Vacuum Bomb : रशिया- युक्रेन वाॅर : ‘व्हॅक्युम बाॅम्ब’ म्‍हणजे काय? | पुढारी

Vacuum Bomb : रशिया- युक्रेन वाॅर : 'व्हॅक्युम बाॅम्ब' म्‍हणजे काय?

पुढारी ऑनलाईन डेस्क : रशियाने युक्रेनवर व्हॅक्युम बाॅम्ब (Vacuum Bomb) आणि क्लस्टर बाॅम्ब टाकल्‍याचा  आरोप अमेरिकेतील युक्रेनच्या राजदुतांनी आणि मानवाधिकार संघटनेने केला आहे. या शस्त्रांच्या वापराचा अम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संघटनेसह  अमेरिकेसह युराेपमधील देशांनी तीव्र  निषेध केला आहे. त्यामुळे ‘व्हॅक्युम बाॅम्ब’ म्हणजे नेमकं काय आणि तो इतका घातक का समजला जातो, यासंदर्भात जाणून घेऊया…

व्हॅक्युम बाॅम्ब म्हणजे काय?

तंत्रज्ञानाची वाढती प्रगती आणि युद्धाचं बदलतं स्वरुप लक्षात घेता शस्त्रंदेखील अद्ययावत केली जातात. बहुतेक शस्त्रं ही स्फोटकांवर अवलंबून असतात. त्यामुळे प्रचंड प्रमाणात दारुगोळा यासारख्या स्फोटकांपुढील एक पाऊल म्हणजे व्हॅक्युम बाॅम्ब समजले जाताे. व्हॅक्युम बाॅम्ब (Vacuum Bomb) असे शस्त्रं आहे जे लक्ष्य असणाऱ्या परिसरातील तापमानावर परिणाम करते.

व्हॅक्युम बाॅम्ब किंवा थर्मोबॅरिक व्हेपन्स ही शस्त्रं तापमानाचा अतिउच्च स्फोट घडवून आणण्यासाठी हवेतील ऑक्सिजन शोषून घेते. या शस्त्रांचा स्फोट इतका भनायक असतो की, जास्त काळापर्यंत त्याचा परिणाम राहतो. इतकंच नाही तर, मानवी शरीराची वाफ करण्याची ताकद या शस्त्रांमध्ये असते.

या शस्त्रांना एरसोल बाॅम्ब म्हणूनही ओळखले जाते. या शस्त्रांना दोन प्रकारे चार्ज म्हणजे पेटवले जाते. त्यातील पाहिले कार्बन इंधनापासून ते धातुंच्या कणांपर्यंत अत्यंत सूक्ष्म सामुग्री एकत्र करत व्हॅक्युम बाॅम्बचा स्फोट घडवून आणला जातो. तर, दुसरा प्रकार हा की, हवेतील ऑक्सिजन शोषून शाॅक व्हेव तयार केला जातो. त्यातून लक्ष्याभोवती व्हॅक्युम तयार होतो. यातून केलेल्या स्फोटाचा परिणाम दीर्घकाळापर्यंत राहतो.

व्हॅक्युम बाॅम्बचा परिणाम सर्वात भयानक

अम्नेस्टी इंटरनॅशनल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानवाधिकाराच्या लोकांनी म्हटलं आहे की, “आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायदा हा व्हॅक्युम बाॅम्ब किंवा क्लस्टर युद्धसामुग्री वापरण्यास निर्बंध घालतो. युद्धात अंदाधुंद गोळीबार करणे, नागरिकांना ठार मारणे किंवा जखमी करणे कायद्यानुसार गुन्हा आहे.

ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पाॅलिसी इन्स्टिट्यूटचे ज्येष्ठ विश्लेषक डाॅ. मर्कस हेलियर ‘द गार्डियन’ला दिलेल्या मुलाखतीत सांगतात की, “टाकीमध्ये घुसण्यासाठी हे व्हॅक्युम बाॅम्ब वापरले जाणार नसले तरी इमारती आणि अपार्टमेंट्समध्ये त्याचा वापर केला जाऊ शकतो. कारण, बचावकर्त्यांच्या फुफ्फसातील हवा बाहेर काढून त्याचा बळी घेतला जातो. त्यामुळे या शस्त्रांच्या वापराचा परिणाम खूपच भयानक आहे. रशियाची रणनिती तर जगजाहीर आहे, ते सर्व काही नष्ट करण्यासाठी तयारच आहेत.”

पाहा व्हिडिओ : युक्रेन एकाकी | Pudhari Podcast

Back to top button