नागपुरात प्रशासनाकडून निर्बंध शिथिल  | पुढारी | पुढारी

नागपुरात प्रशासनाकडून निर्बंध शिथिल  | पुढारी

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीने दुसऱ्या लाटेत बाधितांचा उच्चांक गाठला होता. मार्च आणि एप्रिल महिना कोरोनाच्या दृष्टीने नागपूरकरांसाठी अत्यंत वाईट ठरला. २९ मार्च रोजी नागपूरचा पॉझिटिव्हिटीचा दर चक्क ४५.२ टक्क्यांपर्यंत गेला होता. केवळ दोन महिन्यात पॉझिटिव्हिटी दराने नीचांक गाठला असून, आता हा ५ टक्के पेक्षा कमी आहे. महाराष्ट्र शासनाने हा दर ग्राहय धरुन निर्बंध शिथिल केले आहेत. 

मनपा प्रशासनासह जिल्हा प्रशासनाने यावर आता नियंत्रण मिळविले आहे. ते सुद्धा कोरोना चाचणी कमी न होऊ देता. शहर आणि जिल्हयात आता सुद्धा ८००० पेक्षा जास्त चाचणी होत आहेत. नागरिकांनी जास्तीत-जास्त प्रमाणात कोरोनाची चाचणी केली तर हा दर कमी ठेवण्यात मदत मिळू शकते. जर हा दर वाढला तर पुन्हा: निर्बंध लावले जाऊ शकतात असा इशारा प्रशासनाने दिला आहे. 

सध्या नागपूर शहर आणि जिल्हा मिळून आठ हजारांच्या वर कोरोना चाचण्या सुरू आहेत. आय.सी.एम.आर.च्या आकडेवारीनुसार मार्च आणि एप्रिलमध्ये बाधितांची सर्वाधिक संख्या होती. नागपूर शहर आणि जिल्हयात सर्वाधिक पॉझिटिव्हिटी दर ४ एप्रिल रोजी ४२.५ टक्के, ११ एप्रिल रोजी ४२.४४ टक्के आणि ६ एप्रिल रोजी ४१.१७ टक्के इतका नोंदविला गेला होता. कोरोना बाधितांची संख्या वाढल्यामुळे मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधीकारी रवींद्र ठाकरे यांच्या नेतृत्वात वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने कोरोना चाचणीची संख्या वाढविली. 

अधिक वाचा : शरद पवारांनी शिवसेनेचे कौतुक का केले? 

शासकीय, मनपा आणि खासगी रुग्णालयात बाधितांना दाखल होण्यासाठी बेड्सची संख्या वाढविण्यात आली. नागपूर आणि जिल्ह्याच्या लोकसंख्येनुसार सर्वाधिक ऑक्सिजन बेड्स, आय.सी.यू. बेड्स आणि व्हेंटीलेटर्स बेड्स उपलब्ध करण्यात आले होते. या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, महापौर दयाशंकर तिवारी यांनी यंत्रणेला सातत्याने मार्गदर्शन केले. नागपुरात ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स, औषधी आदींची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या सर्वांचे योगदान मोलाचे ठरले.

पॉझिटिव्हिटी दर सातत्याने पाच टक्क्याच्या खाली

सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ४५.२ टक्क्यांपर्यंत गेलेला पॉझिटिव्हिटी दराचा आलेख अत्यंत खाली घसरला आहे. जून महिन्यात पॉझिटिव्हिटी दर सातत्याने खाली घसरत आहे. १ जूनला २.७ टक्के, २ जून ला २.२६ टक्के, ३ जूनला २.२८, तर १० जुनला ०.८ टक्के अशा प्रकारे पॉझिटिव्हिटी दर नोंदविला गेला. आता हा दर सतत ५ टक्केच्या पेक्षा कमी आहे. तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५ टक्के एवढे आहे. 

नागपुरात वैद्यकीय आरोग्य यंत्रणेने महामारीच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळविण्यात यश प्राप्त केले आहे. राज्य शासनाने पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्‌सची उपलब्धता यावरून जिल्ह्यांना पाच स्तरांमध्ये विभागले आहे. ज्यात नागपूरचा समावेश  पहिल्या स्तरातील शहरांमध्ये करण्यात आला आहे. या मुळे महाराष्ट्र शासनातर्फे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी अजूनही नागरिकांना सावध राहण्याची गरज आहे. नागरिकांनी सामाजिक अंतर, सॅनिटायझर, आणि मास्कचा वापर ही त्रिसूत्री पाळणे बंधनकारक आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास कोरोनाबाधितांची संख्या वाढण्यास वेळ लागणार नाही. महापौर दयाशंकर तिवारी, आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी नागरिकांना कोव्हिड संदर्भात असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी स्वत:चे लसीकरण तातडीने करवून घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. 

अधिक वाचा : आधारकार्डला मोबाईल नंबर कसा अपडेट कराल? कोणत्याही डॉक्युमेंटची गरज नाही!

आतापर्यत २० लाख नागरिकांची कोरोना चाचणी

नागपूर मनपा तर्फे पॉझिटिव्हीटी दर कमी करण्यासाठी वेगवेगळया उपाय योजना केल्या जात आहेत. मनपा तर्फे आतापर्यंत नागपुरातील २४ लाख जनसंख्ये पैकी २० लाख लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी सांगितले की, मनपा तर्फे कोरोना चाचणी केंद्रा व्यतिरिक्त मोबाईल व्हॅनच्या माध्यमाने बाजारपेठेत सुपर स्प्रेडर्सची चाचणी करण्यात आली. नागपूर पोलिसांच्या मदतीने विना कारण फिरणा-या नागरिकांची चौकात चाचणी केली गेली. गर्दीचे  ठिकाण, कृषी उत्पन्न बाजार समिती, कळमना व कॉटन मार्केट मध्ये येणा-या नागरिकांची चाचणी करण्यात आली. ज्यांनी लस घेतली आहे ‍ किंवा जे अगोदर कोरोना बाधित झाले आहेत त्यांना वगळून बाकी लोकांनी चाचणी करणे आवश्यक आहे. व्यापारी, व्यावसायिक ठिकाणी काम करणा-या कर्मचा-यांची चाचणी आवश्यक आहे. जास्तीत-जास्त चाचणी करुन कोरोनावर नियंत्रण करु शकतो. नाही तर पॉझिटिव्हीटी दर वाढला तर पुन्हा: निर्बंध लावण्याची वेळ येऊ शकते, असा सावधगिरीचा इशाराही जोशी यांनी दिला आहे. 

Back to top button