आ. नीलेश लंके यांच्या कौतुकाच्या फोनने भारावले शशिकांत खोत.! | पुढारी

आ. नीलेश लंके यांच्या कौतुकाच्या फोनने भारावले शशिकांत खोत.!

सेनापती कापशी : मधुकर भोसले ;‘हॅलो, मी पारनेर वरून नीलेश लंके बोलतोय. आपण कोरोनाकाळात आपल्या परिसरात खूप चांगले काम करीत आहात. या कार्याला माझ्याकडून शुभेच्छा तसेच यापुढेही तुमच्या हातून समाजसेवेचे काम होत राहो..!’ कोरोना महामारीत आपल्या अफाट सेवाकार्याने राज्यभर गाजत असलेल्या आमदार नीलेश लंके यांचा हा कॉल होता, सेनापती कापशी येथे एक आदर्श कोरोना केअर सेंटर उभारून चिकोत्रा खोर्‍यात सेवा, दातृत्व व परिश्रमाचा आदर्श उभारणारे सेनापती कापशीचे कर्तृत्ववान व सेवाभावी व्यक्तिमत्त्व शशिकांत खोत यांना..! या कॉलने खोत भारावून तर गेलेच; पण आपला हुरूप आणखी वाढल्याची भावना देखील खोत यांनी व्यक्त केली.

ज्यांची ‘महाडॉक्टर’ अशी ओळख आहे, ते राज्याचे ग्रामविकास व कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वावर अपार निष्ठा ठेवून कार्यरत असलेले पंचायत समितीचे माजी सदस्य  शशिकांत खोत यांनी ना. मुश्रीफ यांच्यातील आरोग्यसेवेचा गुण आत्मसात केला आहे. कोरोनाकाळात हीच आरोग्य सेवा नितांत गरजेची आहे याची खूणगाठ पक्की बांधत, चिकोत्रा खोर्‍यातील कोरोनाग्रस्तांना आपल्याच परिसरात जर माया, प्रेम, आधार व उपचार देणारे सुसज्ज कोव्हिड केंद्र उभारण्याचा निर्धार शशिकांत खोत यांनी केला व 29 मे रोजी ज्यांचे हिमालयाएवढे पाठबळ खोत यांना नेहमीच असते, त्या ना. मुश्रीफ यांच्याच हस्ते येथील न्यायमूर्ती रानडे विद्यालयात 45 बेडचे व त्यातही 16 ऑक्सिजन बेड असलेले हे केअर सेंटर सुरू झाले. गरज वाढल्यामुळे पुढे ते 65 बेडचे झाले. तेथे 20 ऑक्सिजन बेड कार्यरत आहेत.

आज तीन आठवड्यांनंतर आजपर्यंत इथे 118 रुग्ण दाखल झाले, तर 69 बरे होऊन घरी परतले असून, 49 जणांवर उपचार सुरू आहेत. जोपर्यंत रुग्णांचा आकडा शून्य होत नाही, तोपर्यंत हे सेंटर याच क्षमतेने व सेवाभावाने व रुग्णांकडून एकही रुपया न घेता सुरू राहील, असा शशिकांत खोत यांनी व्यक्त केलेला निर्धार त्यांच्यातील सेवाभाव, आत्मीयता व तळमळ अधोरेखित करणारा आहे..!

इथे काय घडते…?

या सेंटरच्या कामात खोत यांनी स्वतःला समर्पित वृत्तीने व तन, मन, धनाने वाहून घेतले आहे. रुग्णाला उपचार केंद्रात आल्यावर आपण घरातच आहोत याची जाणीव होते. खोत स्वतः पहाटे तास-दीड तास या रुग्णांचा योगा, प्राणायाम घेतात, नाष्टा, जेवण याच्या तयारीत व ते तो वाढण्यात खोत सक्रिय असतात; पण इथली औषधे व वैद्यकीय सेवा तसूभरही कमी पडणार नाही यासाठी ते सदैव तत्पर असतात. इतकेच नव्हे तर या रुग्णांसोबतच ते जेवण करतात. या कार्यात खोत यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या सौ. शिल्पाताई खोत यांचेही योगदान बहुमोल आहे.

