लवंगी मिरची : मलमपाट्या | पुढारी

लवंगी मिरची : मलमपाट्या

इतके दिवस आम्ही मलमपट्ट्या हा मराठी शब्द ऐकून होतो; पण ‘मलमपाट्या’ हा खरा शब्द असायला पायजेल, हे या ठिकाणी आमच्या नेमकं लक्षात आणून दिल्याबद्दल मंडळ आभारी आहे. आता रस्त्यावरच्या दुकानांना मराठी पाट्या लागणार म्हणून बेहद्द खूशही आहे.

‘न्यू केक शॉपी’ किंवा ‘आयडियल स्टेशनरी डेपो’ अशी नावं चक्क देवनागरी वळणात दिसणार ही मोठीच क्रांती आहे आणि या ठिकाणी क्रांती व्हायलाच हवी असं मानणार्‍यांपैकी आम्ही एक आहोत. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांच्या कोणत्याही गावी जाऊन बघावे. दुकानांची, रस्त्यांची नावं, घरावरची मालकांची नावं अगोदर स्थानिक भाषेत लिहिलेली असतात. मग, खाली वाटलं, तर कोणी इंग्रजीत लिहितात. कोणी तेही करत नाहीत.

आपल्यासारखं तिथल्या लोकांना ‘मातृभाषेतले वर्डस् रिमेंबर करायला डिफिकल्ट’ जात नाही. त्यांच्याकडच्या टी. व्ही. मालिकांच्या नायिका कधीच ‘वॉश घेऊन फ्रेश’ होत नाहीत. आपण बुवा मॉडर्न. आपल्याला आपली भाषा धड येत नसल्याचा अभिमान वाटतो. आपली भाषा, आपले खाद्यपदार्थ, आपले कपडे, आपल्या चालीरीती यांची आपल्याला लाज वाटते. ही सगळी परिस्थिती आता या मराठी पाट्या बदलणार. बाहेर मराठी पाटी, मनात मराठीप्रेमाची दाटी! ही क्रांती खरंतर खूपखूप पूर्वीच व्हायला हवी होती; पण पूर्वीची सरकारं उदार असल्याने त्यांनी ही क्रांती चालू सरकारसाठी राखून ठेवली.

संबंधित बातम्या

फर्मान निघालं. आता दुकानांच्या दर्शनी पाट्या मराठीतच असाव्या लागणार. आतला दुकानदार मराठी असेल, मराठीतच बोलेल याची काही खात्री नाही. खरेदीला आलेले मराठी ग्राहक मराठी बोलणार नाहीत, याची उलट खात्रीच आहे. सवयच उरली नाही ना कोणाला! मराठीपण सोडण्यात आपण सर्वात पाट्याईत, नव्हे, पटाईत झालोय ना? एरव्ही आपण कितीही काटकसरी असलो, तरी भाषेबाबत उधळं असायला हवं. भाषा वापरावी तेवढी वाढते. जनात पसरावी तेवढी मनामनात रुजते. दुकानांवर मराठी पाट्या लावणं हा फारच वरवरचा प्रयत्न झाला. सुरुवात म्हणून तो ठीक आहे.

मुलांना येता-जाता मराठी अक्षरं दिसतील तरी! पण, जखम खोलवरची आहे. नुसती वरती मलम, मलमपाटी लावून फार फरक पडणार नाही. घरात, मुलांशी, आपापसात मराठी बोललं पाहिजे. तुला क्वार्टर पोळी वाढू का, असं पोराला विचारणार्‍या मम्मीला, नव्हे, आईला कधीही माफ करू नये. दोन मराठी माणसं घरगुती संवादात ‘यूसी’, ‘आय नो’ करायला लागली की, त्यांना ‘नो’च म्हणावं. खरी पाटी मराठी मनामनांवर लागायला हवी. मराठीत शान, मराठीचा अभिमान!

Back to top button