजे न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरमध्ये हायड्रोजन बॉम्बची ऊर्जा तयार करणे शक्य झालेले नाही. अनेक देश यासंदर्भात संशोधन आणि प्रयोग करत आहेत; पण त्यांना यश मिळालेले नाही. आता चीन म्हणत आहे न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टरमध्ये फ्यूजन ऊर्जा तयार करण्यात आम्हाला यश मिळालेले आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की, यामुळे आम्हाला अतिशय मोठ्या प्रमाणात ऊर्जा तयार करता येईल आणि पुढील काही वर्षांमध्ये ते इतकी महाप्रचंड ऊर्जानिर्मिती करणारे न्यूक्लिअर रिअ‍ॅक्टर बनवू शकतील. 2040 पासून फ्यूजन पद्धतीने न्यूक्लिअर ऊर्जा तयार केली जाईल.

वास्तविक पाहता, ऊर्जा क्षेत्रात सुरू असणार्‍या संशोधनांचा फायदा हा अवघ्या जगाला होत असतो. भविष्यकाळात मानवी समुदायाला प्रचंड ऊर्जेची गरज भासणार आहे. त्यामुळे ऊर्जानिर्मितीच्या द़ृष्टीने पडणारे प्रत्येक पाऊल हे सकारात्मक द़ृष्टिकोनातूनच पाहिले जाते; पण ज्यावेळेला चीन असे प्रयोग करतो त्यावेळी त्याकडे अतिशय काळजीपूर्वक पाहावे लागते. कारण, पूर्वेइतिहास पाहता चीनकडून केले जाणारे सर्व दावे हे खरे असतातच असे नाही. बरेचदा त्या दाव्यांमध्ये फोलपणा तरी आढळतो किंवा त्यामागचा प्रत्यक्ष हेतू वेगळा असतो. आज तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अमेरिका ही जगातली नंबर एकची महाशक्ती मानले जात असून दुसर्‍या स्थानावर चीनची वर्णी लागते. ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रातील या प्रयोगाला यश आल्यास अन्य प्रगत देशांच्या चीन पुढे निघून जाईल. एखाद्या देशाची प्रगती ही दुसर्‍या देशासाठी मारक असते असे नाही; परंतु प्रश्न असतो तो या प्रगतीचा फायदा इतरांना होईल का? चीनचा विचार करता याचे उत्तर नाही असे आहे.

एखादे नवतंत्रज्ञान एखाद्या देशाला हवे असेल, तर चीन त्याला ब्लॅकमेल करू लागतो. एखाद्या देशाला आर्थिक गुलामगिरीत ओढू शकतो. अधिक क्षमतेची ऊर्जानिर्मिती हे दुधारी शस्त्र मानले जाते. संकेतांनुसार किंवा नियमांनुसार याचा वापर शांततेसाठी झाला पाहिजे; पण बरेचदा याचा वापर एक शस्त्र म्हणूनही केला जाऊ शकतो. जगाकडे न्यूक्लिअर बॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब आहेत. परंतु, हायड्रोजन इतक्या महाशक्तीचा बॉम्ब अजून कुणी तयार केलेला नाही. भविष्यात जो देश याची निर्मिती करेल तो सामरिक द़ृष्ट्या सर्वांत ताकदवान देश बनेल. म्हणूनच चीनच्या या संशोधनावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सगळ्या देशांनी एकत्र येऊन चीनने नेमके काय केले? त्याची क्षमता काय? याचे पारदर्शक मूल्यपान करणे गरजेचे आहे.

भारतावर काय परिणाम होणार ?

फ्यूजन एनर्जीच्या क्षेत्रामध्ये भारत अतिशय पिछाडीवर आहे. चीनची बरोबरी साधायची असेल, तर अत्यंत वेगाने संशोधन करायला हवे. ही बाब सोपी नाही. यासाठी आपण सौरऊर्जेसाठी ज्याप्रमाणे इंटरनॅशनल सोलर अलायन्स तयार केले तशाच प्रकारे फ्यूजन एनर्जीसाठी आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यक्रम सुरू केला पाहिजे. यामुळे संपूर्ण जगाची मदत घेता येईल आणि या ऊर्जेचा जगाला फायदा होईल, तसेच विजेची भरमसाट वाढणारी गरजही कायमची पूर्ण होण्यास मदत होईल.

तथापि, याचा दुसरा पैलू चिंताजनक आहे, तो म्हणजे गैरवापराचा! एखाद्या राष्ट्राने विशेषतः चीनने यामध्ये जर यश मिळवले, तर त्याचा हमखास गैरवापर हा भारतासारख्या राष्ट्राला ब्लॅकमेल करण्यासाठी केला जाऊ शकतो. खरे पाहता यासंदर्भात असणारा आंतरराष्ट्रीय कायदा अत्यंत सरळ आणि स्पष्ट आहे. त्यानुसार ज्यावेळी असे प्रयोग होतात त्यावेळी त्यामध्ये नेमके काय झाले, हे जग काळजीपूर्वक पाहते. एवढेच नव्हे, तर यापुढे जे प्रयोग केले जातील त्याची पूर्ण कल्पना जगाला देणे आवश्यक असते. या पार्श्वभूमीवर चीनच्या या नवप्रयोगाकडे जगाला लक्ष ठेवावे लागेल आणि चीनची क्षमता नक्की किती आहे, हे पाहावे लागेल. जगाचे कायदे अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाला एक शस्त्र म्हणून वापर करण्याची परवानगी देत नाहीत. तोच नियम चीनच्या विरोधात वापरला पाहिजे आणि या ऊर्जेतून कोणत्याही प्रकारे शस्त्र-अस्त्रनिर्मिती करता येणार नाही, असे बजावले पाहिजे. परंतु, चीन असे कुठलेही आंतरराष्ट्रीय कायदे पाळत नाही. दक्षिण चीन समुद्रातील चीनच्या वाढत्या दादागिरीच्या निमित्ताने ही बाब अनकेदा दिसून आली. येथील बेटांवर केवळ दावा सांगण्यापुरते मर्यादित न राहता ती गिळंकृत करून तेथे आपले लष्करी तळ, नाविक तळ बनवण्यापर्यंत चीनची मजल गेली. अमेरिकेसारख्या जागतिक महासत्तेच्या विरोधालाही चीन याबाबत जुमानत नाही, हे अनेकदा दिसून आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायदे पायदळी तुडवून चीन या ऊर्जेचा गैरवापर करत शस्त्रास्त्रांची निर्मिती करू शकतो. या पार्श्वभूमीवर भारतानेही आपले संशोधन सुरू केले पाहिजे. परंतु, या संशोधनासाठी प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. म्हणूनच आपल्याला आंतरराष्ट्रीय भागीदारी विकसित करावी लागेल. यातून फ्यूजन ऊर्जेचे संशोधन पुढे घेऊन जावे लागेल. तसे झाले नाही, तर भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाला चीनच्या या फ्यूजन ऊर्जेपासून धोका निर्माण होऊ शकतो.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन, निवृत्त

Back to top button