सरकार, शाळा उघडा! | पुढारी

सरकार, शाळा उघडा!

मांजराच्या गळ्यात घंटा कुणी बांधायची, हा प्रश्न अनेकदा पडतो. मांजराच्या भूमिकेत कुणी नाठाळ असल्याशिवाय हा प्रश्न पडत नाही; मात्र हा प्रश्न शाळेच्या घंटेशी नाते सांगेल, असे कधी वाटले नव्हते. शाळांची घंटा वाजवायची कुणी आणि कधी, असा मोठा गहन प्रश्न राज्य सरकारसमोर उभा आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये दीड वर्ष शाळाही बंद राहिल्या. गेल्या ऑक्टोबरच्या उत्तरार्धात त्या मोठ्या कष्टाने उघडल्या होत्या. मुलांचे हारतुरे देऊन, औक्षण करून, पेढे भरवून गुरुजींनी स्वागत केले; मात्र मध्येच दिवाळीची सुट्टी लागली. पाठोपाठ ख्रिसमसचीही सुट्टी आली. त्यानंतर जेमतेम महिनाभर भरलेल्या शाळा चार जानेवारीपासून पुन्हा बंद झाल्या. त्या उघडा, मुलांना शिकू द्या, अशी हाक राज्यभरातील शिक्षणतज्ज्ञांनी आता दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी पत्र लिहिले. कोरोनाचा संसर्ग शाळांमधून पसरतो, याला कोणताही आधार नाही. कोरोनाचे सर्व नियम पाळून शाळा सुरू राहू शकतात, असा या शिक्षणतज्ज्ञांचा सूर आहे. कोरोनाच्या भीतीने शाळा अशाच बंद राहिल्या, तर मुलांचे सलग दुसरे शैक्षणिक वर्ष घरात बसून वाया जाईल. तथाकथित ऑनलाईन शिक्षणाने ही मुले मागच्या वर्गातून पुढे जरूर ढकलली जातील; मात्र ही गुणवत्ता किंवा ही प्रगती केवळ कागदी ठरेल. मुले पुढे सरकली आणि त्यांचा बुद्ध्यांक मागेच राहिला, अशी परिस्थिती यातून निर्माण होऊ घातली आहे. ती वेळीच रोखा, असेही या तज्ज्ञांचे सरकारला सांगणे आहे. विशेष म्हणजे, जागतिक बँकेच्या शिक्षण संचालकांनीही आता स्पष्ट सांगितले की, शाळा बंद ठेवून तुम्ही मुलांना बौद्धिक दिवाळखोरीत ढकलत आहात. सतत शाळा बंद ठेवल्याने भारताचे शैक्षणिक दारिद्य्र 55 ते 70 टक्क्यांवर वाढेल, अशी भीती जागतिक बँकेचेे शैक्षणिक संचालक जेमी सावेद्रा यांनी गेल्याच आठवड्यात व्यक्त केली. कोरोनाचा संसर्ग शाळांमधून पसरतो, असे सरकार समजत असेल, तर त्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. असे असताना कोरोनाची लाट आली की, शाळा बंद करण्याचा धडाका महाराष्ट्रच नव्हे, तर देशभरातील सर्वच राज्य सरकारांनी लावला आहे. पहिली लाट, दुसरी लाट आणि तिसरी लाट सुरू आहे. अशा लाटा यापुढे येत-जात राहतील. शाळा कायमच्या बंद ठेवायच्या काय, असा प्रश्न जागतिक बँकेच्या या निरीक्षणातून पुढे आला. महाराष्ट्रात दुसरी लाट उतरणीला लागली आणि शाळा उघडल्या तेव्हा काही शाळांमधून कोरोनाचा संसर्ग झाला. पाठोपाठ मुले कोरोनाने आजारी पडली. मात्र, अशा शाळांचे प्रमाण हे बोटांवर मोजण्याइतके अत्यल्प आहे. बाकी शाळा गुण्यागोविंदाने सुरू असताना तिसर्‍या लाटेचा धसका घेऊन सरकारने सरसकट सर्वच शाळा बंद करून टाकल्या. यातून एक पिढी शैक्षणिकद़ृष्ट्या बरबाद होण्याची शक्यता निर्माण झाली. तिचा विचार करायचा कुणी? या पिढीच्या पदरात आम्ही आज असे लॉकडाऊनचे शैक्षणिक दारिद्य्र बांधत आहोत. या दारिद्य्राची किंमत उद्या या पिढीलाच मोजावी लागेल, हा जागतिक बँकेचा इशारा म्हणजे महाराष्ट्रातील शैक्षणिक चळवळींनी, शिक्षणतज्ज्ञांनी, शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब होईल. शाळा बंद ठेवण्याचा धोका आपल्या शिक्षणतज्ज्ञांना समजला, जागतिक बँकेलाही तो समजला. हा धोका समजण्याइतका बुद्ध्यांक राज्य सरकारकडे नाही, असे कसे म्हणता येईल?

