खेड पं. स. सभापती पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाला स्थगिती | पुढारी

खेड पं. स. सभापती पोखरकर यांच्यावरील अविश्वास ठरावाला स्थगिती

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा

खेड पंचायत समितीचे शिवसेनेचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात संमत झालेल्या अविश्वास ठरवाला मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि १०) स्थगिती दिली आहे. याची माहिती याचिकाकर्ते समितीचे माजी उपसभापती, विद्यमान सदस्य अमोल पवार यांनी दिली. ठरावावर मतदान होताना पोखरकर यांच्या समर्थक दोन सदस्यांना सभागृहात जबरदस्तीने हात वर करायला सांगण्यात आल्याच्या मुद्यावर न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे. याबाबतचे सभागृहातील व्हिडीओ चित्रकरण न्यायालयात सादर करण्यात आले आहे. सभापती भगवान पोखरकर, माजी उपसभापती अमोल पवार आणि ज्योती आरगडे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

आपसांत ठरल्यानुसार राजीनामा दिला नाही. म्हणून खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात शिवसेनेच्या ६ सदस्यांनी बंड करून त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. त्यावर ३१ मेला चर्चा होऊन मतदान घेण्यात आले. त्यात सेनेचे ६, भाजपचे उपसभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आशा ११ जणांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले होते. भगवान पोखरकर यांच्या बाजूने ३ मते पडली होती. 

तत्पुर्वी ठराव मांडला म्हणून सभापती पोखरकर यांनी विरोधातील सदस्य एकत्रित पणे सहलीला गेल्यावर ते मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये आपरात्री जाऊन गोळीबार, विनयभंग केल्याचा आरोप झाला होता. त्यावरून पोखरकर व अन्य २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटकही करण्यात आली आहे. या प्रकरावरून तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार दिलीप मोहिते पाटील, सेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी एकमेकांवर टोकाचे आरोप केले होते. 

याच पार्श्वभूमीवर सेनेचे नेते व राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी नुकतेच राजगुरूनगर येथे येऊन पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याना व आमदार मोहिते पाटील यांना टार्गेट केले होते. महाआघाडीत बिघाडी निर्माण करणारे राजकीय वातावरण तयार झाले होते. स्थगिती आल्यानंतर अटकेत असले तरी भगवान पोखरकर हेच सभापती राहणार आहेत. पुढील सुनावणी २६ जुनला असून त्यावेळी होणाऱ्या निर्णयावर पुढील समीकरणे रंगतील.शिवसेनेच्या सदस्यांवर राष्ट्रवादीचे आमदार मोहिते पाटील यांनी दबाव आणून हे घडविले असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला होता. स्थगितीमुळे या आरोपात तथ्य आहे का? याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिल. तूर्त तालुक्यात हे प्रकरण चांगलेच गाजले आहे.

पंचायत समिती सभापती विरोधात अविश्वास ठराव मंजुरीला पुढील २६ जून पर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. ॲड. रोहन होगले यांनी माजी सभापती भगवान पोखरकर, अमोल पवार, ज्योती आरगडे यांच्यावतीने याचिका दाखल केली होती.

Back to top button