Russia-Ukrain war : पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन संकटावर पुतीन यांच्याशी करणार चर्चा | पुढारी

Russia-Ukrain war : पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेन संकटावर पुतीन यांच्याशी करणार चर्चा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) आज (गुरुवार) रात्री रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ( vladimir putin ) यांच्याशी युक्रेन ( Russia – Ukrain war ) संकटाबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी सकाळी युक्रेनवर लष्करी कारवाईची घोषणा केली. यानंतर रशियन सैन्याने अनेक आघाड्यांवर युक्रेनमध्ये घुसखोरी केली आहे. युक्रेनवरील हल्ल्यामुळे सर्व देश चिंतेत असून अमेरिकेसह पाश्चात्य देश रशियावर कठोर निर्बंध लादण्याची चर्चा करत आहेत.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया-युक्रेन संकटामुळे ( Russia – Ukrain war )होणारा आर्थिक परिणाम तसेच या वादामुळे कच्च्या तेलाच्या वाढणाऱ्या किंमती या संदर्भात मंत्रीमंडळाची बैठक घेणार आहेत. गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि इतर अधिकारीही सहभागी होणार आहेत.

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन ( Russia – Ukrain war ) यांनी लष्करी कारवाईला मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी, रशियन सैन्याने अनेक युक्रेनियन शहरांवर क्षेपणास्त्रे डागली आणि आपले सैन्य युक्रेनच्या किनारपट्टीवर उतरवले. युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा यांनी गुरुवारी सांगितले की, त्यांचा देश (युक्रेन) रशियन लष्करी आक्रमणामुळे उद्भवलेल्या संकटावर भारताने घेतलेल्या भूमिकेवर असमाधानी आहेत. त्याचवेळी त्यांनी परिस्थिती सामान्य करण्यासाठी भारताची मदत देखिल मागितली आहे.

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन ज्यांचे ऐकतात अशा काही नेत्यांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक आहेत आणि भारत रशियाशी असलेल्या या जवळीकीचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणू शकतो, असे युक्रेनचे राजदूत इगोर पोलिखा म्हणाले.

Back to top button