युक्रेनमध्ये 2500 किलोमीटर रस्त्यांसह 300 पूल उद्ध्वस्त | पुढारी

युक्रेनमध्ये 2500 किलोमीटर रस्त्यांसह 300 पूल उद्ध्वस्त

कीव्ह/मॉस्को ; वृत्तसंस्था : रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. युक्रेनमधील जवळपास 2500 किलोमीटरचे रस्ते आणि सुमारे 300 पूल उद्ध्वस्त झाले आहेत. शेकडो उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले आहेत. आतापर्यंत 600 अब्ज डॉलर्सहून अधिक नुकसान झाल्याचे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी म्हटले आहे.

दरम्यान, युक्रेनचे पंतप्रधान डेनिस श्यामल यांनी ‘द इकॉनॉमिस्ट’मध्ये लिहिलेल्या एका लेखात युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला एक ट्रिलियन डॉलरचे नुकसान पोहोचू शकते, असे म्हटले आहे. हे नुकसान युक्रेनच्या 2021 च्या जीडीपीच्या पाचपट आहे.

पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांमुळे रशियालाही फटका बसला आहे. रशियन बँका आणि जहाजांवरील निर्बंधांमुळे रशियाच्या खनिज तेल उत्पादनात 17 टक्के घट झाली आहे. (Volodymyr Zelenskyy)

दरम्यान, पुतीन यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस युक्रेन दौर्‍यावर गेले आहेत. युद्ध भयानक आणि मूर्खपणाचे कृत्य आहे. लोकांच्या वेदना समजू शकतो, माझेच कुटुंबीय जीव वाचविण्यासाठी पळून जात असल्याचे वाटते. 21 व्या शतकात कुठलेही युद्ध मूर्खपणाचे आहे, असे ते म्हणाले.

* रशियाने पोलंड आणि बल्गेरियाचा गॅसपुरवठा रोखल्यानंतर युरोपात नैसर्गिक वायूच्या किमतीत 24 टक्के वाढ झाली.

* अमेरिकन संसदेत एक विधेयक संमत झाले असून, त्यानुसार राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना आता रशियन अब्जाधीशांची संपत्ती जप्त करण्याचा अधिकार मिळणार आहे.

* कॅनडाच्या संसदेत रशियाविरोधात ‘अ‍ॅक्ट ऑफ जेनोसाईड अगेन्स्ट युक्रेनियन पीपल’ हा प्रस्ताव मंजूर.

* ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री लिज ट्रस यांनी युद्ध 10 वर्षे सुरू राहू शकते, असे म्हटले आहे.

* युक्रेनशी गुप्त माहितीची देवाणघेवाण करण्यावरून काही निर्बंध अमेरिकेने हटवले.

Back to top button