रशियाने वाढवली हल्ल्याची तीव्रता | पुढारी

रशियाने वाढवली हल्ल्याची तीव्रता

कीव्ह/मॉस्को : वृत्तसंस्था : रशियाने युक्रेनच्या सेवेरोडोनेटस्कमध्ये हल्ल्यांची तीव्रता वाढवली आहे. येथील एका नदीवरील पूल रशियाने उडवला. या भागातून लोकांना बाहेर काढण्यासाठी या पुलाचा वापर केला जात होता. रशिया काळ्या समुद्रातून युक्रेनच्या विविध शहरांवर सलग क्षेपणास्त्र हल्ले करत आहे.

दरम्यान, टेरनोपिलच्या गव्हर्नरनी म्हटले आहे की, रशियाने काळ्या समुद्रातून क्षेपणास्त्रे डागली आहेत. चोर्टकिव्ह शहरातील लष्करी तळावर हा हल्ला झाला आहे. येथील शस्त्रागार नष्ट झाले आहे. ही शस्त्रास्त्रे पाश्चिमात्य देशांनी मदत म्हणून पाठवली होती. या हल्ल्यात 22 जण जखमीही झाले आहेत. डोनेटस्कमधील हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत.

सेवेरोडोनेटस्कमधील एका रासायनिक प्रकल्पावरही हल्ला करण्यात आला आहे. येथे 300 ते 400 युक्रेनी सैनिक आणि अडकले आहेत. त्यांना शरण येण्याचे आवाहन रशियाने केले आहे. येथे आसरा घेतलेले 500 नागरिकदेखील येथे अडकून पडले आहेत. युक्रेनसाठी लढत असलेल्या एका माजी ब्रिटिश सैनिकाचाही मृत्यू झाला आहे. युद्धामुळे फास्ट फूड कंपनी मॅकडोनाल्डने त्यांचा येथील संपूर्ण व्यवसाय विकला आहे. त्यामुळे येथे रेस्टॉरंटचे नाव बदलण्यात आले आहे.

Back to top button