जळगावातील भाजप नगरसेवकांचा अजून एक गट शिवसेनेच्या वाटेवर | पुढारी

जळगावातील भाजप नगरसेवकांचा अजून एक गट शिवसेनेच्या वाटेवर

जळगाव : 

महापालिकेतील भाजपचे नगरसेवक तिसर्‍यांदा फुटणार असल्याचे संकेत मिळाले असून याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दौर्‍याआधी किंवा नंतर भाजपला जोरदार धक्का बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबद्दल उपमहापौर याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला.

जळगाव महापालिकेत मार्च अखेरीस झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीआधी शिवसेनेने भाजपमधील नाराज असणार्‍या तब्बल २७ नगरसेवकांना गळाशी लावत सत्ता संपादन केली होती. मात्र भाजपने प्रत्युत्तर म्हणून फुटलेल्या नगरसेवकांविरूध्द अपात्रतेची कारवाई सुरू केली. यामुळे अपात्रतेच्या कारवाईतून वाचण्यासाठी दोन तृतीयांश म्हणजेच ३८ नगरसेवकांची आवश्यकता असल्यामुळे शिवसेनेने भाजप फोडण्याची रणनिती आखल्याचे दिसून आले. अलीकडेच भाजपच्या तीन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर अजून काही नगरसेवक या मार्गावर असल्याचे सांगण्यात आले होते.

दरम्यान, भाजपला लागलेल्या गळतीच्या पार्श्‍वभूमिवर, माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी काल रात्री तातडीने बैठक घेऊन नगरसेवकांनी राजकीय आत्महत्या करू नये असा इशारावजा सल्ला दिला. या बैठकीला भाजपचे २४ नगरसेवक उपस्थित असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली. तथापि, आज भाजपमधील काही नगरसेवक मुंबईत दाखल झाले असून त्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

उपमहापौर कुलभूषण पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मुंबईत ठाण मांडून बसले असून आता भाजपचा नवीन गट त्यांच्याच पुढाकाराने शिवसेनेत दाखल होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी जळगाव भाजपमधील नगरसेवकांच्या भेटीसाठी वेळ दिला असून यातच प्रवेशाचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Back to top button