आजर्‍यात 24 दिवसांत 103 रुग्णांवर यशस्वी उपचार | पुढारी

आजर्‍यात 24 दिवसांत 103 रुग्णांवर यशस्वी उपचार

आजरा : पुढारी वृत्तसेवा आजरा शहरामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, महसूल विभाग व आरोग्य प्रशासनाच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या निमशासकीय कोव्हिड केअर सेंटरमध्ये 24 दिवसांत तब्बल 103 रुग्णांवर उपचार यशस्वी करण्यात आले आहेत. अल्पदरात व गावानजीक असणार्‍या या सेवेमुळे तालुकावासीयांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

24 दिवसांपूर्वी आजरा येथील रोझरी कोव्हिड काळजी सेंटर सुरू करण्यात आले. या कालावधीत 103 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के इतके आहे. दाखल रुग्णांपैकी 67 रुग्णांना उपचारानंतर घरी पाठविण्यात आले आहे. तर काही रुग्ण अद्यापही या केंद्रामध्ये उपचार घेत आहेत. अ‍ॅलिओपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, फिजिओथेरीपी या माध्यमातून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. तसेच योगाची प्रात्यक्षिक करून घेऊन त्यांना मानसिक व शारीरिक आधार देण्याचे कामही कोव्हिड केअर सेंटरकडून सुरू आहे. 

वास्तविक कोरोनाबाधित रुग्णाचा संपर्क इतरांकडून टाळला जातो. याचा मानसिक परिणामही बाधित रुग्णांवर अप्रत्यक्षरीत्या होताना दिसतो हे विचारात घेऊन येथे डॉक्टर्स थेट रुग्णाशी आवश्यक ती खबरदारी घेऊन स्पर्शाद्वारे आधार देण्याचा प्रयत्न करतात. रुग्णांच्या नातलगांचीही उपचारादरम्यान भेट घडवून आणली जाते. स्थानिक शासकीय कोव्हिड सेंटरशी समन्वय असल्याने रुग्णांना याचा फायदाही होताना दिसतो. 

बेताची परिस्थिती असणार्‍यांवर मोफत उपचार

 बेताची आर्थिक परिस्थिती असणार्‍या काही रुग्णांवर मोफत उपचारही केले जातात. एकंदर रोझरी कोव्हिड केअर सेंटर रुग्णांच्या द़ृष्टीने आशेचा किरण ठरू लागले आहे. डॉ. गौतम नाईक, डॉ. सागर पारपोलकर, डॉ. दीपक हरमळकर, डॉ. इंद्रजित देसाई, डॉ. बी. जी. पाटील व डॉ. रश्मी राऊत या डॉक्टरांची फौज अनेक अडचणींवर मात करत कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांची सेवा करीत आहेत.

Back to top button