संघर्षयात्रा विसावली | पुढारी

संघर्षयात्रा विसावली

सामान्यांच्या पदरात न्यायाचे माप पाडण्यासाठी अहोरात्र झटणारे प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पुरोगामी आणि संघर्षशील चळवळींची खूप मोठी हानी झाली आहे. एन.डी. हे माझे मेहुणे. बहिणीचे यजमान. राज्यामध्ये मी मंत्री असताना ते विरोधी पक्षाचे नेते. त्या दरम्यान कठीण प्रसंग आले. त्यावेळी आमचा ‘व्हीप’ त्यांच्यासमोर चालला नाही.

विधिमंडळात 1978 मध्ये काँग्रेसमध्ये मतभेद झाले. त्यावेळी वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. मी मंत्रिमंडळातून बाहेर पडलो आणि राज्याची धुरा माझ्याकडे आली. नव्या मंत्रिमंडळाची यादी करताना एन. डी. यांच्या नावासाठी सर्वजण आग्रही होते. त्यांनी त्यास संमती दिली आणि त्यांच्याकडे सहकार खात्याचे काम दिले. अनेकदा त्यांची भाषणे ऐकली होती.

मात्र, मंत्रिमंडळ व प्रशासनात त्यांच्या कार्यशैलीचे वेगळेपण जाणवले. त्यांनी आपल्या कामाने स्वतःची छाप उमटवली. काम हातात घेतलं की, ते 100 टक्के पूर्ण करण्याची त्यांची हातोटी अचंबित करणारी होती. माझ्या बहिणीला एन. डी. यांना कधी-कधी थांबा म्हणून सांगावे लागत असे. ते हवे त्या पद्धतीने जीवन जगणारे होते. आमच्याकडून काही चूक झाली, तर झोडायलाही मागेपुढे पाहायचे नाहीत.

एन.डी. यांचा एकूण जीवनपट पाहिल्यास समाजातील सर्वसामान्यांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी संघर्षाची भूमिका घेणे हेच त्यांचे जीवनसूत्र होते. प्रकृती ठीक नसली, तरी शेतकर्‍यांची प्रकृती ठणठणीत राहावी, यासाठी ते नेहमी झटताना दिसले. त्यांचे विचार भावी पिढ्यांचे समाजमन घडविण्यासाठी प्रेरक ठरतील. ज्या काळात जुन्या पिढीला शैक्षणिक सुविधा नव्हत्या, शिक्षणाचा विचार नव्हता, ऐपत नसल्याने चौथी-पाचवीपर्यंत शिक्षण घेतले जात होते, शिक्षणाची संधी ही केवळ मर्यादित घटकांना होती, त्या काळात जिद्द, शिक्षकांची प्रेरणा, कुटुंबीयांची साथ व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मार्गदर्शनाच्या जोरावर

एन. डी. उच्चविद्याविभूषित झाले. ते कर्मवीरांचे आवडते विद्यार्थी होते. त्यांचा स्वभाव व पार्श्‍वभूमी संघर्षाची असल्याने हेच पुढे त्यांच्या जीवनाचे सूत्र बनले. सार्वजनिक जीवनात त्याचे प्रतिबिंब पडले.

कोल्हापूरकरांच्या बळावर विधानसभेचे सदस्यत्व मिळाल्यानंतर सातत्याने त्या पदाचा वापर त्यांनी सर्वसामान्यांच्या व्यथा मांडण्यासाठी केला. त्यांची राजकीय विचारधाराही डावी. शेतकरी कामगार पक्षासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचले.

एन.डी. यांनी दिलेले योगदान खूप मोठे आहे. देशात कुठेही कापूस एकाधिकार योजना नव्हती, त्या काळात कापूस पिकाला किंमत मिळत नव्हती. हे लक्षात घेऊन सहकार खात्याचे मंत्री असताना एन.डी. यांनी ही योजना मंजूर केली. कापूस पिकविणार्‍या शेतकर्‍याला किंमत मिळतेय का, हे कृषी उत्पन्‍न बाजार समितीत जाऊन पाहण्याची जबाबदारी घेतली. शेतकरी, कामगार, शोषित, पीडित, कष्टकरी यांच्याबरोबरच शिक्षण हाही त्यांचा आवडता विषय. त्या काळात त्यांनी शिक्षणाच्या आकृतिबंधाविरोधात महाराष्ट्रात जनजागृती करीत सरकारला अक्षरशः फोडून काढले होते. त्याकाळात ज्याच्यात कुवत त्यानेच शिकायचे, असे त्याचे स्वरूप होते.

एन.डी. यांच्या घणाघाताने सरकारला आकृतिबंधाचे धोरण बदलावे लागले. शिक्षणाचा अधिकार सर्वांना देण्यामागचे त्यांचे योगदान आपल्याला विसरता येणार नाही. सीमाप्रश्‍नाची अस्वस्थता मात्र त्यांच्या मनात अखेरपर्यंत कायम राहिली. मराठी भाषिकांची सोडवणूक करण्यासाठी अखंडपणे त्यांनी काम केले. सीमावासीयांच्या प्रेमाचा ओलावा त्यांना नेहमी मिळाला.

रयत शिक्षण संस्थेमार्फत महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी लक्षणीय कामगिरी केली. कर्मवीरांनी पाहिलेले स्वप्न त्यांच्यानंतर एन. डी. पाटील यांनी कृतीतून करून दाखविले. एन. डी. शंभरी नक्‍कीच गाठतील, त्यांचा दिवस कधी ढळणार नाही, विचारांचा मधूघटही कधी रिता होणार नाही, असे वाटले होते; पण त्यांच्या जाण्याने एक प्रदीर्घ संघर्षयात्रा विसावली आहे.

खा. शरद पवार

Back to top button