शाळा म्हणजे काय हो बाबा? | पुढारी

शाळा म्हणजे काय हो बाबा?

शाळा म्हणजे काय हो बाबा?
अरे, शाळा म्हणजे जिथे तुम्ही मुलं शिकायला जाता ती जागा.
पण, आम्ही कुठे जातो शाळेत?
जाल हं लवकरच!
असं तुम्ही सारखंच म्हणता बाबा. मी दप्तर भरून गणवेश घालून तयार झालो की, एकदम ‘जाणं रद्द’ असं म्हणता.
काय करणार सोन्या? सरकारच तसं सांगतं.
सरकार म्हणजे काय हो बाबा? जे देश चालवतं ते नसतं का, सरकार? त्या सरकारला शाळा आवडत नाहीत का?

तसं नाही रे; पण सरकारला तुमची काळजी असते. तुम्ही आजारी पडू नये, असं वाटतं त्याला.
सगळे फक्त शाळेत गेले म्हणजेच आजारी पडतात का? हॉटेलात गेले तर नाही पडत?
तसं कसं? संसर्ग तर कुठेही होणारच.
काल आपण हॉटेलात गेलेलो, दूरदूर बसलेलो. तसं शाळेचं नाही का होणार?
हे बघ, हा धोरणात्मक निर्णय असतो. त्यात आपण नाक खुपसू नये.
मग, कशात नाक खुपसावं बाबा?
तू फार आगाऊ होत चाललायस हं!

आगाऊ म्हणजे काय हो बाबा? जो शाळेत जाण्याचा हट्ट करतो तो? पण, मागे म्हणजे खूपखूप पूर्वी मी एखाद्या दिवशी शाळेला जायचं नाही म्हणालो तर तुम्ही मला ‘आगाऊ’ म्हणायचात ना बाबा?
कारण, घरी बसून तू उनाडक्या करायचास.
मग, सध्या मी दुसरं काय करतोय बाबा?
ऑनलाईन शाळा असते ना तुझी?
शाळा असते, मी तिच्यात असतोच असं नाही. ना आसपास मित्र, ना समोर टीचर, ना दंगामस्ती, ना खोड्या काढणं! फार उदास वाटतं हो बाबा!
आता थोडं राहिलं हं. यंदा परीक्षा तरी नक्की शाळेत होईल बघ तुझी.

परीक्षा? म्हणजे पेनाने पेपर भरून लिहायचं तसली? मला नाही जमणार तसं एका जागी बसून सलग लिहिणंबिहिणं. प्रॅक्टिसच नाही ना!
मग कर. शिक्षण ही काही खेळखंडोबा करायची गोष्ट नाही.
हे तुमच्या त्या सरकारलापण सांगा ना बाबा! शाळेत जायचं, नाही जायचं, परीक्षा होणार, नाही होणार, पेपर खराखरा लिहायचा, नुसत्या टीका मारायच्या, काहीच तर नक्की ठरवता येत नाही त्याला. दोन वर्षांत मी शाळा पाहिलीही नाही धड. मला आठवण येते तिची.
माहितीये तुझं शाळाप्रेम. कोरोनाचं तांडव पाहून कोणीही बिचकणारच ना! असे व्हायटल डिसिजन्स घ्यायला? लोक काय, कुठूनही टीकाच करतात.

करतात ना? खात्री आहे ना? मग, आम्हाला शाळेत तरी जाऊ द्या बाबा. प्लीज!
नाही. कोरोना म्हणतो, उगाच घराबाहेर पडायचं नाही मुलांनी.
मग, तो त्याच्या छोट्या बाळाला कसा बाहेर सोडतो? ओमायक्रॉन म्हणजे कोरोनाचं बाळच ना बाबा? त्याला हिंडायची परवानगी आहे, मग आम्हाला का नाही बाबा?

पुरे रे तुझी किरकीर. मी चाललो जिमला. पन्नास टक्के उपस्थितीत जिम सुरू राहून चालतं, बागा मात्र उघडायच्या नाहीयेत अजून. जिमशिवाय मला चैन पडत नाही.

बाय बाबा! जाताच आहात तर माझ्या शाळेवरून जा आणि तिचा एक फोटो काढून आणा मोबाईलवर. तो पाहिला की मी तुम्हाला विचारत बसणार नाही, ‘शाळा म्हणजे काय हो बाबा?’

Back to top button