Russia Ukraine war : १० हजार रशियन सैनिकांचा मृत्यू?, दबावानंतर संकेतस्थळावरुन बातमी गायब | पुढारी

Russia Ukraine war : १० हजार रशियन सैनिकांचा मृत्यू?, दबावानंतर संकेतस्थळावरुन बातमी गायब

मॉस्को/कीव्ह ; वृत्तसंस्था : रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia Ukraine war) 27 व्या दिवशी पुतीन सरकारचे समर्थक मानल्या जाणार्‍या ‘कॉम्सोमॉलिस्का प्रावदा’ या प्रसारमाध्यमाच्या माहितीनुसार, या युद्धात रशियाच्या 10 हजार सैनिकांचा मृत्यू झाला आहे. या बातमीत मृत सैनिकांची संख्या 9 हजार 861 सांगितली गेली आहे, तर जखमी सैनिकांची संख्या 16 हजार 153 इतकी आहे. विशेष म्हणजे, सोमवारी रात्री उशिरा ही बातमी संबंधित प्रसारमाध्यमाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली आणि त्यानंतर काही तासांतच ती तेथून हटविण्यात आली. पुतीन सरकारच्या दबावामुळे बातमी गायब गेल्याचे सांगितले जात आहे.

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की वोल्दिमीर यांनी ‘नाटो’ला सदस्यत्वाबाबत थेटच सवाल केला आहे. युक्रेनला सदस्यत्व देणार आहात की नाही? खरेतर तुम्ही रशियाला घाबरता, असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. रशिया भलेही मारियुपोलची राखरांगोळी करेल; पण तरीही हे शहर जिवंत राहील. नागरिकांनी देशाच्या सुरक्षेसाठी जे शक्य आहे ते करावे, असेही झेलेन्स्की म्हणाले.

रशियन नोबेल विजेता स्थलांतरितांसाठी पदक विकणार

रशियन पत्रकार दमित्री मुराटोव्ह यांनी त्यांना गतवर्षी मिळालेले नोबेल शांतता पुरस्काराचे पदक युक्रेनियन स्थलांतरितांना निधी उभारण्यासाठी विकणार असल्याचे म्हटले आहे. ऑक्शन हाऊसना मुराटोव्ह यांनी लिलावाच्या आयोजनाबाबत आवाहन केले आहे.

युक्रेनच्या नागरिकांवरही गोळीबार (Russia Ukraine war)

रशियन सैन्याला सर्वसामान्य युक्रेनी नागरिकांच्या विरोधाचा सामना करावा लागत आहे. रशियाच्या निषेधासाठी खेरसन फ्रीडम स्क्वेयर येथे नागरिक मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी गर्दीवर नियंत्रणासाठी रशियाने गोळीबार केला.

Back to top button