

महाराष्ट्र हे अत्यंत जागरूक आणि संवेदनशील राज्य म्हणून ओळखले जाते. मराठी माणसाची अस्मिता दुखावली की, तो कधीच शांत बसत नाही. सध्या मराठीच्या वापरावरून बराच गोंधळ सुरू आहे. आपल्याला येणारे बरेचसे फोन कॉल्स कॉल सेंटरवरून येतात आणि लोन घ्या प्रोडक्ट घ्या, इन्शुरन्स प्लॅन घ्या असा आग्रह करत असतात. हे बहुतांश कॉल हिंदी भाषेत गोड आवाजात बोलणार्या मुलींकडून आलेले असतात. अशावेळी येथे हिंदी भाषेचा वापर पाहिल्यानंतर बर्याच मराठी लोकांच्या लक्षात आले की, थेट मराठीमध्ये फारसे कॉल येत नाहीत. मोठ्या मोबाईल कंपन्या जसे की जिओ, एअरटेल यांच्या टोल फ्री नंबरवर केवळ इंग्रजी आणि हिंदी असे दोनच पर्याय असायचे. मराठी भाषकांनी आंदोलन केल्यानंतर आता त्यामध्ये मराठी भाषेचा समावेश झालेला आहे.
महाराष्ट्रातील मनसे हा राजकीय पक्ष सर्वप्रथम परप्रांतीयांना मराठीमध्ये बोलण्याचा आग्रह करतो आहे. यामुळे मराठी भाषिक लोक सुखावले आहेत. परप्रांतीयांच्या जिथे तिसर्या आणि चौथ्या पिढ्या महाराष्ट्रात वावरत आहेत, त्या अत्यंत उत्तम असं मराठी बोलत असतात. परप्रांतीय माणूस दिसला की, आपल्या मराठी लोकांना त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायचा जोर येतो. मराठी माणसाचे हिंदी म्हणजे अति भयंकर प्रकार आहे. मराठी माणसांचे हिंदी ऐकूनच मुघलांचे कित्येक सैनिक पळून गेले असतील, अशी विनोदी टिप्पणी पु. ल. देशपांडे यांनीही केली आहे. सांगायचा मुद्दा असा की, परप्रांतीयांनी आता मराठी शिकून घेतली पाहिजे आणि आवर्जून मराठीत बोलले पाहिजे, तर असे वाद उत्पन्न होणार नाहीत. ‘मी मराठी, तू मराठी, दोघेही बोलू छानपैकी मराठी’ असा राज्याचा नारा होण्याच्या मार्गावर आहे. मराठी भाषा जगली पाहिजे, जपली पाहिजे यासाठी ती दैनंदिन बोलीभाषा झाली पाहिजे, हे तितकेच महत्त्वाचे आहे.
मराठी शिकायची म्हणजे मराठीची शिकवणी लावून घेऊन प्रत्यक्ष शिकण्याची गरज नाही. कारण, ती आजूबाजूला आपल्या कानावर पडत असते. मराठी मुले इंग्रजी शाळेच्या माध्यमात गेल्यानंतर आणखी एक वेगळी गंमत असते. हे घरी मराठी बोलतात, शिक्षण इंग्रजीतून घेतात आणि विविध भाषा बोलणारे विद्यार्थी एकत्र येत असल्यामुळे ते हिंदीपण चांगले बोलतात. इंग्रजीवर प्रभुत्व असणे ही काळाची गरज आहे; पण मातृभाषेत सर्वात उत्कृष्ट आकलन होते, असे जगाने मान्य केले आहे. जपानचे उदाहरण घेतले, तर त्यांचे संगणकसुद्धा जपानी भाषेतच सेट केलेले आहेत. जर्मनीमध्ये तुम्ही नोकरीसाठी जाऊ इच्छित असाल, तर आधी तुम्हाला जर्मन भाषा येणे अत्यावश्यक आहे. जर्मनी या देशामध्ये जर्मन भाषाच बोलली जाते, तर महाराष्ट्र प्रांतामध्ये मराठीच बोलली जावी, हा आग्रह चुकीचा नाही. पुणेसारख्या शहरांमध्ये मराठी भाषा सर्वत्र वापरली जाते आणि ती बोलण्यामध्ये परप्रांतीय लोकांनीही कौशल्य प्राप्त केले आहे, असे दिसून येते. प्रश्न येतो मुंबईसारख्या कॉस्मोपॉलिटन शहराचा. देशाच्या विविध भागांतून आलेले लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात आणि त्यातून एका नवीनच भाषेची निर्मिती झाली आहे.