उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौर्‍यात संभाजीराजेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची पेरणी | पुढारी

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दौर्‍यात संभाजीराजेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची पेरणी

कोल्हापूर ः सतीश सरीकर

मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजे आक्रमक झाले आहेत. ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह सत्ताधारी व विरोधी पक्षातील बहुतांश नेत्यांची भेट घेऊन या प्रश्नावर त्यांनी चर्चा केली आहे. मराठा आरक्षणासाठी ते सर्वपक्षीय नेत्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांची राष्ट्रवादीशी जवळीक वाढल्याची चर्चा आहे. आता राष्ट्रवादीचे नेते व दस्तुरखुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाहू छत्रपती यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मराठा आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी दोघांची भेट झाली, असली तरी संभाजीराजे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुनर्प्रवेशाची पेरणी त्यातून झाल्याची चर्चा रंगली आहे. मराठा आरक्षणाचा केंद्रबिंदू होण्यासाठी राष्ट्रवादीची ही राजकीय खेळीही असू शकते, असे जाणकांरातून सांगण्यात येते. 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी शंभरवेळा भेट दिल्याचे संभाजीराजे सांगत नाहीत, असा टोला हाणला होता. खा. संभाजीराजे यांनी आपण फक्त देवेंद्र फडणवीस यांच्याशीच बोलतो, असे हिणवून पाटील यांच्या टीकेला बेदखल केले होते. मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, असे ठणकावून सांगितले होते. पाटील यांनी तुम्ही भाजपच्या शिफारशीतून खासदार झाल्याचे म्हटले होते. खा. संभाजीराजे व भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला. एकूणच संभाजीराजे व भाजप यांच्यात आता दुरावा निर्माण झाला आहे. त्यावरूनच संभाजीराजे नवा राजकीय पक्ष काढणार, अशीही शक्यता व्यक्त केली जात होती.

खा. संभाजीराजे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निडवणूक लढविली होती. परंतु, राष्ट्रवादीचे तत्कालीन बंडखोर उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला. राष्ट्रवादीतील बंडखोरांनीच मंडलिक यांच्या मागे ताकद उभी केल्याने संभाजीराजे यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर संभाजीराजे काही महिने राजकीय अज्ञातवासात गेल्याचे चित्र होते. राजकारणापासून चार हात लांब राहणे त्यांनी पसंत करत विदर्भ, मराठवाड्यात सामाजिक कार्य सुरू केले.

12 जून 2016 ला संभाजीराजे राष्ट्रपती कोट्यातून खासदार झाले. त्यासाठी भाजपची शिफारस महत्त्वपूर्ण ठरली. कालांतराने संभाजीराजे यांना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गडकोट किल्ले संवर्धन समितीचे प्रमुखपद देऊन ब—ँड अ‍ॅम्बॅसिडर केले. संभाजीराजे यांनी भाजपचे प्राथमिक सदस्यत्वही स्वीकारले. परंतु, शाहू छत्रपती हे संभाजीराजे यांच्या सदस्यत्वासाठी तयार नव्हते, असे सांगण्यात येते.संभाजीराजे यांचे बंधू माजी आमदार मालोजीराजे छत्रपती हे 2009 मधील विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर राजकारणापासून अलिप्त झाले. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून ते सक्रिय झाले आहेत. 2024 मध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी तयारी केल्याची चर्चा सुरू आहे. सद्यस्थितीत राष्ट्रवादीकडे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी सर्वमान्य चेहरा नाही. परिणामी, 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे यांना उमेदवारी देऊन रिंगणात उतरविण्याची तयारी आतापासून केले जाऊ शकते; मात्र शाहू छत्रपती हे संभाजीराजे व मालोजीराजे यांच्या राजकीय वाटचालीसाठी कितपत होकार देतात, यावरच या सर्व गोष्टी अवलंबून आहेत. त्यासाठीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौर्‍यात शाहू छत्रपती यांची घेतलेली भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

संभाजीराजेंना मराठा आरक्षण महत्त्वाचे

खा. संभाजीराजे यांनी यापूर्वीच मराठा आरक्षणासाठी प्रसंगी खासदारकीही सोडेन, असे जाहीर केले आहे. त्यानंतरच त्यांनी विविध पक्षांतील नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन चर्चा केली. मराठा आरक्षणासाठी ते ठाम आहेत. खा. संभाजीराजे यांचा स्वभाव पाहता त्यांना राजकीय महत्त्वाकांक्षा नसल्याचे जाणवते. परिणामी, राजकीय पक्ष, पक्ष प्रवेश यापेक्षा त्यांच्यासाठी मराठा आरक्षण महत्वाचे आहे, असे त्यांच्या निकटवर्तीयांतून सांगण्यात येते.

Back to top button