मुख्यमंत्र्यांना आषाढी महापूजेपासून रोखणार | पुढारी | पुढारी

मुख्यमंत्र्यांना आषाढी महापूजेपासून रोखणार | पुढारी

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा

आषाढी यात्रेपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाज आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावावा. त्यानंतर आषाढीच्या महापूजेसाठी पंढरपुरात यावे. अन्यथा त्यांना आषाढीच्या महापूजेपासून रोखू, असा इशारा धनगर आरक्षण कृती समितीच्या बैठकीत देण्यात आला.

धनगर आरक्षण कृती समितीच्या पदाधिकार्‍यांची मंगळवारी (दि. 15) येथील अहिल्यादेवी होळकर वाड्यात बैठक पार पडली. या बैठकीनंतर धनगर आरक्षण कृती समितीचे राज्य समन्वयक परमेश्‍वर कोळेकर व आदित्य फत्तेपूरकर यांनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे.

यासंदर्भात फत्तेपूरकर म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय वर्षानुवर्षे भिजत घोंगडे आहे. वास्तविक महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी हा प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले होते. परंतु, आज दोन वर्षे होऊनही सरकारने प्रश्‍न मार्गी लावला नाही. यासंदर्भात कोणीच काही बोलायला तयार नाही. 

ते म्हणाले, मराठा आरक्षणाबाबतही सरकारने हलगर्जीपणा करून ते कायद्याच्या आडून अडचणीत आणले. धनगर समाजाचा विचार करायला तयार नाहीत. सर्वजण सत्तेत मश्गुल असल्याने यांना आता हिसका दाखविण्याची वेळ आली आहे.

राज्य सरकारने तत्काळ दोन्ही सभागृहाचे विशेष अधिवेशन घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामध्ये मराठा समाज आरक्षणाचा ठराव बहुमताने मंजूर करून घेण्याची शक्यता आहे. याच अधिवेशनामध्ये राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाचाही प्रश्‍न उपस्थित करावा. धनगड आणि धनगर हा जो संभ्रम आहे, त्याविषयी राज्य सरकारने धनगड नसून धनगर आहेत, असा ठराव बहुमताने मंजूर करून तो अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारकडे पाठवावा. 

फत्तेपूरकर म्हणाले, आषाढीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तो ठराव मंजूर करूनच पंढरपूरला यावे. तसे केल्यास धनगर समाज त्यांचे स्वागत करेल. अन्यथा त्यांना आषाढीच्या महापूजेला येऊ देणार नाही. त्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजू.

या बैठकीला शालीवहन कोळेकर, आदित्य फत्तेपूरकर, द्रोणाचार्य हाके, सोमनाथ ढोणे, महेश येडगे, पांडुरंग भेंकी, राजाभाऊ उराडे, पंकज देवकते, बालाजी एडगे, संजय लवटे, अण्णा सलगर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button