गोव्यात कायदा शिक्षण विद्यापीठ स्थापन होणार | पुढारी

गोव्यात कायदा शिक्षण विद्यापीठ स्थापन होणार

पणजी ; पुढारी वृत्तसेवा : गोव्यात भारतीय आंतरराष्ट्रीय कायदा शिक्षण व संशोधन विद्यापीठाची स्थापना करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. अखिल भारतीय बार काउंन्सिलने राज्य सरकारकडे याविषयी मान्यता व जागेची मागणी केली होती, त्यानुसार त्यांची मागणी पूर्ण करण्यात आली आहे, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी दिली. 

अधिक वाचा : बॉक्सिंग संघटनेचे २२ लाखांचे अनुदान थकीत 

या विद्यापीठाची गोव्यात स्थापना होत असल्याने ती एक महत्त्वाची बाब असणार आहे. या विद्यापीठासाठी राज्य सरकार फक्त जागा देणार असून, त्याच्या उभारणीपासून ते चालविण्यापर्यंतचा सर्व खर्च बार कौन्सिल करणार आहे. या विद्यापीठात गोव्यासाठी २० टक्के जागा आरक्षित असणार आहेत, असेही सावंत यांनी सांगितले. 

अधिक वाचा : बंद सरकारी शाळांच्या इमारती भाडेपट्टीने देणार

विद्यापीठाबरोबरच राज्यात आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राची स्थापनाही केली जाणार आहे. कायद्याशी संबंधित असल्याने अखिल भारतीय बार काउंसिलने हा निर्णय घेतला आहे. हे सेंटरही काउंन्सिलच चालविणार आहे. सिंगापुरमध्ये अशाप्रकारचे आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र आहे. दरम्यान, माजी केंद्रीय कायदा मंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या विषयीची सविस्तर माहिती घेतल्यानंतरच त्यावर बोलणे उचित ठरेल असे सांगितले.

विज्ञान, शेती, जीवशास्त्र विद्यापीठाची खरी गरज : अ‍ॅड जतिन नाईक  

राज्यात कायदा शिक्षणाचे विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात अ‍ॅड. नाईक यांना विचारले असता, राज्यात कारे महाविद्यालय व साळगावकर कायदा महाविद्यालय आहे. त्यामुळे गोव्याला आणखी एका कायदा विद्यापीठाची गरज नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. 

गोव्यात विवादित प्रकरणे जास्त प्रमाणत नाही. त्यामुळे येथे कायदा संस्थेची फारशी गरज नाही. अन्य क्षेत्रातील जसे की, विज्ञान, जीवशास्त्र व शेती संदर्भातील विद्यापीठांची गोव्याला गरज आहे. तसेच सरकारने असलेल्या विद्यापीठाकडे लक्ष देऊन, राज्यातील एकमेव गोवा विद्यापीठाला गोमंतकीय तज्ज्ञ आचार्य धर्मानंद कोसंबी यांचे नाव द्यावे, अशी मागणी देखील अ‍ॅड. नाईक यांनी केली.

अधिक वाचा : खरेदी समितीला ३० जूनपर्यंत मुदतवाढ

Back to top button