आघाडी सरकार काका-पुतण्यांच्या हातचे बाहुले : आ. गोपीचंद पडळकर | पुढारी

आघाडी सरकार काका-पुतण्यांच्या हातचे बाहुले : आ. गोपीचंद पडळकर

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

सत्तेसाठी टोकाचे मतभेद असलेे तरी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्ष एकत्र येऊन महाविकास आघाडी झाली. पण ही महाविकास आघाडी निव्वळ राष्ट्रवादीच्या बारामतीकर काका-पुतण्याच्या हातचे बाहुले आहे. कोणाचेच काही चालत नाही, असा आरोप भाजपचे आमदार व धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केला. 

राष्ट्रवादी जातीयवादी पक्ष असून त्यांनीच मराठा तसेच धनगर आरक्षण रोखून धरले आहे, असा आरोप त्यांनी केला. मंगळवारी (दि. 15) पंढरपुरात राज्यातील ओबीसी समाज आरक्षण व पदोन्नती आरक्षणासंदर्भात  राज्याच्या दौर्‍याला नामदेव पायरीचे दर्शन घेऊन सुरुवात केली. पंढरपुरात लोहार, सुतार, कुंभार, माळी, तेली, गोंधळी, डवरी, घडसी, शिंपी, गोसावी, यलमार, वडार आदी 21 समाजांच्या घोंगडी बैठका घेतल्या. त्यावेळी ते बोलत होते. 

पडळकर म्हणाले, राज्यात जो उपेक्षित समाज आहे, जो वंचित, पीडित आहे, अशा 346 जमातींच्या घरी घोंगडी बैठकांचे आयोंजन करण्यात आले आहे. प्रत्येक गावात जाऊन त्यांचे प्रश्‍न समजावून घेणे, त्या प्रश्‍नांवरती आवाज उठवणे, अशा पध्दतीचे राजकारणविरहित नियोजन करण्यात आले आहे. 

ते म्हणाले, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेतीलआरक्षण सर्वोच्च  न्यायालयाने रद्द केलेले आहे. या गोष्टीला राज्य सरकार जबाबदार आहे. डिसेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते की, तुम्ही राज्य मागासवर्गीय आयोगाची स्थापना करा. तसा लेखाजोखा सादर करा. परंतु, राज्य सरकारने आयोगाची स्थापना न केल्याने सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केले. 

पडळकर म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसींच्या न्यायासाठी ज्यावेळी केंद्र सरकार मागासवर्गीय आयोग स्थापन करत नव्हते तेव्हा त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर लगेच काका कालेलकर आयोगाची स्थापना झाली. भारत देशातील ओबीसींना न्याय मिळाला.

ते म्हणाले, सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये काका-पुतण्यांच्या पुढे कोणाचेच  काहीच चालत नाही. जो तो वाटा मिळतोय तो घेऊन गप्प बसण्याचा उद्योग शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने चालू केला आहे.   

यामुळेच ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठीच राज्यभर घोंगडी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. पंढरपूर, मोहोळ, माढा, करमाळा, कर्जत जामखेड, दौंड, बारामती व जेजुरी याठिकाणी जाऊन ओबीसींचे प्रश्‍न, अडचणी समजावून घेऊन त्या सरकारच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा  प्रयत्न करणार आहे. 

यावेळी आ. पडळकर यांनी शहीद मेजर कुणाला गोसावी यांच्या कुटंबीयांची भेट घेतली. याप्रसंगी माऊली हळणवर, सुभाष मस्के आदी उपस्थित होेते.

Back to top button