Ukraine Invasion : व्लादिमीर पुतीन यांना धक्का, ब्लॅक बेल्ट काढून घेतला! | पुढारी

Ukraine Invasion : व्लादिमीर पुतीन यांना धक्का, ब्लॅक बेल्ट काढून घेतला!

पुढारी ऑनलाईन डेस्क

Ukraine Invasion : रशियन सैन्याने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाचा निषेध म्हणून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना बहाल केलेला मानद तायक्वांदो ब्लॅक बेल्ट काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जागतिक तायक्वांदो (World Taekwondo) फेडरेशनने याबाबतचा निर्णय त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन जाहीर केला आहे. ”जागतिक तायक्वांदो फेडरेशन युक्रेनमधील निष्पाप लोकांवरील क्रूर हल्ल्यांचा तीव्र निषेध करते, “विजयापेक्षा शांतता अधिक मौल्यवान आहे”. असे सांगत जागतिक तायक्वांदोने नोव्हेंबर २०१३ मध्ये व्लादिमीर पुतीन यांना बहाल केलेला ९वा डॅन ब्लॅक बेल्ट परत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या समर्थनार्थ, जागतिक तायक्वांदो स्पर्धांमध्ये रशियन अथवा बेलारुसचा राष्ट्रध्वज असणार नाही तसेच त्यांचे राष्ट्रगीत म्हटले जाणार नाही. जागतिक तायक्वांदो आणि युरोपियन तायक्वांदो संघटना रशिया आणि बेलारूसमध्ये तायक्वांदो स्पर्धा आयोजित करण्यास मान्यता देणार नाही, असे जागतिक तायक्वांदोने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जागतिक तायक्वांदो युक्रेनच्या लोकांच्या पाठीशी आहे. हे युद्ध संपून शांतता प्रस्तापित होईल, अशी आशा जागतिक तायक्वांदो फेडरेशनने (World Taekwondo) व्यक्त केली आहे.

युक्रेनवर रशियाकडून सुरू असलेल्या हल्ल्याच्या (Ukraine Invasion) निषेधार्थ याआधी फुटबॉलची सर्वोच्च संस्था फिफाने (FIFA) मोठी घोषणा करत रशियाला मोठा धक्का दिला होता. रशियावर बंदी घालत फिफाने यापुढे रशियाच्या भूमीवर आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. इतकंच नाही तर रशियाचा ध्वज आणि राष्ट्रगीत यांना परदेशात फिफाच्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यांवर बंदी घालण्यात आली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर फिफाने अनेक निर्बंध जाहीर केले आहेत. (FIFA Bans Russia)

Back to top button