पुणे : ‘सॅनिटायझर कंपनी दुर्घटनेतील मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी’ | पुढारी

पुणे : 'सॅनिटायझर कंपनी दुर्घटनेतील मृतांची ओळख पटविण्यासाठी डीएनए चाचणी'

पौड : पुढारी वृत्तसेवा ;  पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील पिरंगूट परिसरातील एसव्हीएस ॲक्वा कंपनीला सोमवारी दुपारी आग लागली होती. यात १७ कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. आज (मंगळवार) गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घटनास्‍थळी पाहणी केली. घडलेली ही घटना खूपच दुर्दैवी आहे. मृतदेहाची ओळख पटवणे कठीण आहे. घटनेचा प्राथमिक अहवाल आज प्राप्त होणार असून, सर्व मृत्यू झालेल्या नागरिकांची डीएनए चाचणी करण्यात येणार आहे. कंपनीचे मालक शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडेही चौकशी चालू असल्याची माहिती दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.

यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार संग्राम थोपटे, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशध्यक्षा रूपाली चाकणकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे, तहसीलदार अभय चव्हाण, पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, गटविकास अधिकारी संदीप जठार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सविता दगडे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, सभापती पांडुरंग ओझरकर, उपसभापती विजय केदारी, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले, भोर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनिल चांदेरे, नेते राजाभाऊ हगवणे,राष्ट्रवादी काँग्रेस मुळशी महिला अध्यक्ष दिपाली कोकरे, युवा नेते मधुर दाभाडे, महावितरण अभियंता फूलचंद फड यावेळी उपस्थित होते.

खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या की, अशा घटना होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. फायर ब्रिगेडची व्यवस्था पिरंगूट परिसरात करणे गरजेचे आहे, माञ आर्थिक अडचणी येत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आज घटनास्थळाला भेट देणार असल्यामुळे आग लागलेल्या ठिकाणी पोलिसी छावणीचे रूप आले होते. पिरंगूट, घोटावडे फाटा येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

Back to top button