नागपूर : बालवैज्ञानिकांच्या पंखांना महापालिका देणार बळ | पुढारी

नागपूर : बालवैज्ञानिकांच्या पंखांना महापालिका देणार बळ

नागपूर; पुढारी वृत्तसेवा: योग्य मार्गदर्शन आणि मिळालेल्या संधीचे सोने करत महानगरपालिकेच्या दोन विद्यार्थिनींनी तयार केलेल्या उपग्रहांनी अवकाशात झेप घेतली आहे. अशाच बालवैज्ञानिकांच्या पंखांना बळ देण्यासाठी महापालिका पुढे आली आहे. महापालिकेतर्फे ‘पद्मभूषण डॉ. विजय भटकर आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा’ उभारणार आहे.या प्रकल्पासाठी लागणारा सर्व निधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सीएसआरमधून उपलब्ध करुन देणार आहेत.

अधिक वाचा : ‘दामिनी’ ॲप देणार वीज कोसळण्‍याची सूचना! 

नागपूर महापालिकेच्या गरोबा मैदान परिसरामध्ये बंद पडलेल्या मनपाच्या शाळेमध्ये आधुनिक प्रयोगशाळा साकारली जाणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण करणे, त्यांची रूची वाढविणे, त्यांच्यातील जिज्ञासूवृत्तीला चालणा देणे या उद्देशाने सर्व सोयीसुविधांनी सज्ज अशी आधुनिक विज्ञान प्रयोगशाळेची निर्मिती केली जाणार आहे. खेळातून विज्ञानाचे शिक्षण देणारी आनंददायी शिक्षण प्रणाली राबवून विद्यार्थ्यांना विज्ञानाचे ज्ञान दिले जाईल. नागपूर महापालिकेद्वारे सुरु करण्यात आलेल्या अपूर्व विज्ञान मेळाव्यातून अनेक यशस्वी कथा पुढे आल्या. या मेळाव्याशी संलग्नीत मनपाच्या दोन शिक्षकांनी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात २५० शिक्षकांना प्रशिक्षण देउन खेळीमेळीच्या वातावरणात विज्ञान शिक्षण समजवून व शिकवून दिले आहे.        

अधिक वाचा : २०२४ मध्ये काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष : नाना पटोले

विद्यार्थ्यांना देणार सैनिक पूर्व प्रशिक्षण 

यासोबतच शहरातील विद्यार्थ्यांसाठी सैनिक पूर्व प्रशिक्षणालासुद्धा मनपाद्वारे सुरूवात करण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर मनपाद्वारे दुर्गानगर शाळेच्या परिसरात एक महिन्याचे ग्रीष्मकालीन सैन्य भरती प्रशिक्षण आयोजित केले होते. त्याचे फलित म्हणजे, एक महिन्याच्या प्रशिक्षणानंतर ३ विद्यार्थीनी सैन्यभरतीमध्ये यशस्वी झाल्या. शहरात वर्षभर असे सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण दिल्यास शहरातील अनेक विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल, या विचारातून नागपूर महापालिकेने सैनिक पूर्व प्रशिक्षण वर्गासाठी पुढाकार घेतला आहे. नागपूर शहरातील माजी सैनिक संघटनांच्या सहकार्याने मनपाच्या बिजली नगर आर.बी.जी. शाळेच्या परिसरात वर्षभर मनपाच्या विद्यार्थ्यांना सैन्यपूर्व प्रशिक्षण देण्याचा प्रकल्प राबविण्याचा मनपाचा मानस आहे.

Back to top button