टेस्टिंग, ट्रेसिंग जैसे थे ! उपमुख्यमंत्री पवार यांचा आदेशही धाब्यावर | पुढारी

टेस्टिंग, ट्रेसिंग जैसे थे ! उपमुख्यमंत्री पवार यांचा आदेशही धाब्यावर

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या ध्यानात घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर दौर्‍यावर असताना जिल्ह्यातील टेस्टिंग व ट्रेसिंग वाढवा, असे सक्त आदेश दिले होते. रोज सध्यापेक्षा दुप्पट चाचण्या करा, अशी सूचना केली होती; पण जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अंमलबजावणी झाली नसून, उपमुख्यमंत्र्यांचा आदेशही धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या व मृतांच्या संख्येत कोल्हापूर जिल्हा आघाडीवर आहे. त्यामुळे नेमका आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. यावेळी पहिल्या लाटेत कोरोना संसर्ग रोखण्यात यशस्वी ठरलेले जिल्हा प्रशासन दुसर्‍या लाटेत अपयशी ठरल्याचे ना. पवार यांनीच सांगितले. प्रशासनाने टेस्टिंग व ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे. सध्या पाच ते सात हजारांपर्यंतचे टेस्टिंग होते ते प्रमाण रोज दहा ते वीस हजारांपर्यंत वाढवा. यातून सुरुवातीला रुग्णसंख्या वाढेल; पण नंतर यावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असा अंदाज वर्तवला. ज्या गावांत कोरोना रुग्ण अधिक आहेत ती गावे पिंजून काढा व चाचण्या करा. रस्त्यावर विनाकारण फिरणार्‍यांच्या चाचण्या करा, असेही आदेश दिले.

ना. पवार यांच्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाने बैठक घेऊन प्रत्येक तालुकानिहाय चाचण्या (टेस्टिंग) वाढविण्याचे उद्दिष्ट निश्चित केले. त्यानुसार 16 जून रोजी आदेशही काढले. तालुक्याच्या लोकसंख्येनुसार 100 ते 4,580 चाचण्या करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. उपमुख्यमंत्री पवार हे कोल्हापूर दौरा आटोपून गेल्यानंतर दैनंदिन चाचण्यांमध्ये काही प्रमाणात वाढ होणे अपेक्षित होते. परंतु, उलट त्यात घट झाल्याचेच चित्र आहे. 

दैनंदिन सरासरी 9 ते 10 हजार 

असणारे चाचण्यांचे प्रमाण अजूनही आठ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे या चाचण्या कधी वाढतील आणि जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट कसा कमी येईल, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी आल्यानंतरच कोरोना नियंत्रणात येणार आहे व कोल्हापूर जिल्हा चौथ्या टप्प्यातून किमान तिसर्‍या किंवा दुसर्‍या टप्प्यात येण्यास मदत होणार आहे; पण प्रशासनाकडूनच सकारात्मक पावले उचलली जात नसतील, तर मग मंत्र्यांच्या दौर्‍याचे फलित काय? असा प्रश्नही उपस्थित होत  आहे.

जिल्ह्यातील चार दिवसांची चाचणी स्थिती

दिनांक    प्रतिदिन चाचण्या    बाधित    मृत्यू

दि. 15    7,582    1,090    28

दि. 16    7,930    1,197    34

दि. 17    8,174    1,183    39

दि. 18    9,061    1,180    34

तालुकानिहाय चाचण्यांचे उद्दिष्ट

आजरा 1,000, भुदरगड 680, चंदगड 700, गडहिंग्लज 1,425, गगनबावडा 100, करवीर 4,580, हातकणंगले 3,260, शिरोळ 1,300, कागल 1,000, पन्हाळा 1,600, शाहूवाडी 1,100.

तपासणी नाक्यांवर होणार चाचणी; पण कधी?

या वाढवलेल्या चाचण्यांतर्गत किणी, आंबा, फोंडा, कागल चेक पोस्ट, कोगनोळी नाका आणि अंकली येथे चाचणी होणार आहे; मात्र कधी होणार? त्याला मुहूर्त कधी लागणार? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Back to top button