ठाण्यातील राजनाट्य; आघाडीत बिघाडी - पुढारी

ठाण्यातील राजनाट्य; आघाडीत बिघाडी

एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी आपापले बाले आणि किल्ले सांभाळून मैत्र जपले. आव्हाडांच्या कळव्यापासून टेंभी नाका काही मिनिटांच्या अंतरावर आहे; पण टेंभी नाक्यावर जाऊन दहीहंडी फोडावी, असे स्वप्न कधी आव्हाडांनी पाहिले नाही. शिंदेही कळवा ब्रिज उतरून आव्हाडांच्या इलाक्यात आले असतील, तर ते औपचारिक कार्यक्रमांसाठीच; पण आता शिवसेनेने ‘मिशन कळवा’ जाहीर केले. आव्हाडांनी आक्षेप घेताच तुम्हीही ‘मिशन वागळे’ हाती घ्या, असे प्रतिआव्हान देत शिंदे यांनी उद्याचे मैदान आखले.

परवा ठाण्याच्या खारेगाव उड्डाण पुलावर जे राजकीय नाट्य घडले, ते ठाण्यापुरते मर्यादित नाही. या राजनाट्याचे प्रयोग उद्या राज्यभरातील अनेक राजकीय मंचांवर होऊ शकतात. म्हणूनच नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे शड्डू ठोकून आमने-सामने येणे नोंद घेण्यासारखे आहे. शिंदे-आव्हाड यांचा मैत्रीचा संसार तसा गुण्यागोविंदाने चालला होता. निदान चित्र तरी तसे होते. ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला. तो भेदणे भाजपला अद्याप जमलेले नाही. आव्हाडांसारखा आक्रमक नेता असूनही राष्ट्रवादीनेदेखील सेनेच्या या बालेकिल्ल्यावर चढाई करण्याचा प्रयत्न केला, असे कधी घडले नाही. ठाणे महापालिकेत 67 नगरसेवकांसह शिवसेना सत्तेवर आहे. 34 नगरसेवकांसह राष्ट्रवादी दुसर्‍या क्रमांकावर आहे. ठाण्याची सत्ता काबीज करावी, असे स्वप्न राष्ट्रवादीने पाहूच नये, असा काही करार नाही, तरीही शिंदे आणि आव्हाड यांनी आतापर्यंत काही सीमारेषा आखून घेतल्या आणि पाळल्या. त्यामुळेच हे दोन्ही नेते महाराष्ट्र विकास आघाडी सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांना जुळवून घेणे फारसे अवघड गेले नाही, तरीही खारेगाव उड्डाण पुलाचे उद्घाटन करताना दोघांमध्ये जुंपली आणि कार्यकर्तेही भिडले. पुलाचे श्रेय कुणाचे हा त्यातला कळीचा मुद्दा होता. उद्घाटनाचा कार्यक्रम आखण्यापूर्वी शिवसेनेने आव्हाडांना, पक्ष राष्ट्रवादीला विचारलेदेखील नाही. त्यावरून आव्हाडांनी जाहीर नाराजी व्यक्त केली; पण ही नाराजी संघर्षाचे एकमेव कारण नव्हे. शिवसेनेचे महापौर नरेश म्हस्के यांनी अलीकडेच आव्हाडांचा बालेकिल्ला असलेल्या कळव्यात जाऊन विकासकामांचे उद्घाटन केले. सोबत एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे होते. या दोघांनीही शिवसेनेचे ‘मिशन कळवा’ जाहीर केले. आव्हाडांनी त्याची नोंद घेऊन ठेवली आणि उड्डाण पुलाच्या उद्घाटनात शिंदेंनाच विचारले, हे ‘मिशन कळवा’ काय आहे? एकीकडे आपण महापालिका निवडणुकीच्या रिंगणातही महाराष्ट्र विकास आघाडी उतरवण्याची भाषा करत असताना शिवसेना ‘मिशन कळवा’ कसे जाहीर करू शकते? त्यावर शिंदे म्हणाले, ‘मिशन कळवा’ म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा जिंकून आणायच्या. महापौरांच्याही मनात ‘मिशन कळवा’चा हाच अर्थ आहे. शिंदे इतकेच सांगून थांबले नाहीत. प्रत्येक पक्षाला आपला विस्तार करण्याचा अधिकार आहे. तुम्ही ‘मिशन वागळे’ हाती घ्या, आमची काही हरकत नाही, असे शिंदे म्हणाले. ठाण्यात कळवा आणि मुंब्रा हा