कोल्हापूर जिल्ह्याची सुटका नाहीच; निर्बंध कायम | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्याची सुटका नाहीच; निर्बंध कायम

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा

कोरोना पॉझिटिव्हिटी रेट दहाच्या आत असतानाही कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा संभाव्य धोका म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचा चौथ्या स्तरातच समावेश ठेवला असून निर्बंधही कायम राहणार आहेत. त्यामुळे व्यापारी संघटना आणखी आक्रमक झाल्या असून यासंदर्भात शनिवारी दुपारी साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने अडीच महिन्यांपासून जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता अन्य दुकाने बंद आहेत. गेल्या महिन्यात शासनाने प्रत्येक  जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हिटी रेट तपासून ज्या जिल्ह्याचा रेट दहाच्या आत आहे, त्या जिल्ह्यातील नियम काही प्रमाणात शिथिल केले होते. कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट तेव्हा दहाच्यावर  गेल्याने जिल्ह्याचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला होता.

गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. पॉझिटिव्हिटी रेटही दहा टक्क्यांच्या आत आला आहे. जिल्ह्याचा सध्याचा पॉझिटिव्हिटी रेट 8.26 टक्क्यांवर आहे. तर वापरात असलेल्या ऑक्सिजन बेडचे प्रमाण 56.9 इतके आहे. त्यामुळे कोल्हापूर  जिल्ह्याचा समावेश तिसर्‍या टप्प्यात होऊन सरसकट सर्वच दुकाने सुरू होणार या आशेवर व्यापारी होते. पण राज्य शासनाने नवी नियमावली जाहीर करत पॉझिटिव्हिटी रेट काढताना अँटिजेन चाचण्यांचे निकष न पाहता आरटीपीसीआर चाचण्यांची आकडेवारी ध्यानात घ्यावी, असे म्हटले आहे.

राज्य शासनाच्या या नव्या आदेशामुळे व्यापारी वर्गात संभ—म निर्माण झाला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार कोल्हापूर जिल्ह्याचा तिसर्‍या स्तरात समावेश झालाच पाहिजे, अशी भूमिका व्यापार्‍यांनी  मांडली आहे. याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची भेट घेण्यास व्यापार्‍यांचे शिष्टमंडळ गेले होते. पण जिल्हाधिकारी शाहू जयंतीच्या पूर्वतयारीच्या नियोजनात असल्याने भेट होऊ शकली नाही. आता शनिवारी दुपारी साडेचार वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला पालकमंत्री सतेज पाटील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यापारी संघटनांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून कोल्हापुरातील निर्बंध शिथिल करू, असे आश्वासन दिले होते. पण ही बैठक होऊ शकली नाही. त्यामुळे शनिवारच्या बैठकीकडे व्यापारी वर्गाचे लक्ष लागले आहे.

वारंवार नियम बदलल्यास निर्बंध हटणारच नाहीत : शेटे

कोल्हापूर जिल्हा नियमाप्रमाणे चौथ्या टप्प्यातून तिसर्‍या टप्प्यात आला आहे. त्यामुळे आम्ही शासन आदेशाचे पालन करा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करत आहोत. तिसर्‍या संभाव्य लाटेचा विचार करून शासन नियमात बदल करत आहे. हे अन्याय करणारे आहे. असे वारंवार नियम बदलल्यास कोल्हापुरातील निर्बंध कधीच हटणार नाहीत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल करावेत, अन्यथा प्रशासनाशी संघर्ष करून सोमवारी दुकाने सुरू करणार असल्याचे चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.

Back to top button