शशिकांत खोत व त्यांच्या सहकार्‍यांनी सेंटरवर ठेवलेले आनंदी वातावरण, रुग्णांना दिला जाणारा सकस आहार, योगा व व्यायाम याद्वारे विकसित केली जाणारी शारीरिक क्षमता, स्वच्छ व सुंदर परिसर, मानसिक समुपदेशन, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले जाणारे योग्य उपचार, रुग्णांच्या करमणुकीसाठी एलईडी स्क्रीन, त्यांच्या सर्व प्राथमिक गरजा यामुळे रुग्ण इथे प्रथम मानसिकदृष्ट्या सक्षम होतो व त्यामुळे तो खचून जात नाही. परिणामी तो लवकर बरा होतोच; पण एखादी माऊली बरे झाल्यावरसुद्धा तिला घरी जाण्यापेक्षा इथेच राहण्यात अधिक आनंद वाटतो. यापेक्षा आणखी या केंद्राच्या यशाच्या मोजमापाचे परिमाण काय असू शकते? म्हणून तर कागलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी जेव्हा प्रत्यक्ष हे अनुभवले, तेव्हा त्यांनी हे सेंटर जिल्ह्यातील एक आदर्श सेंटर असल्याचे गौरवोद्गार तर काढलेच; पण हे काम थेट पारनेर येथे 

आमदार नीलेश लंके यांच्यापर्यंत पोहोचले..!

शशिकांतदादा म्हणजे दुसरे मुश्रीफसाहेबच..!

या सेंटरमधून दहा दिवसांच्या उपचारानंतर घरी परतणारे अर्जुनवाडा येथील रहिवाशी कृष्णा सातवेकर हे घरी परतताना भारावून गेले. त्यांनी मृत्यूच्या दारातून आपण परत आल्याचे सांगून शशिकांतदादा म्हणजे कागल तालुक्यातील मुश्रीफ साहेबांसारखा दुसरा देवमाणूस असल्याचे मत व्यक्त केले. दादांचे हे कोरोना काळातील काम खूपच मोठे असून, ते घरातल्या माणसांसारखी दिवसरात्र रुग्णांची काळजी घेतात हेही सांगायला ते विसरले नाहीत. खोत हे स्वतः मेडिकल क्षेत्रातील असल्याने त्यांच्या त्या अनुभवाचा फायदा येथे होत आहे. आता सामाजिक पातळीवर हे सेंटर इतके लोकप्रिय झाले आहे की, खोर्‍यातील तरुणाई आता या सेंटरमध्ये येऊन आपले वाढदिवस साजरे करून तो खर्च या सेवाकार्याला देत आहेत. मदतीचे व आशीर्वादाचे अनेक हात या सेंटरला आदर्श बनवत आहेत. यामध्ये कापशी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी तर आहेतच, पण सर्व खासगी डॉक्टरदेखील क्रमवारीनुसार सेवा देत आहेत. चिकोत्रा खोरे लवकर कोरोनामुक्त करण्यासाठी खोत यांनी  27 गावांत मोफत आरोग्य तपासणी शिबिरेदेखील सुरू केली आहेत.

या सेवेचे समाधान शब्दातीत..!

सेवा धर्मी पुण्य आहे, सांगे सखा श्रीहरी..! या वचनातील मर्म जाणून ते कृतीत आणणारे शशिकांत खोत यांना या कामाबद्दल  विचारले असता ते म्हणाले की, आजवर मी सामाजिक, राजकीय क्षेत्रात नेहमीच कार्यरत राहिलो. अनेक कामे केली. मात्र, त्या सर्वांपेक्षा या सेवेचा आनंद, समाधान खूप वेगळे व शब्दातीत आहे. ना कोणी नात्याचे, ना कोणी रक्ताचे तरीही इथून बरे होऊन जाताना जेव्हा त्या रुग्णांचे डोळे भरून येतात तेव्हा आपण व सहकार्‍यांनी घेतलेल्या परिश्रमाचे सार्थक झाल्याची भावना आम्हास आणखी ऊर्जा देते. त्यामुळे यापुढे देखील हे आरोग्य सेवेचे काम आपण प्राधान्याने करीतच राहणार आहे..!


 

Back to top button