राष्ट्रवादीचा म्हणजेच आव्हाडांचा बालेकिल्ला. ठाण्याच्या सत्तेवर असलेल्या शिवसेनेचा एकही नगरसेवक मुंब्य्रात नाही. तिथे राष्ट्रवादीचे 15, एमआयएमचे 2 आणि काँग्रेसचे 2 नगरसेवक आहेत. कळव्यात मात्र राष्ट्रवादीचे 9 आणि शिवसेनेचे 8 अशी विभागणी दिसते. ‘मिशन कळवा’चा अर्थ सरळसरळ कळव्यातील शिवसेनेच्या जागा वाढवणे असा होतो. कारण, कळव्यात ते शक्य आहे. मुंब्य्रासारख्या मुस्लिमबहुल भागात ते अजिबात शक्य नाही. शिवसेना असे काही ‘मिशन कळवा’ जाहीर करील, असे आव्हाडांना स्वप्नातही वाटले नव्हते. आधी म्हटल्याप्रमाणे एकनाथ शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी आपापले बाले आणि किल्ले सांभाळून मैत्र जपले. म्हणजे, आव्हाडांच्या कळव्यापासून टेंभी नाका काही मिनिटांच्या अंतरावर आहे; पण टेंभी नाक्यावर जाऊन दहीहंडी फोडावी, असे स्वप्न कधी आव्हाडांनी पाहिले नाही. बोलूनही दाखवले नाही. शिंदेही कळवा ब्रिज उतरून आव्हाडांच्या इलाक्यात आले असतील, तर ते औपचारिक कार्यक्रमांसाठीच. ‘चलो कळवा’ असा आदेश त्यांनीही कधी आपल्या शिवसैनिकांना दिला नाही. त्यामुळे आतापर्यंत दोघांची मैत्री गुण्यागोविंदाने नांदली. शेवटी राजकीय मैत्री फार भरवशाची नसते. या मैत्रीच्या भरवशावर शांतपणे झोपणे म्हणजे पाळलेला अजगर सोबत घेऊन झोपण्यासारखे आहे. आपल्याला वाटते, अजगर शांत झोपलाय. तो झोपलेला नसतो. तो आपले माप घेत असतो. आपल्याला कसे गिळता येईल, याचा अंदाज घेत असतो आणि एका बेसावध क्षणी त्याने तुम्हाला गिळण्यास सुरुवातदेखील केलेली असते. ठाण्यात शिवसेनेचे ‘मिशन कळवा’ हे याच जातकुळीचे आहे. शिवसेना कळवा ताब्यात घेण्यास निघाली, हे लक्षात आल्यानेच आव्हाड अस्वस्थ झाले. ‘मिशन कळवा’ हे महाराष्ट्र विकास आघाडीसारखेच आहे, असे शिंदे कितीही सांगत असले, तरी कुणी वेडाही त्यावर विश्वास ठेवणार नाही. एकीकडे ‘मिशन कळवा’ आघाडीसाठीच म्हणून सांगायचे आणि दुसरीकडे तुम्ही ‘मिशन वागळे’ हाती घ्या, असे आव्हान द्यायचे, यातून शिंदे यांनी उद्याचे मैदान आखले. वागळे हा शंभर टक्के शिवसेनेचा बालेकिल्ला. सर्वच्या सर्व 14 नगरसेवक सेनेचे. त्यामुळे ठरवले तरी ‘मिशन वागळे’ आव्हाड हाती घेऊ शकणार नाहीत. कळव्यात शिवसेना निम्म्या जागांवर आहे. तिथे मात्र शिवसेना आणखी पुढचा पल्ला गाठू शकते. असे वागळे आणि कळवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक महापालिकेच्या हद्दीत असू शकतात. परिणामी, ठाण्यात उद्भवलेला संघर्ष राज्यात ठिकठिकाणी भडकू शकतो. महाराष्ट्र विकास आघाडी उद्या टिकणार असेल, तर त्यासाठी ‘जैसे थे’चा करार शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला करावा लागेल. म्हणजे एकमेकांच्या संख्याबळाला धक्का लावायचा नाही. आपले संख्याबळ वाढवायचे असेल, तर भाजपने जिंकलेल्या जागा आपसात वाटून घेत त्या लढा आणि जिंका! आघाडीचा धर्म पाळा, असे शिंदे आणि आव्हाड यांनी खारेगाव उड्डाण पुलावरून सांगितले. हा धर्म पाळण्याच्या मनःस्थितीत मात्र शिवसैनिक नाहीत. ठाण्यात त्यातून राजकीय चकमकी सुरू झाल्या आहेत आणि या चकमकींचे नेतृत्व शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदेच तर करत आहेत.

संबंधित बातम्या
Back to top button