युरोपीय देश रशियातून तेल आयात बंद करणार | पुढारी

युरोपीय देश रशियातून तेल आयात बंद करणार

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धात (Russia Ukraine War) आता एक महत्त्वाचा टप्पा आला आहे, जेव्हा युरोपातील देशांनी अखेर भविष्यात रशियाकडून खनिज तेलाची आयात न करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्प्याटप्प्याने या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. युरोपीय संघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लिन यांनी या निर्णयाची घोषणा केली. युरोपीय संघाचा हा निर्णय म्हणजे रशियावरील मोठा आर्थिक घाव आहे.

दरम्यान, बुधवारी युक्रेनमधील डोनेस्टक येथे रशियाच्या हवाईदलाने केलेल्या हल्ल्यात 21 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अलीकडच्या काळातील डोनेस्टक येथील हा रशियाचा मोठा हल्ला आहे. मृतांमध्ये बहुतांश कारखान्यातील कामगार आहेत.

जपानच्या पंतप्रधानांवर रशियाचे निर्बंध (Russia Ukraine War)

रशियन परराष्ट्र मंत्रालयाने जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा, परराष्ट्र मंत्री योशिमासा हयाशी आणि संरक्षण मंत्री नोबुओ किशिओ यांसह 53 जपानी अधिकारी, पत्रकार, प्राध्यापकांवर निर्बंध लावले आहेत. या सर्वांना आता रशिया प्रवास करता येणार नाही.

पुतीन यांच्यावर शस्त्रक्रिया होणार?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना कर्करोग झाला आहे. त्यावरील उपचारार्थ पुतीन यांना शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याचे वृत्त काही अमेरिकन प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यामुळे काही काळ रशियाची सर्व सूत्रे पुतीन हे रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाय पेट्रुशेव यांच्याकडे सोपविण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोप पुतीन यांना भेटणार (Russia Ukraine War)

या युद्धात आतापर्यंत हजारोंचा जीव गेला आहे, तर लाखो लोकांनी स्थलांतर केले आहे. तरीही युद्धाची धग कमी होताना दिसून येत नाही. त्यामुळे आता ख्रिश्चनांचे सर्वात मोठे धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यापूर्वी पोप फ्रान्सिस यांनी या युद्धाची तुलना रवांडा येथील नरसंहाराशी केली होती. पुतीन यांच्याकडून मला काहीही उत्तर मिळालेले नाही. मी सध्या कीव्हला जाणार नाही. तिथे मी जायला नको. मला पहिल्यांदा मॉस्कोत जाऊन पुतीन यांना भेटायचे आहे, असे पोप फ्रान्सिस म्हणाले.

Back to top button