पत्राद्वारे सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न | पुढारी

पत्राद्वारे सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना आ. प्रताप सरनाईक यांचे पत्र म्हणजे भाजपचा सरकार अस्थिर करण्याचा अजून एक प्रयत्न आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरण, परमबिरसिंग यांचा लेटरबॉम्ब आदी पन्नास प्रयत्न करूनही महाविकास आघाडी भक्कम असल्यानेच सरकार पाडण्याचा हा नवा प्रयत्न भाजपकडून सुरू असावा, असा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.  

भाजपचे असे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. उलट महाविकास आघाडी 25 वर्षे चालेल, असा विश्वासही ना. मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.

आ. सरनाईक यांचे पत्र हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेनेचे पदाधिकारी फोडतात हे निराधार असून याचा खुलासा होणे गरजेचे असल्याचे सांगून ना. मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर  जिल्हा परिषदेत शिवसेनेचे दहा तर काँग्रेस-राष्ट्रवादी-अपक्ष 33 सदस्य आहेत. तरीही मोठ्या मनाने आम्ही शिवसेनेला तीन पदे दिली. ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सहा संचालक शिवसेनेचे निवडून आले. 

काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांतील एकमेकांचे कार्यकर्ते आम्ही फोडतोच. मात्र, शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना हात लावायचा नाही हे ठरले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील अस्वस्थ असून कधी एकदा खुर्चीवर बसतो असे त्यांना झाले आहे. त्यांना  छातीवर नाहीतर डोक्यावर हात ठेवून सांगतो की, महाविकास आघाडीत आम्ही सर्वजण सुखात आहोत.

Back to top button