राजकीय अन् प्रशासकीय ढिलेपणा नडला! | पुढारी

राजकीय अन् प्रशासकीय ढिलेपणा नडला!

कोल्हापूर : संतोष पाटील

गेल्या महिन्याभरात कोल्हापुरातील कोरोना रुग्णसंख्या रोज हजाराचा टप्पा ओलांडत आहे. कोरोना संसर्गवाढीस जितका नागरिकांचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे, तितकाच प्रशासकीय आणि राजकीय ढिलेपणाही नडला आहे. दुसर्‍या लाटेत आपत्तीला तोंड देण्यात यंत्रणा कमी पडल्याचे वास्तव आहे. 

पहिल्या टप्प्यात गावांनी कोरोनाला वेशीतच रोखले, आता मात्र कोरोनाने गावोगावी थैमान घातले आहे. कोल्हापुरातील कोरोना स्थिती आटोक्यात आणण्यासाठी आता खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच यावे लागत आहे. 

कोल्हापुरात कोरोनाबाधितांचे प्रमाण राज्यात सर्वाधिक म्हणजे 15.85 टक्के  आहे. राज्यात सर्वाधिक 3,839 कोरोनाबाधित ऑक्सिजन बेडवर कोल्हापुरात आहेत.  रोज सरासरी 40 लोकांचा मृत्यू होत आहे. प्रतिबंधक लसींचा तुटवडा असून, लस घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. मला काय होतंय, या मनोवृत्तीमुळे स्वत:सह अख्खे कुटुंबच बाधित करण्यास अनेकजण कारणीभूत ठरले. त्याचबरोबर कॉन्टॅ्रक्ट ट्रेसिंगकडेही काहीसे दुर्लक्ष झाले. होम आयसोलेट रुग्णांची बेफिकिरी रुग्णसंख्येत भर घालणारी ठरली. विशेष म्हणजे अपवाद वगळता लोकप्रतिनिधी कोरोना काळात करतात तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य कोल्हापूरकरांना पडला आहे. जिल्ह्यात दोन खासदार आणि डझनभर आमदार, तीन मंत्री आहेत. पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जिल्हाधिकारी कार्यालयातून सूत्रे हलवताना दिसतात, तर दुसरीकडे एखाद्दुसर्‍या कोरोना केअर सेंटरचे उद्घाटन, बैठका घेण्यापलीकडे खासदार, आमदारांचा कोरोना लढ्यात म्हणावा तितका सक्रिय सहभाग नसल्याची सर्वसामान्यांची भावना आहे.  

राज्यात कोरोना संसर्ग कमी होत असताना कोल्हापुरातील वाढणारा आकडा पाहून प्रतिबंधात्मक उपायांसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. दरम्यान, पुणे, मुंबईनंतर कोल्हापूर, सांगली, सातार्‍यातील रुग्णसंख्या वाढते आहे.  तेथील रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर काही कालावधीनंतर या जिल्ह्यातीलही रुग्णसंख्या कमी होत असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. 

असे असले तरी सध्या कोल्हापुरातील वाढता संसर्ग कमी करण्यासाठी आता उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत. पवार आपल्या स्टाईलने यंत्रणेला सूचना देतील, त्यानंतर मरगळ झटकून यंत्रणा कामालाही लागेल; पण असे असले तरी यामध्ये कसलेही राजकारण होऊ नये,  कोरोनाच्या आडाने राजकीय उट्टे काढले जाऊ नयेत, अशी अपेक्षा आहे.

आ. लंकेंना जमते, मग तुम्हाला का नाही ?

लोकसहभागातून कोव्हिड रुग्णालय, विलगीकरण केंद्र, औषधोपचाराची सुविधा मोठ्या प्रमाणात उभी करणे सहज शक्य होते. मात्र, यातही मोजकी उदाहरणे वगळता अनेक लोकप्रतिनिधींची पाटी कोरीच राहिली. अहमदनगर जिल्ह्यातील आ. नीलेश लंके यांनी लोकसहभागातून एक हजार आणि 1100 असे 2100 बेडचे कोव्हिड सेंटर उभारून उत्तम पद्धतीने चालवले आहे. असेच काम कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी का करून दाखवले नाही?, असा रास्त सवाल लोक उपस्थित  करत आहेत.

Back to top button