‘माझ्यावर पाळत ठेवून पाठलाग’ : गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई  | पुढारी

‘माझ्यावर पाळत ठेवून पाठलाग’ : गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई 

सातारा : पुढारी वृत्तसेवा

रविवारी संध्याकाळी 6 नंतर आपण सातारा शहरात ईव्हिनिंग वॉक करत असताना दोन युवकांनी दुचाकीवरुन येवून पाळत ठेवून आपला पाठलाग करत आपले चित्रीकरण केल्याची माहिती राज्याचे गृहराज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी इलेक्ट्रॉनिक माध्यमांना दिली. जिल्हा पोलिस दलालाही त्यांनी अशीच माहिती दिल्याने पोलिस दलाकडून कथित प्रकाराची चौकशी सुरू आहे. 

याबाबत ना. शंभूराज देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सातारा शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर सुरु आहे. यामुळे प्रशासनाने शनिवार, रविवार लॉकडाऊन लावला आहे. गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांचे पोवई नाक्यावर निवासस्थान आहे. रविवारी सायंकाळी ते अंगरक्षकांसोबत पायी चालत घरातून बाहेर पडले. पोवई नाक्यावरुन खालच्या रस्त्याने जात असताना दुचाकीवरुन आलेल्या दोन युवकांनी त्यांचे शुटींग करण्याचा प्रयत्न केला. ही बाब अंगरक्षकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी हटकले. यामुळे ते युवक तेथून निघून गेले.

काहीवेळानंतर मात्र ना.शंभूराज देसाई यांच्या दिशेने तेच युवक पुन्हा तेथे आले व दुचाकीवरुन सुसाट तेथून निघून गेले. ही बाब समोर आल्यानंतर ना. शंभूराज देसाई अंगरक्षकासोबत तेथून निघून गेले. घडलेल्या घटनेची माहिती त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना दिली. तात्काळ पोलिसांनी त्यांच्या निवासस्थानामध्ये जावून अधिक माहिती घेवून तपासाला सुरुवात केली. 

रात्रभर पोलिस तपास करत असताना त्यांना काही सीसीटीव्ही फुटेज सापडले. ते ना. देसाई यांना दाखवले असता त्यांना ते युवक नसल्याचे सांगितले. यामुळे सोमवारी पुन्हा दिवसभर तपासाला सुरुवात केली. सोमवारी सकाळी जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख धीरज पाटील यांच्यासह संपूर्ण पोलिस दलाची टीम देसाई यांच्या बंगल्यावर हजर होती. संपूर्ण प्रकाराची उलटसुलट चर्चा सुरू असून माध्यमांचे तपासाकडे लक्ष आहे. 

Back to top button