सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारपासून निर्बंध काही प्रमाणात शिथिल | पुढारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारपासून निर्बंध काही प्रमाणात शिथिल

सिंधुदुर्गनगरी ः पुढारी वृत्तसेवा ;सिंधुदुर्ग जिल्हा आता हळूहळू सकारात्मकतेकडे निघाला असून जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 9 च्या आत आला आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन बेड वापर 60 टक्केच्या आत असल्याने सिंधुदुर्ग जिल्हा तिसर्‍या टप्प्यात आला आहे. यामुळे सोमवारपासून जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सर्व दिवस सायंकाळी 4 वा. पर्यंत सुरू राहतील. तर अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वा.पर्यंत सुरू राहतील. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार 4 वा. पर्यंत 50 टक्के आसन क्षमतेवर सुरू राहणार आहेत.

लग्नसमारंभांना 50 व्यक्ती तर अंत्यविधीला 20 व्यक्तींंना परवानगी देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी शुक्रवारी काढले.दरम्यान, जिल्ह्यातील निर्बंध थोडेसे शिथिल झाले असले तरीही आपण तिसर्‍या लाटेला निमंत्रण देणार नाही. याची काळजी सर्वांनीच घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.

जिल्ह्यातील कोरोना स्थिती भयावह दिशेने गेली होती. मे महिन्यामध्ये 32 टक्के पॉझिटिव्हिटीपर्यंत गेलेला दर आता हळूहळू कमी होऊ लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा आता कोरोनाच्या वाईट स्थितीकडून सकारात्मक दिशेने चालला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा तिसर्‍या टप्प्यात पोहोचला असल्याची माहिती ना. सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

जिल्ह्यात ऑक्सिजनने वेढलेले बेड 60 टक्केपेक्षा कमी आले आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा तिसर्‍या टप्प्यात आला असून जिल्ह्यातील लॉकडाऊनचे बरेच निर्बंध शिथिल करण्यात आले

आहेत. जिल्ह्यातील सर्व अत्यावश्यक सेवा सर्व दिवशी सायंकाळी 4 वा.पर्यंत सुरू राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने व आस्थापना या सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र ही सर्व दुकाने व आस्थापने शनिवार व रविवार बंद राहणार आहेत.

कृषी सेवा संदर्भातील सर्व दुकाने सर्व दिवशी 4 वा.पर्यंत सुरू राहणार आहेत. तर लग्न समारंभांना जास्तीत जास्त 50 लोकांच्या उपस्थितीसह मान्यता देण्यात आली आहे. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वा.पर्यंत 50 टक्के आसन क्षमतेनुसार सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र सायंकाळी 4 नंतर पार्सल सेवा चालू राहील. तसेच शनिवार आणि रविवार फक्त पार्सल व होम डिलिव्हरी सुविधा सुरू ठेवता येणार आहे.

नव्या मार्गदर्शक तत्वानुसार मॉल्स, सिनेमा हॉल, नाट्यगृह बंद राहणार आहेत. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे, सायकलिंग दररोज पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरू राहतील.  खाजगी आस्थापना, कार्यालय सोमवार ते शुक्रवार 4 वा.पर्यन्त सुरू राहील. धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, करमणुक कार्यक्रम, मेळावे घेण्यास सोमवार ते शुक्रवार परवानगी देण्यात आली आहे. मात्र यासाठी हॉल आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीत व सायंकाळी 4 वा.पर्यंतच घेता येणार आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था 50 टक्के क्षमतेनुसार सर्वसाधारण सभा घेऊ शकतात. ज्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची सोय असेल अशा ठिकाणी बांधकाम कामास परवानगी, ई कॉमर्स-वस्तू व सेवा यामध्ये फक्त अत्यावश्यक सेवेमध्ये मोडणार्‍या ई कॉमर्स सेवा सुरू राहतील. कृषी सेवा सर्व दिवस 4 वा पर्यंत सुरू राहतील. व्यायामशाळा, केशकर्तनालय, ब्युटीपार्लर, वेलनेस सेंटर 50 टक्के  क्षमतेसह  दररोज एसी वापराविना  दु. 4 वा. पर्यंत सुरू राहतील. मालवाहतूक  जास्तीत जास्त 3 व्यक्ती घेऊन नियमित सुरू राहील.

खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवाशांचा आंतरजिल्हा प्रवास नियमित सुरू राहील. मात्र प्रवासी लेव्हल 5 मधील भागातून अथवा जिल्हा मार्गे प्रवास करीत असल्यास अशा प्रवाशांना ही पास आवश्यक राहणार आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकानेही दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच सदर ठिकाणी काम करणार्‍या व्यक्ती किंवा सदर दुकानांमधून सेवा घेणार्‍या व्यक्तींना सायंकाळी  5  नंतर हालचाल प्रवास करण्यास परवानगी राहणार नाही. उपरोक्त आदेशाचे पालन न करणार्‍या व्यक्ती अथवा संस्थेवर  फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान तसे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी काढले आहेत.

 सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारपर्यंत 4 वाजेपर्यंत सुरू

 लग्न समारंभाला 50 तर अंत्यसंस्कारासाठी 20 व्यक्तींना परवानगी

 जनतेने काळजी घेण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

Back to top button