जळगाव : हतनूरच्या पाणीपातळीत वाढ, प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडले | पुढारी

जळगाव : हतनूरच्या पाणीपातळीत वाढ, प्रकल्पाचे 8 दरवाजे उघडले

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परीसरात होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे शनिवार 12 जून रोजी 8 दरवाजे उघडण्यात आले आहेत. प्रकल्पातून 23523 क्यूसेक प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती जिल्हा सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असली तरी आतापर्यत समाधानकारक पर्जन्यवृष्टी झालेली नाही. परंतु शेजारील मध्यप्रदेशात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र परीसरात 6.3 मि.मी पावसाची नोंद झाली असून 1.40 दलघमी पाण्याची आवक झाली आहे. प्रकल्प पाणीपातळी 209.740 मिटर असून तापी पूर्णा नदीपात्रांत पाणीपातळीत वाढ झाल्याने शनिवारी सकाळी 11 वाजता प्रकल्पाचे 4 दरवाजे 1 मिटरने उघडण्यात आले होते. तर दुपारी 1 वाजेदरम्यान पुन्हा 4 दरवाजे असे एकूण 8 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले असून 23523 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे.

गतवर्षी 14 जून रोजी उघडले होते हतनूरचे 14 दरवाजे  

गतवर्षी देखिल मान्सूनच्या जोरदार पर्जन्यवृष्टीसह प्रकल्प पाणलोट क्षेत्रात पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे 14 जून रोजी पाणीपातळीत वाढ झाल्याने जिल्ह्यातील मोठया प्रकल्पांपैकी हतनूर मधून प्रथमतः 14 दरवाजे अर्धा मिटरने उघडण्यात येवून 13हजार 845 क्यूसेकचा विसर्ग करण्यात आला होता. तर आज प्रकल्प पाणीपातळीत वाढ झाल्याने  23523 क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. नागरीकांनी नदीपात्रात जावू नये अथवा जनावरे सोडू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीकाठच्या नागरीकांना सावधतेचा इशारा देण्यात आला असल्याचे हतनूर प्रकल्प पाटबंधारे कार्यकारी अभियंता एन.पी. महाजन यांनी म्हटले आहे.

अन्य प्रकल्पात सरासरी 35.15 टक्के उपयुक्त जलसाठा

जिल्ह्यात हतनूर प्रकल्प पाणलोट क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी पर्जन्यमान नसल्याने प्रकल्पात पाण्याची आवक झालेली नाही. गिरणा 32.61 तर वाघूर प्रकल्पात 62.66 टक्के आहे. वाघूर प्रकल्पातून डाव्या कालव्यातून 30 तर उजव्या कालव्याव्दारे 25 असे एकूण 55 क्युसेक पाण्याचे आवर्तन सिंचनासाठी सोडण्यात आलेले आहे. तर अन्य मध्यम आणि लघू असे 96 प्रकल्पात सरासरी 35.15टक्के जलसाठा असल्याचे जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

Back to top button