गडहिंग्लज ः मुंगूरवाडी, महागावची लसीकरणात आघाडी | पुढारी

गडहिंग्लज ः मुंगूरवाडी, महागावची लसीकरणात आघाडी

गडहिंग्लज ः प्रवीण आजगेकर :कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची चाहूल लागताच लसीकरणाचा वेग वाढला आहे. गडहिंग्लज तालुक्यातील ग्रामीण भागात 45 वर्षांवरील तब्बल 44,503 जणांना आरोग्य केंद्रातून लसीकरण केले आहे. तालुक्यातील खासगी रुग्णालयांसह लसीकरणाचा आकडा 69,218 पर्यंत पोहोचला आहे. महागाव व मुंगूरवाडी या आरोग्य केंद्रांनी लसीकरणात आघाडीत घेतली आहे. महागाव केंद्राने तर 60 वर्षांवरील सर्वच व्यक्तींचे लसीकरण पूर्ण केले आहे. 

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नसल्याने जगभरातून सर्वच देशांमध्ये लसीकरण मोहीम गतिमान झाल्या आहेत. देशातही लसीकरण सुरू होताच सुरुवातीच्या टप्प्यात ग्रामीण भागात लसीकरणासाठी अनेक लोक पुढे येत नसल्याने लसीकरणाचा वेग पहिल्यांदा मंदावला होता. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची चाहूल लागताच लसीकरणाचा वेग वाढला. 

गडहिंग्लज तालुक्यात एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लज व ग्रामीण रुग्णालय नेसरी अशा आठ ठिकाणी सरकारी लसीकरण केंद्रे कार्यरत आहेत. गडहिंग्लज शहरात देसाई हॉस्पिटल, केदारी रेडेकर रुग्णालय व महागाव येथील संत गजानन हॉस्पिटलमध्येही खासगी लसीकरण केंद्र सुरू आहे.

खासगी केंद्रांमध्ये शुल्क देऊन लस घ्यावी लागत असल्याने या ठिकाणी लसीकरणाला अल्पसा प्रतिसाद मिळत आहे. जेमतेम 1,763 जणांनी या केंद्रांवर लस घेतली आहे. उपजिल्हा रुग्णालयात 17,390 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. 

तालुक्यात शासकीय आकडेवाडीनुसार ग्रामीण भागात 1 लाख 88 हजार 853 जणांपैकी लसीकरणासाठी 45 वर्षांवरील 64,664 जण लसीकरणासाठी होते. यामध्ये मुंगूरवाडी आरोग्य केंद्राने तब्बल 96.10 टक्के लोकांचे लसीकरण करून मोहिमेत आघाडी घेतली आहे. त्यापाठोपाठ महागाव केंद्राने 95.72 टक्के लसीकरण केले आहे. सर्वात कमी लसीकरण कडगाव आरोग्य केंद्राकडून झाले असून याअंतर्गत केवळ 48.08 टक्के लसीकरण झाले आहे. 60 वर्षांवरील लसीकरणासाठी महागाव केंद्राने 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.

या खालोखाल हलकर्णी केंद्राने लसीकरणाचा टप्पा पूर्ण केला आहे. सुरुवातीला लसीकरणासाठी नागरिकांना विनंती करावी लागत होती; मात्र दुसर्‍या लाटेचा प्रभाव समोर येताच लसीकरणासाठी लोकांची गर्दी होऊ लागली आहे. यानंतर प्रत्यक्षात लसींचाच पुरवठा अपुरा होऊ लागल्याने लसीकरणाचे काम सद्यस्थितीत संथ गतीने सुरू आहे. लसीकरणासाठी आवश्यक साठा प्राप्त झाला, तर तालुक्यातील 45 वर्षांवरील 100 टक्के लसीकरण होण्यास आठवडाभराचा कालावधी पुरेसा असल्याचे सांगण्यात येत आहे.

17 गावांत पहिला डोस 100 टक्के

तालुक्यातील 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात 17 गावांना यश आले आहे. येथे या लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. याशिवाय तालुक्यातील अन्य अनेक गावे पहिल्या डोसच्या पूर्ततेत जवळपास 90 टक्क्यांवर आहेत. आता 18 वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाची प्रतीक्षा आहे.

गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालय

17,390

नेसरी ग्रामीण रुग्णालय

5,562

देसाई हॉस्पिटल, गडहिंग्लज

1,279

केदारी रेडेकर हॉस्पिटल, गडहिंग्लज

380

संत गजानन हॉस्पिटल, महागाव

104

Back to top button