माजी सभापतीने बीडीओवर बूट फेकून मारला | पुढारी

माजी सभापतीने बीडीओवर बूट फेकून मारला

श्रीगोंदा ; पुढारी वृत्तसेवा : लोणी व्यंकनाथच्या सरपंचावर अपात्रेची कारवाई करण्याबाबत प्रस्ताव का तयार केला याचा मनात राग धरुन गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना मारहाण करण्यात आली. बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी दमबाजी करत गटविकास अधिकारी काळे यांच्या गाडीवर बूट फेकून मारत त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. ही घटना (दि. २१) दुपारी दोन वाजून पस्तीस मिनिटांनी घडली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात नाहटा यांच्याविरोधात शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून नाहटा यांना अटक करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : ‘कर्जत – जामखेडच्या वाट्यालाही पवारांचे दुखणे’

गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, आज दुपारी पंचायत समितीच्या शासकीय सभागृहात व्हिडिओ कॉन्फरन्ससाठी जात असताना बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा तिथे आले. त्यांनी माझ्या हातात कागद देत लोणी व्यकनाथ ग्रामपंचायत सरपंचावर कारवाई करणार का असे विचारले असता हो त्यांच्यावर आपात्रतेच्या कारवाईचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगताच नाहटा यांनी शिवीगाळ करत दमबाजी करण्यास सुरुवात केली. 

अधिक वाचा : ‘मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्यास राज्‍य सरकार जबाबदार’

तिथून गटविकास अधिकारी काळे हे पंचायत समिती कार्यालयातून बाहेर पडत शासकीय गाडीत बसत असताना पुन्हा नाहटा यांनी काळे यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ केली. दरम्यान पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी नाहटा यांना आवरत बाजूला नेले. त्याच दरम्यान गटविकास अधिकारी काळे हे शासकीय वाहनात बसत असताना नाहटा यांनी त्यांच्या पायातील बूट काढत गटविकास अधिकारी काळे यांच्या दिशेने भिरकावला. फेकून मारलेला बूट वाहनाच्या काचेवर लागल्याने काळे बचावले. 

अधिक वाचा : ‘तिसरी किंवा चौथी आघाडी भाजपला यशस्वीपणे आव्हान देऊ शकेल याची खात्री नाही’

गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या फिर्यादीवरून बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

राजकीय आकसातून गुन्हा – नाहटा

घडलेल्या प्रकाराबाबत बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आपण गटविकास अधिकारी प्रशांत काळे याना फक्त तालुक्यातील काही ग्रामपंचायतच्या कामाबाबत जाब विचारला त्याचा राग आल्याने ते पोलीस ठाण्यात गेले. याच संधीचा फायदा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना चौदा फोन करून गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणला. हा नेता कोण त्याचे काय कारनामे आहेत हे बाहेर आल्यावर उघड करणार असल्याचे नाहटा म्हणाले.

राजकीय हस्तक्षेप 

नाहटा यांनी गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्यावर बूट फेकून मारल्याची घटना घडल्यानंतर ही बातमी सामाजिक माध्यमांमधून तालुक्यात पसरली. नाहटा विरोधकांनी हीच संधी साधत तात्काळ गुन्हा दाखल कसा होईल यासाठी वेगवान हालचाली केल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

Back to top button