शाळा म्हणा की बाजारपेठ, काहीही बंद करण्यापूर्वी राज्य सरकार कोरोनासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सशी चर्चा करत आले आहे. आरोग्य खात्याशी बोलत आले आहे. या टास्क फोर्सवर साथरोगांचेही तज्ज्ञ आहेत आणि आरोग्य खाते तर गेली दोन वर्षे कोरोनाशी मैदानात उतरून लढत आहे. या सर्व मंडळींनी सांगितले म्हणून सरकारने या तिसर्‍या लाटेत शाळा बंद केल्या. आता त्या उघडा, मुलांना शिकू द्या, त्यांच्या आयुष्यात अज्ञानाचा अंधार निर्माण करू नका, अशा हाका महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून दिल्या जात असताना डॉ. अभय बंग यांच्यासारख्या जाणत्या कार्यकर्त्याने आणि तज्ज्ञाने मात्र शाळाबंदीचे समर्थन केले. मुले घरून शाळेत जातात. घरात आजी-आजोबा, वयस्क माणसे असतात. मुले बाहेर खेळतात. तिथेही त्यांचा संपर्क अनेकांशी येतो. यातून संसर्ग वाढण्याचा धोका असल्यामुळेच राज्य सरकारने शाळा बंद केल्या. हा निर्णय नक्कीच वेडेपणाचा नाही, असे डॉ. बंग यांचे म्हणणे आहे. सरकारने ऐकायचे कुणाचे? शाळा उघडाव्यात तर कोरोनाची भीती, बंद ठेवाव्यात, तर एका पिढीच्या भवितव्याचा प्रश्न. कोरोनापेक्षाही अज्ञान हे अधिक धोकादायक होय. ज्या शाळेत संसर्ग होईल, त्या शाळेपुरते लॉकडाऊनचे काही निर्णय घेता येऊ शकतात. मात्र, एखाद्या शाळेत चार-दोन मुले कोरोना पॉझिटिव्ह निघाली म्हणून सरसकट राज्यभरातील शाळा बंद ठेवणे हे समाजाच्या हिताचे नाही. मुख्यमंत्री म्हणे आठ दिवसांत विचार करून निर्णय घेणार आहेत; पण आठ दिवसांनी शाळांची घंटा वाजवायची कधी, या प्रश्नाचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. प्रश्न एक पिढी घडवण्याचा किंवा कोरोनाच्या भीतीने बिघडवण्याचा आहे. त्यामुळेच फार तारतम्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागेल. ज्या शाळेत कोरोना गडबड करेल, त्या शाळेपुरते निर्बंध आणता येतील. अशा एक-दोन शाळांची शिक्षा म्हणून राज्यभरातील मुलांचे शिक्षण बंद करणे हा तारतम्याचा आणि शहाणपणाचा मार्ग नव्हे. शाळांचा लॉकडाऊन असाच सुरू राहिला, तर मुलांचे आयुष्य खुरटून जाईल. शाळा म्हणजे गंमत नव्हे. ‘शाळा माझ्या शिक्षणाच्या आड येते’ असे ख्यातनाम विचारवंत मार्क ट्वेन याने लिहून ठेवल्याचे सांगितले जाते, ते अर्धसत्य आहे. मी शाळेला कधीही माझ्या शिक्षणाच्या आड येऊ दिले नाही, हे त्याचे पूर्णवचन. याचा अर्थ मार्क ट्वेनने शाळा मोडीत काढली नव्हती. आयुष्याच्या शाळेतील धडे निराळे असतात. ते शिकताना शाळेतील चाकोरीबद्ध शिक्षण त्याने आडवे येऊ दिले नाही. आयुष्याला निधड्या छातीने भिडण्याचा हा संस्कारही त्याला शाळेनेच दिला, हे लक्षात घ्या आणि शाळा उघडा. अन्यथा, अज्ञानाच्या अंधारातून चाचपडणारी आजची ही पिढी म्हणेल, ‘सरकार आमच्या शिक्षणाच्या आड येते.’

संबंधित बातम्या
Back to top button