देशाच्या राजकारणात शिवसेना महत्वाची भूमिका बजावेल; संजय राऊतांचा सूचक इशारा | पुढारी

देशाच्या राजकारणात शिवसेना महत्वाची भूमिका बजावेल; संजय राऊतांचा सूचक इशारा

मुंबई; पुढारी ऑनलाईन : आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका मांडली आहे. हिंदुत्व आणि मराठी हे विषय शिवसेनेसाठी जिव्हाळ्याचे आहेत. शिवसेनेच्या स्थापनेवेळी शिवसेना पक्ष मुंबई आणि ठाणे पुरता मर्यादित राहणार असं म्हटलं जात होतं. पण आज राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेनं राज्याची सीमा ओलांडली असून दिल्लीपर्यंत धडक मारली आहे. यापुढे देशाच्या राजकारणात शिवसेना महत्वाची भूमिका बजावेल, असा सूचक इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

वाचा : शिवसेना ५५ वा वर्धापन दिन विशेष : वसंतदादांचं एक विधान शिवसेनेसाठी टर्निंग पॉइंट ठरलं 

दरम्यान, वर्धापनादिनानिमित्त शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेच्या वाटचालीविषयी भाष्य केले आहे. ‘महाराष्ट्रात आज शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. शिवसेनेची सत्ता आहे, पण सत्तेचा ऊतमात ना शिवसेनेच्या सताधाऱ्यांना चढला, ना आमच्या लाखो कडकट शिवसैनिकांना. पण कुणी अंगावर येऊन डिवचण्याचा प्रयत्न केलाच तर ‘हर हर महादेव’चा गजर करीत जिथल्या तिथे हिशेब करायला शिवसैनिक मागेपुढे पाहत नाहीत. शिवसेना ही अशी धोपटमार्गी आणि रोखठोक असल्याने जनतेच्या दिलावर ती ५५ वर्षे राज्य करीत आहे. शिवसेना हीरक महोत्सव, अमृत महोत्सव, शतक महोत्सवही साजरा करीलच करील. शिवसेनेची घोडदौड सुरुच राहील, असा विश्वास शिवसेनेने व्यक्त केला आहे.

शिवसेनेने आपले रंग सरड्यासारखे बदलले नाहीत. कष्टकरी, शेतकरी, नोकरदारवर्गाने शिवसेनेला भरभरुन पाठबळ दिले ते याच सचोटीच्या राजकारणामुळे. असेही शिवसेनेने पुढे म्हटले आहे.

वाचा : काँग्रेसच्या अपयशाची जबाबदारी कोणाची; राहुल गांधींची की, संपूर्ण पक्षाची?

दरम्यान, शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना आज सायंकाळी ६.३० वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. यंदा कोरोनाचे नियम पाळत हा वर्धापन दिन सोहळा व्हर्च्युअल स्वरुपात होईल, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली आहे.   

Back to top button