Gold Prices Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने महागले, ५१ हजारांचा टप्पा पार | पुढारी

Gold Prices Today : रशिया-युक्रेन युद्धामुळे सोने महागले, ५१ हजारांचा टप्पा पार

पुढारी ऑनलाईन डेस्के

Gold Prices Today : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनवर हल्ला करण्याची घोषणा केल्यानंतर जगभरातील बाजारांत त्याचा परिणाम दिसून येत आहे. भारतात सोन्याच्या किमतीने गुरुवारी ५१ हजारांचा टप्पा पार केला. मल्टि कमोडिटी एक्स्चेंजवर ((MCX) गोल्ड फ्यूचर्समध्ये २ टक्के वाढ होऊन दर प्रति १० ग्रॅम ५१,३९६ रुपयांवर पोहोचला. चांदीही महागली असून प्रति किलो दर ६५,८७६ रुपयांवर गेला आहे. या वर्षातील हा उच्चांकी दर आहे.

इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, Gold Prices Today गुरुवारी शुद्ध सोन्याचा म्हणजे २४ कॅरेटचा दर ५१,४१९ रुपये (प्रति १० ग्रॅम) होता. २३ कॅरेट सोने ५१,२१३ रुपये, २२ कॅरेट सोने ४७,१०० रुपये, १८ कॅरेट सोने ३८,५६४ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा दर ३०,०८० रुपये होता. चांदी प्रति किलो ६६,५०१ रुपयांवर पोहोचली आहे. काल बुधवारी चांदीचा दर ६४,२०३ रुपयांवर जाऊन बंद झाला होता. तर शुद्ध सोन्याचा दर काल बुधवारी ५० हजारांवर जाऊन बंद झाला होता. आज सोने आणि चांदी दरात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ((हे दुपारी १२ नंतरचे अपडेटेड दर असून त्यात बदल होऊ शकतो)

आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची उसळी

आंतरराष्ट्रीय बाजारात प्रति औंस सोन्याचा दर १.६ टक्क्याने वाढून १,९३७ डॉलरवर पोहोचला आहे. याआधी जून २०२१ मध्ये सोन्याचा दर प्रति औंस १,९४८ डॉलरवर गेला होता. त्यानंतर पुन्हा एकदा सोन्याने उसळी घेतली आहे. (१ औंस म्हणजे २८.३५ ग्रॅम, १ तोळा म्हणजे १० ग्रॅम)

युद्धाचा सोने दराशी काय आहे संबंध?

जगात जेव्हा तणावाची परिस्थिती अथवा संकटे निर्माण होतात त्यावेळी त्याचा परिणाम शेअर बाजारावर होतो. शेअर बाजार कोसळल्यामुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होते. यामुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक (सेफ हेवन मालमत्ता) म्हणून सोन्यात गुंतवणूक करतात. यामुळे सोने तेजीत येते. सध्या अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. सोने एका वर्षातील उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे.

शुद्ध सोने कसे ओळखाल?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

Back to top button