कोल्हापूरमध्‍ये विनाकारण फिरणार्‍यांची होणार कोरोना चाचणी | पुढारी

कोल्हापूरमध्‍ये विनाकारण फिरणार्‍यांची होणार कोरोना चाचणी

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा ; कोल्हापूर जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्यांची आता जागेवरच कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी (दि.०१) मंगळवारी दिले. ज्या ठिकाणी पोलिस तपासणी नाके आहेत त्या सर्वच ठिकाणी आरोग्य विभागाचे पथक कार्यरत राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा : ‘मिशन राजाराम’साठी हालचाली वेगावल्या

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे. अशी परिस्थिती असतानाही शहर आणि जिल्ह्यातील गर्दी कमी होताना दिसत नाही. सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक वस्तू तसेच भाजी विक्री व प्रशासनाने परवानगी दिलेले अन्य व्यवसाय सुरू आहेत. त्यानंतर मात्र, संचारबंदी लागू असूनही अनेकजण विनाकारण फिरताना आढळून येत आहेत.

अधिक वाचा : कोरोनामुळे कुरुंदवाडी पेढ्यांची चव झाली ‘कडू’

जिल्ह्यात १५ जून पर्यंत लॉकडाऊन कायम असला तरी अनेक ठिकाणचा पोलिस बंदोबस्त हटवण्यात आला आहे. यामुळे दिवसभर शहरात अनेक ठिकाणी गर्दी दिसत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर विनाकारण फिरणाऱ्यांना दंड करण्याऐवजी त्यांची थेट कोरोनाची चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

अधिक वाचा : ‘त्याला काय होतंय’ हेच जीवावर बेततंय : डॉ. औरंगाबादकर

शहरासह ग्रामीण भागात गल्लीबोळात तसेच सार्वजनिक मंडळाच्या कार्यालयात, मैदानात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. अशांनाही आता चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. याकरता मोबाईल व्हॅन फिरणार असून असे गर्दी केलेल्या ठिकाणी लोकांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत.

Back to top button