यापुढे ‘कोरोनामुक्त गाव’ मिशन : मुख्यमंत्री ठाकरे | पुढारी

यापुढे ‘कोरोनामुक्त गाव’ मिशन : मुख्यमंत्री ठाकरे

कुडाळ ः पुढारी वृत्तसेवा ;कोरोना कधी जाईल, लाटा किती येतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा कमी पडता कामा नये, याकरिता ऑक्सिजन प्लांटची क्षमता 6 टनांवरून 20 टनांपर्यंत न्या. जिल्ह्यात अजून एखादा छोटा प्लांट उभारायचा असेल तर जरूर उभारा, पण सिंधुदुर्ग जिल्हा लवकरच कोरोनामुक्त करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. दरम्यान  ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उपक्रमाप्रमाणे आता  ‘कोरोनामुक्त गाव’ या उपक्रमाकडे लक्ष द्या. आमदार, खासदार, नगरसेवक तालुका पातळीपर्यंत प्रत्येकाने मतदार यादीप्रमाणे काम करा, अशा सूचना केल्या.

कुडाळ एमआयडीसी येथील युनायटेड एअर गॅस प्रा. लि. कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या लिक्विड ऑक्सिजन प्लांटचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी ऑनलाईन उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक, पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, संदेश पारकर, अभय शिरसाट, प्रकल्पाचे संचालक अतुल नलावडे, गटनेते नागेंद्र परब आदींसह प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल पाठक, कुडाळ पोलिस निरीक्षक शंकर कोरे, उपसभापती जयभारत पालव, जि.प. सदस्य अमरसेन सावंत, काका कुडाळकर, सुनील भोगटे, मंदार शिरसाट, भास्कर परब, सचिन काळप, शिवाजी घोगळे, छोटू पारकर आदी उपस्थित होते. 

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पावसासोबत वादळ वारा आला आणि त्यात कोविडचे संकट,हे नुसत संकट नसून या संकटाशी तुम्ही मुकाबला केलात आणि अवघ्या पंधरा दिवसात ऑक्सिजन प्लांट उभारलात त्या सर्वांचे कौतुक आहे. जर का प्रत्येक ठिकाणी वीस-वीस टनाचे प्रकल्प आपण करू शकलो तर पुढच्या लाटेत फायदेशिर ठरेल, पुढची लाट किती भयंकर असेल हे सांगता येत नाही. सिंधुदुर्गने महाराष्ट्राला दिशा दाखवली तर महाराष्ट्र देशाला दिशा दाखवेल. गेल्या लाटेत  महाराष्ट्रात 500 मे.टन ऑक्सिजन बाहेरून आणला जात होता. त्या तुलनेत आता ऑक्सिजन निर्मीती केली तरीपण तो ऑक्सिजन कमी पडला. आमदार, खासदार, नगरसेवक यांनी तालुका पातळीपर्यंत प्रत्येकाने मतदार यादी प्रमाणे काम करा आणि माझ घर कोरोना मुक्त म्हणजेच माझा मतदारसंघ कोरोना मुक्त, पुढे जिल्हा व राज्य मुक्त होईल त्यादृष्टीने प्रयत्न करा. या व्हेरियंटची तिसरी लाट आली तर सर्वांना भारी पडू शकते. त्यासाठी ऑक्सिजन संख्या, आरोग्य सुविधा वाढवणे गरजेचे असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, सिंधुदुर्गात सद्यस्थितीत 562 ऑक्सिजन बेड आहेत. ते वाढवून 1 हजार करण्याचे ध्येय आहे. सीसीसी सेंटरमध्ये 800 बेड आहेत ते 2 हजार पर्यंत करण्याचे नियोजन आहे. खरं तर सीएसआरमधून अनेकांनी मदत केलेली आहे. त्यांचे स्वागतही करणे आवश्यक आहे. एकूणच सर्वांनी एकत्र येऊन ऑक्सिजन मिशन हातात घेतल्याने कुडाळ एमआयडीसी अवघ्या पंधरा दिवसांत ऑक्सिजन प्लांट उभा राहिल्याचे सांगितले. खा. राऊत म्हणाले,  किरण सामंत आणि त्याच्या समवेत अतुल नलावडे व सचिन आंब—े या युवकांनी मोठ्या धाडसाने या प्रकल्पाचा प्रस्ताव मान्य केला. अवघ्या पंधरा दिवसात प्रकल्प पुर्ण केला. डॉ. बाणावलीकर व त्यांच्या सहकार्यानी दिवस-रात्र एक करून या प्रकल्पाचे काम पूर्ण करून घेतले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या नेतृत्वाखाली ऑक्सिजन प्लांटच्या कामात प्रशासनानेही केवळ औपचारिकता न पाळता जबाबदारीचे भान ठेवून प्रामाणिकपणे काम केले. 

ऑक्सिजन प्लांटचे संचालक अतुल नलावडे म्हणाले, महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील हा पहिला प्रकल्प कमी कालावधीत उभा राहिलेला प्रकल्प असेल. कोणतीही सीस्टीम बायपास न करता हा प्रकल्प पंधरा दिवसात  पुर्ण केला. 6 केएल ची क्षमता 20 केएल पर्यंत वाढवू शकतो. प्रतिदिन 600 ते 700 सिलिंडर भरू शकतो. त्याच बरोबर ड्युरा सिलिंडर टेकनॉलॉजी यामध्ये करण्यात आलेली आहे. त्यामध्ये तासाला 9 सिलिंडर भरण्याची क्षमता आहे. या प्लांटच्या माध्यमातुन जिल्ह्याची ऑक्सिजनची पुर्तता पूर्ण करू शकतो असे सांगितले. 

आ.वैभव नाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे जादा लसीची मागणी

आ. दीपक केसरकर यांनी कुडाळ येथील ऑक्सिजन प्लांटप्रमाणेच पुढील आठवड्यात वेंगुर्ले येथील हॉस्पिटलचे उद्घाटन व्हावे अशी विनंती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना केली. आ. वैभव नाईक म्हणाले, आपल्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्गात कोविड पहिली लॅब सुरू झाली. महिला हॉस्पिटल हे सुरू केलेले आहे. शासकीय मेडिकल कॉलेज लवकरच सुरू होईल. या ऑक्सिजन प्लांटमुळे  खासगी व  सरकारी हॉस्पिटलची गैरसोय दूर होईल. सिंधुदुर्गात कोरोनाचे पेशंट अजुनही वाढत आहेत. मृत्यूदरही वाढताच आहे. मुंबईकरही 2 लाख जिल्ह्यात आलेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात लसीचा पुरवठा वाढवून द्या तसेच टास्क फोर्सची टिम सिंधुदुर्गात पाठवा, जेणेकरून काही चुका असतील तर त्या निदर्शनास येतील आणि मृत्युदर कमी होईल, असे सांगितले.

 कुडाळमध्ये सहा टन ऑक्सिजन प्लांटचा शुभारंभ 

तिसर्‍या लाटेपूर्वी मुख्यमंत्र्यांचे सज्जतेचे आवाहन

Back to top button