russia-ukraine war: तिसरे महायुद्ध झाल्यास अण्वस्ञांचा वापर, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव्ह यांची धमकी | पुढारी

russia-ukraine war: तिसरे महायुद्ध झाल्यास अण्वस्ञांचा वापर, रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव्ह यांची धमकी

मॉस्को/कीव्ह वृत्तसंस्था: तिसरे महायुद्ध झालेच, तर त्याचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागतील, अण्वस्ञांचा सर्रास वापर केला जाईल, अर्थातच आमच्याकडूनही हे घडेल, अशी उघड धमकी रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जेई लावरोव्ह यांनी दिली आहे. इकडे कीव्ह, खार्कोव्हसह युक्रेनच्या अनेक प्रमुख शहरांवर बुधवारी रशियाने लागोपाठ हल्ले केले. (russia-ukraine war)

एकट्या खार्कोव्हवरील क्षेपणास्ञ हल्ल्यात 21 जण मृत्युमुखी पडले आहेत, तर 112 जखमी झाले. भारतीय विद्यार्थ्यांनी खार्कोव्ह सोडावे, अशी आणीबाणीची ‘अ‍ॅडव्हायझरी’ बुधवारी भारतीय दूतावासाने जारी करताच खार्कोव्हवर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला झाला. खार्कोव्हमध्ये अजूनही भारतीय विद्यार्थी अडकलेले आहेत.

अनेकजण रेल्वेस्थानकांवर प्रतीक्षा करत आहेत, तर अनेकजण विशेषत: विद्यार्थी पायीच खार्कोव्ह सोडून निघाले आहेत.
रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची यासंदर्भात भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली.

तत्पूर्वीच दिल्लीतील रशियन राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी खार्कोव्हसह पूर्व युक्रेनमध्ये अद्यापही अडकून असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात भारतीय अधिकार्‍यांची चिंता आमच्यापर्यंत पोहोचली आहे. आम्हीही आवश्यक ती पुढील कार्यवाही केली आहे, असे सांगितले. युक्रेनमध्ये उरलेल्या भारतीयांना परतीच्या प्रवासात इजा होणार नाही, हे पाहिले जाईल, असेही रशियाकडून सांगण्यात आले.

तिकडे रशियावर प्रतिहल्ला करताना युक्रेनच्या दोन मिग-29 विमानांनी रशियाची दोन सुखोई-35 ही युद्धविमाने बुधवारी पाडली. अर्थात, लगोलग युक्रेनचे एक मिग-29 ही कोसळले. सकाळीच रशियन पॅराट्रूपर्सनी खार्कोव्हमधील एका रुग्णालयावर हल्ला केला.

युक्रेनमधील खेर्सोन या शहरावर संपूर्ण ताबा मिळविल्याचा दावा रशियन लष्कराने केला आहे, तर दुसरीकडे आजअखेर आमच्या लष्कराने प्रतिकारात 6 हजार रशियन सैनिकांचा खात्मा केला आहे, असा दावा स्वत: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दिमीर झेलेन्स्की यांनी केला.

पोलंड सीमेवर रशिया आणि युक्रेनच्या अधिकार्‍यांदरम्यान चर्चेची दुसरी फेरी सुरू झाली आहे. दोन्ही देशांदरम्यान युद्धविरामासंदर्भात सोमवारी झालेली पहिली बैठक निष्फळ ठरली होती. सोमवारीही एकाचवेळी चर्चा आणि रशियन हल्लेही सुरू होते, तेच चित्र बुधवारीही बघायला मिळाले. किंबहुना, बुधवारी रशियाने हल्ले अधिक तीव्र केले.

रशियन परराष्ट्रमंत्री आपल्या वक्तव्यात म्हणाले, युक्रेनला आम्ही कुठल्याही परिस्थितीत अण्वस्ञे मिळवू देणार नाही. आम्ही युद्ध करत आहोत, असे जगाला दिसत असले, तरी या युद्धाला अमेरिका आणि पाश्चिमात्य देश कारणीभूत आहेत. अमेरिकेसह या देशांनी रशियाला काही शब्द दिले होते, ते पाळलेले नाहीत.

युक्रेन तर सुरुवातीपासूनच अमेरिकेच्या हातचे बाहुले बनलेले आहे. सर्जेई लावरोव्ह हे बुधवारी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत जसे बोलायला उठले तसे, विविध देशांच्या 100 राजनयिकांनी सभात्याग केला. त्याचा सगळा राग लावरोव्ह यांच्या वक्तव्यातून प्रतिध्वनित होत होता.

युक्रेनमधील 5 शहरे उद्ध्वस्त

रशियन हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील कीव्ह, खार्कोव्ह, बुका, मारियुपोल आणि जितोमीर या शहरांवर बुधवारीही रशियाने बॉम्ब हल्ले केले. या शहरांतील अनेक परिसर पुरते उद्ध्वस्त झाले आहेत. रस्त्यांवर पडलेली प्रेते उचलणारेही कुणी नाही. पाच लाखांहून अधिक लोकांनी युक्रेनमधून स्थलांतर केले आहे. कीव्ह, लीव्हसह अन्य शहरांतील रेल्वेस्थानकांवर लोकांच्या रांगा लागल्या आहेत.

कीव्हनजीक असलेल्या बुका या शहरात रशियन सैनिकांनी कहर केला. युक्रेनियन लष्करानेही प्रतिहल्ले केले. रशियन रणगाडे या हल्ल्याचे लक्ष्य होते.

शहरातील रस्त्यांवर सर्वत्र रणगाड्यांचे भाग इतस्तत: विखुरलेले आहेत. युक्रेनियन सैनिकांसह स्थानिक लोकही रशियन सैनिकांवर गनिमी काव्याने हल्ले करीत आहेत. रशियन सैनिकांना त्यामुळे पुढे सरकणे अवघड झाले आहे.

  • रशियाच्या हल्ल्यात 2 हजार नागरिक ठार: युक्रेनचा दावा
  • नागरी वस्त्या, रुग्णालये, वाहतूक व्यवस्था, पोलिस ठाणी ‘टार्गेट’वर
  • शेकडो रशियन रणगाड्यांचा ताफा राजधानी कीव्हच्या दिशेने
  • खार्कोव्ह शहरावर हल्ले वाढवले
  • 9 लाख युक्रेनियन नागरिकांचे पलायन
  • संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत रशियाविरोधात प्रस्ताव; 141 मते

हेही वाचा

Back to top button