मुंबईच्या धर्तीवर राज्यात पालिका निवडणुका | पुढारी

मुंबईच्या धर्तीवर राज्यात पालिका निवडणुका

ठाणे ः दिलीप शिंदे

कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बेमुदत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सध्या 95 महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींवर प्रशासक राजवट लागू आहे. येत्या वर्षभरात मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील 18 महापालिका, 26 जिल्हा परिषद आणि 173 नगरपालिका, नगरपंचायतींची मुदत संपणार आहेत. दरम्यान मुंबई महापालिकेच्या पुढील वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये होणार्‍या निवडणुका 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीनुसार होऊ शकतात. त्यानुसार प्रभाग फेररचना केली जाऊ शकते, असे निवडणूक आयोगाने मुंबई पालिका प्रशासनाला कळवल्याने या निवडणुका होण्यात कोणतीही अडचण सध्या तरी दिसत नाही. याच न्यायाने राज्यभरात इतर महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही होऊ शकतात. 

कोरोना महामारी रोखण्यासाठी मार्च 2020 मध्ये पहिले लॉकडाऊन लागले आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक लागला. त्याचा फटका नवी मुंबई, औरंगाबाद, वसई विरार,  कल्याण-डोंबिवली आणि कोल्हापूर महापालिकांना बसला.  त्यांच्यावर प्रशासकीय राजवट सुरू आहे. कोरोना नियंत्रणात येताच 2021 च्या सुरुवातीला राज्यातील सुमारे 14 हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. मात्र दुसर्‍या लाटेतील वाढती रुग्णसंख्या आणि कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पाच महापालिकांसह नगरपालिका, नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या नाहीत. प्रशासकीय राजवट वाढली आणि माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवारांमधील अस्वस्थता अधिक वाढू लागली. राज्यात अजूनही लॉकडाऊन सुरूच आहे.

आगामी वर्षभरामध्ये ठाणे, मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील 18 महापालिकांची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यापैकी 9 महापालिकांची मुदत मार्च 2022 मध्ये संपणार असून उर्वरित 9 महापालिकांची मुदतही एप्रिल ते ऑक्टोबर 2022 दरम्यान संपणार आहे. अंबरनाथ, बदलापूरसह राज्यातील 90 नगरपालिका, नगरपंचायतींवर अगोदरच प्रशासकीय राजवट लागू आहे. डिसेंबर 2021 पर्यंत 121 नगर परिषदा, नगरपंचायतींच्या मुदती संपणार असून फेब्रुवारी 2022 पर्यंत 52  नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. राज्यात 34 जिल्हा परिषदा असून यापूर्वीच भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांवर प्रशासकीय राजवट लागू आहे.  20 मार्च 2022 पर्यंत राज्यातील 24 झेडपीची मुदत संपुष्टात येणार आहे. त्यामध्ये रायगड, कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, सोलापूर, रत्नागिरी, जळगाव, सांगली, नाशिक,जालना, बीड, गडचिरोली, बुलढाणा, नांदेड, वर्धा, लातूर, परभणी, अहमदनगर, यवतमाळ, हिंगोली, उस्मानाबाद, औरंगाबाद, अमरावती या झेडपींचा समावेश आहे. पंचायत समितींची संख्या वेगळी आहे.

Back to top button